सामाजिक

दूराग्रही मराठी

मी स्वतः मराठीप्रेमी असल्याने हा काही मराठी विरोधी लेख नाही, हे मी या लेखाच्या सुरुवातीलाच स्पष्ट करतो. पण मराठीचा आग्रह, प्रसंगी दूराग्रह का? हे सोदाहरण स्पष्ट करण्याकरीता हा लेख लिहित आहे. सर्वप्रथम मराठी माणसावर मराठीचा दूराग्रह करण्याची वेळच का यावी? या गोष्टीचे आत्मपरिक्षण व्हायला हवे. मागील काही दशकांत मराठी समाजातील धुरिणांनी आपल्या स्वबांधवांचे खच्चिकरण करुन वेळोवेळी सतत परकीयांची तळी उचलून धरल्याने आज सर्वत्र मराठीची प्रत्यक्ष महाराष्ट्रातच पिछेहाट झालेली दिसते.

भाषा हा उथळ विषय आहे, असा उथळ विचार करणारे स्वार्थी सामाजिक व राजकीय नेतृत्त्व दूर्देवाने महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपासूनच सर्वसामान्य जनतेस लाभत गेल्याने आज पन्नास-साठ वर्षांनंतर महाराष्ट्रात मराठी माणसावरच न्यूनगंड बाळगण्याची नामुष्की ओढावलेली दिसते. प्रगल्भ समाजसुधारकांचा व लेखकांचा वारसा हा संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपर्यंत अबाधित होता. प्र. के. अत्रे, प्रबोधनकार ठाकरे असे लेखक, समाजसुधारक त्याकाळात मराठी माणसाची बाजू अगदी उघडपणे घेताना दिसतात. पण नंतरच्या काळात मात्र महाराष्ट्रात मराठीची बाजू घेणे हा संकुचितपणा ठरु लागला. यास महाराष्ट्राच्या राजकीय नेतृत्त्वापेक्षा महाराष्ट्राचे सामाजिक नेतृत्त्व अधिक जाबाबदार आहे, असे मला वाटते. मराठी माणसास ‘डबक्यातील बेडूक’ म्हणून हिणवणार्‍यांस जर त्याच वेळी ‘महानतेचा आव आणून ‘फुगलेले बेडूक’’ असे सुनावले असते, तर आज आमच्या पिढीस मराठीचा लढा आमच्या हाती घेण्याची गरज पडली नसती.

महाराष्ट्रातील संतांचे वैशिष्ट्य असे की, ते समाजातील दांभिकतेवर अगदी कडक शब्दांत टिका करतात. दांभिक विचारांविरोधातील हाच वारसा पुढे महाराष्ट्रातील आभ्यासू, प्रगल्भ व प्रामाणिक समाजसुधारकांनी चालवला. पण नंतरच्या काळात मात्र आपल्याच समाजाच्या न्याय्य मागण्या पायदळी तुडवून त्यास उपदेशाचे डोस पाजत महान बनून फिरण्याची दांभिकता महाराष्ट्रात सर्वत्र बोकाळलेली दिसते. असो! यापुढील काळात मात्र अशी दांभिकता बाळगून महान बनण्याचा जर कोणाचा विचार असेल, तर त्यांनी आपले ते महानतेचे नियोजन बस्तानात गुंडाळून ठेवावे. कारण सर्वसामान्य मराठी समाज आता अधिक सुशिक्षित, श्रीमंत व धाडसी झाला आहे. तो स्वतःचा विचार करण्यास समर्थ असून आपले उपदेश आपण स्वतःच्या कल्याणाकरीता वापरावेत.

मध्यंतरी अक्षय कुमारने आपण मराठी का शिकलो? याची एक गमतीशीर आठवण सांगितली. यावरुन मराठीचा आग्रह व प्रसंगी दूराग्रह का? ते आपणास स्पष्ट होईल. अक्षय कुमार नव्यानेच मुंबईमध्ये आला होता आणि तो एका बसमधून प्रवास करत होता. एव्हढ्यात आपला कंडक्टर त्याच्याजवळ येऊन त्यास मराठीतून म्हणाला, ‘चला.. पुढे पुढे पुढे’ त्यास काहीच कळले नाही, त्यामुळे तो तसाच तिथे उभा राहिला. त्यानंतर काहीवेळाने कंडक्टर पुन्हा परत येऊन त्यास म्हणाला, ‘एऽ पुढे सांगितलं ना.. पुढे चला.. पुढे पुढे’. असं म्हणून कंडक्टर परत दुसर्‍या बाजूला गेला, पण तरीही अक्षय कुमार जागचा न हललेला पाहून यावेळी त्याने जोरात सांगितलं, ‘एऽ पुढे सांगितलं ना पुढे यायला’. अक्षय कुमार मनोमन म्हणत होता, ‘ए क्या है ‘पुढे’? कौन है ‘पुढे’? किसका ‘पुढे’?’. तेंव्हा बाजूलाच बसलेला एक माणूस त्यास म्हणाला, ‘आपको मराठी नहीं आता है?’. अक्षय कुमार म्हणाला, ‘नहीं आता है’. यावर तो माणूस म्हणाला, ‘‘पुढे’ मतलब ‘आगे चलो’’. ‘अरे आगे चलनो को बोलना था तो फिर ‘आगे चलो’ बोलो ना यारऽ मेरेको समझ में नही आ रहा है’, अक्षय कुमार बोलून गेला. यावर ती व्यक्ति म्हणाली, ‘नहीं महाराष्ट्र में हो आप, आपको मराठी सिखना होगा’. तेंव्हा त्यास वाटलं की, ‘ठिक है, मराठी भी सिख लैंगे!’. त्या दिवशी त्यास सर्वांसमक्ष इतकं ओशाळल्यासारखं झालं की, त्याने मराठी शिकण्याचे ठरवले. अशाप्रकारे अक्षय कुमारने मराठी शिकण्यास सुरुवात केली.

जर आपल्या मराठी कंडक्टरने त्यादिवशी आपल्या भाषेचा आग्रह (काहींसाठी दूराग्रह) धरला नसता व शेजारीच बसलेल्या त्या व्यक्तिने तो महराष्ट्रात असून त्याने मराठी शिकण्याची गरज आहे, याची त्यास जाणिव करुन दिली नसती, तर आज अक्षय कुमार आपणास मराठीतून बोलताना दिसला नसता. अक्षय कुमारसारखी प्रभावी व्यक्ति आपणास मराठी येत असल्याचा अभिमान बाळगताना दिसते, तेंव्हा निश्चितच त्याचा समाजातील सर्वसामान्य लोकांवरही प्रभाव पडतो. अशाने त्यांच्या मनात भाषेच्या ओघाने आलेला स्वतःबद्दलचा ‘न्यूनगंड’ दूर होण्यास मदत होते, आणि ‘आत्मविश्वास’ असलेली व्यक्तिच आपल्या जीवनात उत्कर्ष साधू शकते. सर्वसामान्यांसाठी स्वभाषाग्रह महत्त्वाचा आहे, तो त्यांच्या उत्कर्षासाठीच! ‘फुगलेल्या कॉस्मॉपॉलिटन बेडकांनी’  या मुद्याकडे विशेष लक्ष द्यावे!

स्वतःतर काही करायचेच नाही, पण ‘याने काय होणार आहे?’, ‘त्याने काय होणार आहे?’ अशा नकारात्मकतेने दुसर्‍याच्या उत्साहाचे खच्चिकरण करु पाहणार्‍यांच्या डोळ्यांची झापडे उघडण्यास वर नमूद केलेला प्रसंग पुरेसा असावा. एखादे कार्य करण्यापूर्वीच जर फुलश्रूतीची फसलेली गोळाबेरीज करुन हातपाय गाळटणार असाल, तर ते कार्य सुरु होण्यापूर्वीच संपून जाईल. ‘एव्हढ्याने काय होणार आहे?’ असा विचार करण्यापेक्षा आत्ताच्या क्षणी मी माझे कर्तव्य प्रामाणिकपणे करत आहे का? याचा माणसाने विचार करावा. महाराष्ट्रात मराठीचा आग्रह धरल्याने समोरच्यास आपले बोलणे समजले नाही, तरी आपण महाराष्ट्रात असून आपणास मराठी येत नाही, हे तरी त्यास समजेलच!

मूळातच स्वार्थी असणार्‍यांबाबत बोलायचं झालं, तर ‘झोपलेल्यास उठवता येते, पण झोपेचे सोंग घेणार्‍यास ते कसे उठवणार?’. महाराष्ट्रातील स्वार्थी प्रवृत्तीचे उथळ मराठी लोकही असंच झोपेचं सोंग घेऊन निजले आहेत. पण काळजी नसावी! स्वार्थी लोक वार्‍याची दिशा पाहून आपला स्वार्थ साधण्याकरीता अगदी क्षणात बदलतात. जेंव्हा मराठीचे वारे वाहू लागेल, तेंव्हा हेच स्वार्थी लोक आपले सोंग बाजूला सारत तोंड वर करुन  ‘मराठी, मराठी’ म्हणत आयत्या बोटीतून प्रवास करायला येतात की नाही!? पहा!

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.