आयुष्य · माहिती · व्यक्तिगत · सामाजिक

ट्विटरकट्टा ३३ – महाराष्ट्राची वैचारिकता अद्ययावत व्हावी!

जानेवारी २०१८ या दिवशी ‘ट्विटरकट्टा’, ‘मराठी ब्रेन’, आणि ‘मराठी विचारधन’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘ट्विटरकट्टा’ या ऑनलाईन कार्यक्रमाचे ३३वे सत्र माझ्यासोबत पार पडले. ‘मराठी भाषा पंधरवडा’ सुरु होत असताना अशाप्रकारे पहिल्याच दिवशी एक उत्तम योग जुळून यावा ही गोष्टही उल्लेखनीय आहे. रात्री ९.३० वाजता प्रश्नांच्या फैरी झडण्यास सुरुवात झाली आणि हा कार्यक्रम एव्हढा रंगला की, प्रश्नांची उत्तरे देता देता माझा दुसरा दिवसही निघून गेला. बाकी या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त झालेले विचार कुठेतरी संकलित रहावेत, कालोघात हरवून जाऊ नयेत या उद्देशाने हा अनुलेख प्रकाशित करत आहे. याचा माझ्यासह इतरांना देखील उपयोग होईल अशी आशा आहे.


~ प्रारंभ ~


घोषणा

‘मराठी भाषा पंधरवडा’ विशेष! ०१-०१-२०१८ रोजी रात्री ९:३० ते १०:३० यावेळेत ‘ट्विटरकट्टा’चे ३३ वे सत्र होईल ‘मराठी इंटरनेट’चे ऍडमीन, ‘संगणकाची गोष्ट’ या पुस्तकाचे लेखक व कट्टर मराठी व्यक्तिमत्व रोहन जगताप यांच्यासोबत.

– मराठी ट्विटरकट्टा (@TweetKatta)

ट्विटरकट्टा ३३ - रोहन जगताप
ट्विटरकट्टा ३३ – रोहन जगताप । १ जानेवारी २०१८। चित्रकृती सौजन्य : दिगंबर (@Digamber)

उत्सुकता

विष्णू (@_MeVishnu) : निष्पक्ष आणि परखड़ मत व्यक्त करणाऱ्या रोहनजी जगताप सरांसोबत संवाद साधायला निश्चितच आवडेल!

स्वरुप राहणे (@swaruprahane) : अरे वा छान नविन वर्षाची सुरवात रोहन यांच्या विचारांनी

अमोल गोरे (@AmolUddhav) : वाटलं नव्हतं नवीन वर्षाच्या सुरुवातीला रोहन सोबत ‘ट्विटरकट्टा’वर प्रश्न विचारण्याचा योग येईल.. त्यासाठी मी ‘ट्विटरकट्टा’चे मनापासून आभार व्यक्त करतो! प्रश्नावली तयार करा!

उमेश (@ParseUmesh) : अरे व्वा….मस्तच….मजा येईल….

मनी माऊ (@_Meowww7) : सगळेजण ज्यांच्या प्रतीक्षेत अखेर ते कट्टयावर येणार.. 🙂 Eagerly Waiting दादा..

रजत जोशी (@RajatSaysItAll) : अत्यंत तर्कशुद्ध पद्धतीने व चपखल शब्दांत आपला मुद्दा मांडणारे रोहन यांच्या ‘ट्विटरकट्टा’ची आवर्जून वाट पाहतो आहे.

कौस्तुभ सप्रे (@kaustubh0205) : रोहनभाऊ, अभिनंदन. आपल्या प्रयत्नांना कायम यश लाभत राहो हि सदिच्छा.


‘ट्विटरकट्टा’ काही क्षणात ९:३० वा, सुरवातीला 10 मिनिटे रोहन यांचे मनोगत होईल, नंतर प्रश्नोत्तरे होतील!

– मराठी विश्वपैलू (@MarathiBrain)


मनोगत

सर्वप्रथम सर्वांना नववर्षाच्या अगदी मनःपूर्वक शुभेच्छा! नवीन वर्षात आपणा सर्वांना नवी दृष्टी आणि नवा आनंद प्राप्त होवो ही याप्रसंगी सदिच्छा! आपण मला जेव्हढे ओळखता, अगदी तेव्हढीच मी माझी ओळख समजतो. त्यामुळे याठिकाणी मी माझी वेगळी ओळख करुन देणार नाही. बाकी आज ट्विटरकट्ट्याच्या निमित्ताने माझ्या खूप सार्‍या नव्या, तसेच नव्याने ओळखी होतील याबाबत खात्री आहे. तेंव्हा प्रश्नोत्तरांसाठी मी उत्सुक आहेच, परंतु तत्पुर्वी आपले एक छोटेसे मनोगत याठिकाणी व्यक्त करणे मला औचित्त्याचे वाटते.

भोवतालचे जग समजू लागले अगदी तेंव्हापासून मी एक उपजत ‘महाराष्ट्रवादी’ आहे. तेंव्हा ‘महाराष्ट्र’ हा माझ्या आजवरच्या विचारप्रक्रियेचा अविभाज्य भाग राहिलेला आहे. ‘महाराष्ट्र’ हा माझ्यासाठी केवळ एक भौगोलिक प्रदेश नसून आध्यात्माची व्यवहाराशी सांगड घालणारी एक ‘सखोल विचारसरणी’ आहे. त्यामुळे ट्विटरवर आल्यानंतर ‘मराठी भाषा’ नि ‘महाराष्ट्र’ या विषयांवर व्यक्त होणे माझ्यासाठी अगदी स्वाभाविक होते. ‘महाराष्ट्रवादी’ म्हणजे ‘संकुचित’ असा एक भ्रम मधल्या काळात जनसामान्यांमध्ये रुजवण्यात आला होता. तेंव्हा मी मराठी विषयी काही बोलावे आणि लोकांनी माझ्याकडे आपसुक संकुचित म्हणून पहावे हे ओघाने आलेच! पण माझा महाराष्ट्रवाद शुद्ध तर्कातून सिद्ध झालेला असल्याने कोणी माझ्याकडे जर संकुचित म्हणून पहात असेल, तर त्याची मी कधी पर्वा केली नाही. उलट जे ‘मराठी महाराष्ट्राचा मुद्दा’ मानत नाहीत ते स्वतः संकुचित, भावनिक आणि मागासलेल्या विचारांचे असतात हे मी तर्कानिशी सिद्ध करुन दाखवू शकतो. जो समाजाची भाषा आपली मानत नाही असा माणूस प्रगल्भ, विचारी वा प्रामाणिक असूच शकत नाही. बाकी आपण एखादी गोष्ट तर्कशुद्धपणे मांडली, तर ती गोष्ट वैचारीक माणूस मोकळ्या मनाने आत्मसात करतो, असा माझा ट्विटरवरील आजवरचा अनुभव आहे. अशाने इथे समविचारी लोकांचे प्रेम तर मला मिळालेच, परंतु इतर विचारसरणीच्या लोकांची आपुलकी देखील लाभली!

समाजमाध्यमांवर चालणार्‍या चळवळींची अनेकदा निरर्थक म्हणून हेटाळणी केली जाते. ‘क्रियेविण वाचाळता व्यर्थ’ असा त्यामागील एकंदरीत भाव असतो. परंतु याठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, मानवी मनात आधी विचार प्रकट होतो आणि त्यानंतर त्यानुषंगाने कृती घडते. समाजमाध्यमावरील एक विचार माणसाची वैचारिकता व त्यायोगे त्याची प्रत्यक्ष जगातील कृती बदलवू शकतो. दुसरे असे की, आजच्या जगाचे स्वरुप हे पूर्वीपेक्षा निराळे आहे. पूर्वी ज्या कृती प्रत्यक्ष जगात कराव्या लागत, त्या आज ऑनलाईन करता येतात. पूर्वी जी तक्रार कागदी अर्जाद्वारे करावी लागे, ती आज ऑनलाईन करता येते. बाकी रस्त्यावरील चळवळी काही एका दिवसात घडत नसतात, त्यामागे अनेकानेक वर्षांची पार्श्वभूमी असते. शिवाय ज्या चळवळीचा वैचारीक पाया भक्कम असतो, त्याच चळवळीतून पुढे ठोस काही निष्पण्ण होते. तेंव्हा सध्या समाजमाध्यमांतून जो वैचारीक खल सुरु आहे, त्यातून महाराष्ट्राचा वैचारीक पाया मजबूत होत आहे ही महाराष्ट्रासाठी जमेची बाब आहे.

कोणत्याही प्रश्नाचे सर्वांगिण दृष्टीने विचार करुन वेळ घेऊन उत्तर देणे ही माझी पद्धत आहे. परंतु ट्विटरकट्ट्याचे एकंदरीत स्वरुप पाहता आजचा ट्विटरकट्टा कदाचित माझ्यासाठी कसरतीचा ठरु शकेल. तरी तासाभराच्या या सत्रात जास्तितजास्त प्रश्नांची उत्तरे देण्याचा माझा प्रयत्न असेल आणि त्यानंतर यथावकाश आपल्याला उर्वरीत प्रश्नांची उत्तरे मिळतील. ट्विटरवर काही खात्यांद्वारे नोटिफिकेशन वा सुचना मिळत नाहीत ही बाबही याठिकाणी लक्षात घ्यावी. बाकी आपण मला आपुलकीने सांभाळून घ्याल याची खात्री आहे, तेंव्हा आता आपण आपल्या ट्विटरकट्ट्याला सुरुवात करुया!


शुभेच्छा

नविनकुमार माळी (@navinmali) : आपल्याला ‘ट्विटरकट्टा’साठी मनपूर्वक शुभेच्छा! आपल्या सोबतच्या गप्पामधून आमचे इंटरनेट क्षेत्रातील ज्ञान वाढण्यासाठी मदत होईल, अशी आशा आहे.

जोशी काका (@joshisuresh285) : काय योगायोग आजच १९७८ पासून मराठी माणसाच्या दिलावर राज करणारे आ. नाना पाटेकर यांचा वाढदिवस तर विचारप्रवाह नावाने मराठीला जपनारे रोहन यांचा ‘ट्विटरकट्टा’! दोघांनाही शुभेच्छा!

कनिष्क (@kanishkajadhav) : कट्ट्यावर आपले स्वागत आहे. याठिकाणी आपल्यासारखे प्रतिभावंत लोक बघायला मिळतात!


प्रश्नोत्तरे

प्रश्न : ‘मराठी भाषा पंधरवडा’ सुरू आहे, त्यामध्ये आपला ‘ट्विटरकट्टा’ म्हणजे दुग्धशर्करा योग आहे आमच्यासाठी. ‘संगणकाची गोष्ट’चे लिखाण करण्यापूर्वी केव्हा असे वाटले होते की तुम्ही लेखक होऊ शकता? – दिगंबर (@Digamber)

उत्तर : अगदी लहानपणापासून हे मला माहित होते!


प्रश्न : भारतीय राष्ट्रवाद हा भम्पक असून दिल्ली, उत्तरभारताने केवळ स्वार्थाकरिता या संज्ञेचा वापर केला. या न्यायाने केवळ महाराष्ट्रवाद अर्थात संपूर्ण स्वायत्तता हाच एकमेव पर्याय मराठीजनांसमोर आहे. हा विचार महाराष्ट्रात रुजेल काय? तुम्ही याबाबत अनुकूल आहात का? – प्रकाश शिंदे (@prakash_shinde0)

उत्तर : माझा महाराष्ट्राच्या स्वायत्ततेला पूर्णपणे पाठींबा आहे!


प्रश्न : तामिळ राष्ट्रवाद, खलिस्तान राष्ट्रवाद या विषयी जास्त चर्चा होत नाही, ती व्हायला हवी असं वाटतं का? – प्रकाश शिंदे (@prakash_shinde0)

उत्तर : लोकशाही मार्गाने चालणाऱ्या प्रत्येक चळवळीची दखल घ्यायला हवी!


प्रश्न : मराठी भाषेचा विकास शेतकऱ्यांसाठी कसा फायदेशीर ठरेल…??? – नितिन (@Ni3_Sonwale)

उत्तर : मराठी भाषेच्या विकासाने उलट शेतकऱ्यांचा सर्वाधिक फायदा होईल! कारण मराठी ही शेतकऱ्यांची व्यवहाराची भाषा आहे.


प्रश्न : मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांना मराठी भाषेबद्दल काही आवाहन?? – प्रशांत पोटेकर (@PotekarPrashant)

उत्तर : त्यांनी मराठी भाषेशी प्रामाणिक राहावे!


प्रश्न : देवा चित्रपटाला यश नाही मिळाले हिंदी चित्रपटामुळे.. पण ही पहिली वेळ नाही आहे की हिंदी चित्रपटामुळे मराठीला अपयश आलं ते.. तुम्हाला काय वाटतं मराठी इंडस्ट्रीला हिंदी सोबत स्पर्धा करत असतील की चित्रपट पुढे नेन्याचा खरोखर एक प्रयत्न? – पौर्णिमा पवार (@pournimapawar98)

उत्तर : मराठी चित्रपटाचे बजेट कमी असल्याने मराठी चित्रपटांना चांगल्या कथांची गरज आहे. कथा चांगली असेल, दिग्दर्शन योग्य असेल, तर मराठी चित्रपट सहज पुढे जाईल!


आज आपल्यासोबत ‘ट्विटरकट्टा’मध्ये मराठी वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्नरत असलेले तरुण लेखक रोहन. सहभागी होऊन चर्चा करा.

– मराठी विचारधन (@marathivichar)


प्रश्न : इंटरनेट क्षेत्रात १००% भारतीय मालकीचे एकही मोठे सोशल मिडीया प्लॅटफॉर्म आज मितीला उपलब्ध का नाही? आपल्या या क्षेत्रातील अनुभवातून, आपण याबद्दल काय सांगू शकाल? – नविनकुमार माळी (@navinmali)

उत्तर : तसे आपले सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत, पण ते फारसे लोकप्रिय होऊ शकले नाहीत. कल्पकता महत्त्वाची आहे!


प्रश्न : वर्ष २०१७ मध्ये जेवढी आश्वासने मिळाली किंवा सरकारकडून जेवढी गैरसोय झाली.. काय वाटतं या नूतन वर्षी तरी काही सुधारणा होईल का?? – पौर्णिमा पवार (@pournimapawar98)

उत्तर : आशावादी राहण्यास हरकत नाही! 🙂


प्रश्न : आईटी क्षेत्रातील हजारों कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात आहेत..?? ह्या विषयी आपले मत..?? – अनिकेत (@anii_ket)

उत्तर : दीर्घकालीन आर्थिक गुंतवणूक करत राहा आणि सोबतच आपल्या कौशल्याला अनुकूल असा व्यवसाय करण्याचा प्रयत्न करा.


प्रश्न : तुम्ही ट्विटरवर फक्त मराठी भाषेला पुढे नेण्याच्या प्रयत्नात दिसून आलेत पण ट्विटर वर तुमची कोणासोबत मैत्री दिसुन आली नाही आहे… हे खरं आहे का ? – पौर्णिमा पवार (@pournimapawar98)

उत्तर : अतिपरिचयात अवज्ञा होते, त्यामुळे मी कोणामध्ये जास्त मिसळत नसलो, तरी इथे सगळेच माझे मित्र आहेत! 🙂


प्रश्न : मराठी तरुणांनी आईटी क्षेत्रातील उतरल्यांनतर नोकऱ्या न जाण्यासाठी काय खबरदारी घ्यावी…??? – अनिकेत (@anii_ket)

उत्तर : नोकरी व्यतिरिक्त एखादी योजना तयार असावी! अशाने नोकरी जाण्याचा दबाव उरणार नाही!


प्रश्न : आतापर्यंत वाचण्यात आलेले आवडते पुस्तक? ते पुस्तक इतरांनीही वाचावे म्हटले तर का वाचावे? – ज्ञानेश्वर (@DnyaneshwarGk7)

उत्तर : वाचनातून माणसाला जी दृष्टी प्राप्त होते त्यातून त्यास आयुष्याचे नवे अर्थ लागतात. सगळ्यात आवडते पुस्तक असे कोणते नाही. माणसाप्रमाणेच प्रत्येक पुस्तकातून काही घेण्यासारखे, तर काही सोडून देण्यासारखे असते.


प्रश्न : आपलं मराठी भाषेवरील प्रेम सर्वश्रुत आहेच. मराठी भाषेसाठी काम करावं यामगील प्रेरणा आपणांस कुठून आणी कशी मिळाली? – अनुराग (@anurag291199)

उत्तर : मराठी महाराष्ट्रासाठी कार्य करण्याची ही उपजत उर्मी आहे! त्यामुळे मराठीचा विषय मांडताना मी कधी थकत नाही!


प्रश्न : रोहन सर, ‘विंडोज’ आणि त्याचे कंटाळवाणे अपडेट्स लक्षात घेता, तुम्ही युजर्सना ‘लिनक्स’ वापरण्याचा सल्ला देणार का? – (@DhavalSanket)

उत्तर : विंडोजच्या काही मर्यादा असल्या तरी या कार्यप्रणालीची आपली काही बलस्थाने देखील आहेत! 🙂


प्रश्न : हिंदी तथा इंग्रजी भाषेचा द्वेष म्हणजेच मराठी भाषेवर प्रेम अशी काहीशी स्थिती इथे काही तज्ञांनी निर्माण केली आहे, ह्यावर तुमचं काय मत आहे…?? – नितीन (@Ni3_Sonwale)

उत्तर : महाराष्ट्रात मराठीला जोपर्यंत हिंदीपुढे सक्तीने सापत्न वागणूक दिली जाईल, तोपर्यंत लोक हिंदीवर प्रेम करतील अशी अपेक्षा बाळगता येणार नाही. इंग्लिश भाषेशी मात्र आता काळाप्रमाणे जुळवून घेतले जात आहे! योग्य समतोल हवा!


प्रश्न : कुठल्या गोष्टीत जास्त एफर्ट्स लागतात? पुस्तक लिखाणास कि त्यानंतर असणाऱ्या संकलन आणि छपाई प्रक्रियेस? – परिक्षित (@Parix26)

उत्तर : दोन्ही गोष्टींमध्ये कष्ट आहेत, पण मला वाटतं पुस्तक लिहिण्यास तुलनेने थोडे अधिक कष्ट लागतात.


प्रश्न : ट्विटरवर येतानाच मराठी साठी यायचं हे ठरवलं होत का..? – (@_Meowww7)

उत्तर : नाही.. बऱ्याच वर्षांपूर्वी केवळ एक कुतूहल म्हणून ट्विटरवर खाते उघडले होते.


प्रश्न : (मराठी ट्विटरवर २०१७ सालच्या उत्तरार्धात गाजलेल्या ‘बोगस यादी’ प्रकारणाच्या अनुषंगाने) २०१८ च्या ‘बोगस यादी’त तुमचं नाव येईल असं वाटतं का? – (@ranveerpol6161)

उत्तर : नाही.. कारण आमची प्रत्यक्ष भेट झाली आहे! 🙂


प्रश्न : मराठी इंटरनेट आणि म्हणजे नेमकं काय?? – पिनू भाऊ (@shinde_pinu)

उत्तर : ‘मराठी इंटरनेट’ या ब्लॉगच्या माध्यमातून इंटरनेटशी निगडित गोष्टींची माहिती मी मराठीतून देत असतो. ब्लॉगसोबतच मी समाजमाध्यमांचाही वापर करतो.


प्रश्न : मराठीच्या आग्रहाचा अतिरेक होतो असं कधी वाटतं का? तसं असेल तर, कुठल्या विषयात? – रजत जोशी (@RajatSaysItAll)

उत्तर : हो.. तसं वाटतं कधी कधी.. अनेकांना मराठी शुद्ध लिहिण्याबाबत व्यक्तिगतरित्या सांगितले जाते, जे मला स्वतःला पटत नाही. सार्वजनिकरित्या सांगणे अधिक योग्य आणि परिणामकारक आहे.


प्रश्न : स्वतःला संगणकाविषयी काही प्रॉब्लेम आला तर स्वतः दुरुस्त करण्याचा प्रयत्न करता का? किंवा कशाचा आधार घेता?? – अमोल (@Ams_NavThar)

उत्तर : हार्डवेअरची समस्या असेल, तर त्याबाबत मी काही करू शकत नाही. परंतु इतर समस्या मात्र इंटरनेटच्या मदतीने सोडवतो.


प्रश्न : रोहनजी २०१७ वर्षा मध्ये पहायला गेलं तर भरपुर काही घटना घडल्या. मराठा क्रांती मोर्चा’ ते ‘शेतकरी संप’ अन्‌ मुंबई मधील महत्वाच्या अनैसर्गिक घटना यामध्ये सरकार हतबल झालेलं पाहील. यावर आपलं मत काय? – सिमा (@me_seema_)

उत्तर : शेतकऱ्यांना एका द्रष्ट्या वैचारिक नेतृत्त्वाची गरज आहे. केवळ राजकीय नेतृत्त्वातून या समस्या सुटणार नाहीत.


प्रश्न : आपले विचार लोकांपर्यंत पोहचण्यास सोशल मीडिया कितपत सहाय्य करते? – अमोल (@Ams_NavThar)

उत्तर : जर आपण कौशल्याने वापर केला, तर हे एक खूपच दमदार माध्यम आहे.


प्रश्न : उशीर खूप झालाय प्रश्न विचरायला पण विचारणारच… 🙂 🙂 “संगणकाची गोष्ट” हे पुस्तक लिहिण्याची प्रेरणा कशी व कुठून मिळाली? – अमोल (@Ams_NavThar)

उत्तर : त्यावेळी मी ‘मराठी इंटरनेट’ या माझ्या ब्लॉगवर सक्रिय होतो. मला नेहमीच एक पुस्तक लिहायचे होते आणि त्यावेळच्या एकंदरीत परिस्थितीचा विचार करता मी या स्वरूपाचे पुस्तक लिहावे असे ठरवले.


प्रश्न :  रोहन सर, पहिल्यांदा ब्लॉग सुरु करणाऱ्यांना तुम्ही कोणती CMS वापरण्याचा सल्ला द्याल? Blogger किंवा WordPress किंवा Drupal – (@DhavalSanket)

उत्तर : जे नुकतीच सुरुवात करत आहेत किंवा ब्लॉगकडे छंद म्हणून पहात आहेत त्यांनी ब्लॉगर वापरावे. ज्यांना व्यावसायिक दृष्टीने ब्लॉग सुरू करायचा आहे त्यांनी आपला ब्लॉग वर्डप्रेसवर होस्ट करावा.


प्रश्न : रोहन सर मलाही ब्लॉग सुरु करायचा आहे काही सोप्या टीप्स .. – सचिन जाधव (@sachinjadhav461)

उत्तर : blogger.com पासून सुरुवात करावी.


‘ट्विटरकट्टा’च्या आजच्या सत्राची शेवटची काही मिनिटे रोहन यांच्यासोबत. खुपकाही जाणून घेता येत आहे नव वर्षाच्या सुरुवातीला.

– मराठी विचारधन (@marathivichar)


प्रश्न : संगणकाची गोष्ट लिहित होता तेंव्हा तुमचे कामाचे schedule कसे होते? – दिगंबर (@Digamber)

उत्तर : सहसा संध्याकाळी ४ नंतर मी लेखनास सुरुवात करतो.


प्रश्न : नवीन वर्षाचे काही संकल्प केलेयेत का?? आणि केले असेल तर नक्की काय? – मुक्ता (@Mukta_rocks)

उत्तर : मला माझी कार्यक्षमता वाढवायची आहे. संकल्प असा नाही, पण त्या दिशेने वाटचाल करायची आहे.


प्रश्न : रोहन दादा माझा थोडासा वेगळा प्रश्न आहे.. मी तुमचा फोटो बघितला का भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली आठवतो.. 🙂 🙂 तुम्ही दादा सारखेच दिसता..असे तुम्हाला कुणी म्हंटले कधी? का..मी प्रथमच विचारतोय – पिनू भाऊ (@shinde_pinu)

उत्तर : आठवत नाही.. कदाचित लहानपणी.. पण आता तुम्हीच पहिले आहात.. 🙂


प्रश्न : कलेच्या सादरीकरणात आशय जास्त महत्वाचा की भाषा? – रजत जोशी (@RajatSaysItAll)

उत्तर : प्रत्येक भाषेचा आपला स्वतःचा एक आशय असतो. दोन्ही महत्त्वाचे आहे!


प्रश्न : (‘मुली म्हणतात, मला शेतकरी नवरा नकोच!’ या ‘महाराष्ट्र टाईम्स’मधील बातमीच्या अनुषंगाने) अशा मुलींसाठी काही संदेश – संजय सुधाकर गवस (@sgawas189)

उत्तर : मुलींना लेखक नवरा देखील नको असतो! 😀


प्रश्न : आवडतं पुस्तक?? कोणत्या प्रकारचं?? कथा? कादंबरी? प्रवासवर्णन किंवा इतर?? – प्रशांत पोटेकर (@PotekarPrashant)

उत्तर : आत्मचरित्र, माहितीपर पुस्तक.


प्रश्न : मराठी चॅनल्सनी मराठी सिरीयलस ला हिंदी नाव देऊन हिंदी चे बाजारीकरण सुरु केलंय असे वाटत का ? – अभिजीत औताडे (@abhiautade)

उत्तर : अगदीच अनावश्यक! त्यांनी अस्सल मराठीचा वापर केल्यास त्यांचा अधिक फायदा होईल!


प्रश्न : ‘ट्विटप’साठी कधी जॉईन झाला आहात का? किंवा जर भविष्यात असेल तर जाण्याचा काही विचार आहे का? – सायली (@RSayaali)

उत्तर : अजूनतरी नाही.. यावर्षात नक्कीच!


‘ट्विटरकट्टा’चा अधिकृत वेळ संपलेला आहे. तरीही तुम्ही विचारलेल्या प्रश्नांना रोहन यांच्याकडून सविस्तर उत्तरे नक्की मिळतीलच.

– मराठी विचारधन (@marathivichar)


प्रश्न : तीन प्रश्न १. आपले शिक्षण काय २. ‘मराठी’तून प्रोग्राम लिहायची सोय आहे काय ? ३. मला संगनकीय प्रोग्राम लिहायचं शिकायचय पण मी प्रौढ साक्षर, मला शिकवाल का? – जोशी काका (@joshisuresh285)

उत्तर : मी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहे. प्रोग्रामिंग शिकण्याकरिता अँड्रॉइडवर अनेक चांगले अनुप्रयोग उपलब्ध आहेत. मी नक्कीच आपल्याला मदत करेन!


प्रश्न : संगणकाची गोष्ट च्या एकूण अनुभवावरुन नवीन लेखक यांना कोणता सल्ला द्याल? पुस्तक प्रकाशन करते वेळी अशी कोणती अडचण आली होती त्यावर मात करताना खुप परिश्रम झाले? – दिगंबर (@Digamber)

उत्तर : पुस्तक प्रकाशित करण्यास कोणतीही अडचण येत नाही. पुस्तक वितरित करणे मात्र एक स्वतंत्र काम आहे. गुणवत्ता आणि धडाडी असणाऱ्या लेखकास मात्र कोणतीही गोष्ट अवघड नाही.


प्रश्न : ‘मराठी’ वाढण्यासाठी महाराष्ट्रात प्रादेशिक पक्षांची सत्ता येणे गरजेचे आहे का? – नितीन (@Ni3_Sonwale)

उत्तर : सध्यातरी तसेच चित्र दिसत आहे.


प्रश्न :  रोहन तुझ्या आयुष्यातील प्रेरणा स्वरूपी व्यक्ती कोण .. – सोनल (@scbambal)

उत्तर : मी माणसाकडे व्यक्ती म्हणून नव्हे, तर निरनिराळ्या प्रवृत्तींचे मिळून बनलेले व्यक्तिमत्त्व म्हणून पाहतो. त्यामुळे प्रत्येक माणसाकडून काही घेण्यासारखे, तसेच काही सोडून देण्यासारखे असते!


प्रश्न : खुप खुप शुभेच्छा तुम्ही करत असलेल्या प्रत्येक कामासाठी मग बारामतीला कधी येणार आहात? – रोहित जाधव (@iamrohit_jadhav)

उत्तर : मनःपूर्वक आभारी आहे! मला भविष्यात बारामतीला यायला नक्कीच आवडेल!


प्रश्न : गोपालसर विषयी काय सांगाल? – अमोल (@Ams_NavThar)

उत्तर : सर्वांमध्ये प्रेमाने मिळून-मिसळून राहणारा अगदी नम्र आणि गुणवान मित्र!


प्रश्न : 2018 नवीन वर्षात काय उपक्रम आणि महत्त्वाचे प्रकल्प हाती घ्यायचे तुम्ही ठरवले आहेत? – (@mibawari)

उत्तर : अनेक गोष्टी ठरवलेल्या असतात. पण ‘आधी केले, मग सांगितले’ याप्रमाणे एखादी गोष्ट पूर्ण झाल्यावर सांगणेच योग्य ठरते.


प्रश्न : खऱ्या आयुष्याची नाती सांभाळायला सोशल मीडिया तुला उपयोगी ठरतो का ? – अमोल गोरे (@AmolUddhav)

उत्तर : मी फेसबुक, व्हॉट्सऍप क्वचित वापरतो.. त्यामुळे नाही.


प्रश्न : आपण अत्यंत स्पष्ट व प्रखरपणे भुमीका मांडता कुठल्याही विषयावर.यामागे प्रेरणा कुणाची ? – प्रकाश गाडे पाटील (@Prakashgadepat1)

उत्तर : कोणाचीही नाही.. या उपजत गोष्टी आहेत!


प्रश्न : तुमची मराठी खूपच छान आहे. पण आज सुद्धा खूप मराठी लोकांना/तरुणांना मराठीत बोलायचं म्हणलं कि कमी पणा वाटतो. त्यांना काय सांगावंस वाटेल ? – सायली (@RSayaali)

उत्तर : मनःपूर्वक आभार! त्यांनाही आपल्यासोबत राहून होईल सवय हळूहळू.. आपण स्वतः सर्वत्र सहजतेने मराठी वापरत राहणे गरजेचे आहे!


प्रश्न : तुमच्या ट्विट वरून जाणवतं की तुम्हाला अर्थकारण आवडतं हे खरं आहे का ? 😉 – अमोल गोरे (@AmolUddhav)

उत्तर : मला सर्व विषयांमध्ये रस आहे! मी स्वतः ‘म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर’ आहे! 🙂


प्रश्न : रोहन सर तुम्ही, गोपाळ, सागर तुम्हा त्रिमूर्तीच्या खास मैत्रीबद्दल खूप ऐकलेय, ही मैत्री कशी describe कराल? – अविनाश कुलकर्णी (@AvinashVKulkrni)

उत्तर : निरपेक्ष!


प्रश्न : काही पालकांचा मुलांना इंग्रजी माध्यमात टाकण्याचा जो अट्टाहास आहे, तो कितपत योग्य वाटतो ? – अनघा (@AnaghaSawant3)

उत्तर : पालक आपल्या मुलांना मराठी किंवा इंग्लिश माध्यमात टाकत नाहीत, तर ते त्यांच्या समजुतीने आपल्या मुलाला चांगल्या शाळेत टाकतात. मराठी शाळा त्यांना चांगल्या वाटाव्यात यादृष्टीने आपण प्रयत्न करायला हवेत!


कौशल इनामदार (कौशलदादा) - मराठी शाळा


प्रश्न : सोशल मिडियाची व्याप्ती आणि त्याची मर्यादा याबद्दल काही सांगाल का ?? यावर एखादा लेख यावा, अशी अपेक्षा.. 🙂 शुभेच्छा – निखिल (@Nikhil_DeJure)

उत्तर : यावर मी नक्कीच एखादा लेख लिहीन!


प्रश्न : लिखाणाव्यतिरिक्त अजून काय करायला आवडतं? – सायली (@RSayaali)

उत्तर : गाणी ऐकणे, चित्रपट पाहणे, आणि सतत नवे काही शिकत राहणे!


प्रश्न : कुठल्या प्रकारची गाणी ऐकायला आवडतात? – रजत जोशी (@RajatSaysItAll)

उत्तर : विशिष्ट असा प्रकार सांगता येणार नाही. हृदयाला स्पर्श करणारी, मनात वसणारी गाणी एव्हढेच सांगू शकेन! 🙂


प्रश्न : मराठी लेखनाच्या सध्याच्या दर्जाबाबत आपणास काय वाटते? – प्रवीण पाटील (@me_mardmaratha)

उत्तर : लेखनात दृष्टी महत्त्वाची आहे. मराठीमध्ये अनेकजण चांगले लिहितात, तरी हवी तेव्हढी सखोलता सहसा आढळत नाही. पण हीच गोष्ट परदेशी लेखनालाही लागू पडते. बदलत्या काळास अनुसरून आपली दृष्टी अधिक सखोल व्हायला हवी.


प्रश्न : मराठीत इंटरनेट व संगणक ह्या विषयावर लिहिताना कुठल्या लेखकाचा आदर्श समोर होता – नितीन देशमुख (@NitinDe34915951)

उत्तर : कोणत्याही नाही.


प्रश्न : तुम्ही पुस्तक लिहिलंय अस ऐकुन आहे.. मराठी चित्रपटाची कथा लिहायची संधी चालून आली का तुमच्याकडे..? आली असेल तर तुमचं उत्तर काय असेल..? – मनी माऊ (@_Meowww7)

उत्तर : मी आधी कादंबरी प्रकाशित करेन. त्यानंतर त्यावर जर कोणाला चित्रपट तयार करायचा असेल, तर त्यास मी माझ्या अटींवर नक्कीच अनुमती देईन!


प्रश्न : तुझा ट्विटरवरचा सर्वात आवडता उपक्रम कुठले हॅन्डल चालवते ? – सुशिल (@hpsonar)

उत्तर : मराठीसाठी काम करणाऱ्या प्रत्येक खात्याचे आपले स्वतःचे असे एक खास वेगळेपण आहे ज्यातून ते निरनिराळे उपक्रम घेऊन येतात. मराठी म्हणून मला त्यांचे सारे उपक्रम आवडतात आणि अगदी मनापासून कौतुक वाटते! 🙂


प्रश्न : English भाषेबद्दल तुम्हाला काय वाटते….???? – विनायक साबळे (@vinayaksable4)

उत्तर : मराठीला पूरक म्हणून इंग्लिश भाषा आत्मसात करावी.


प्रश्न : ‘संगणकाची गोष्ट’ लिहिण्यासाठी कस आणि कधी प्रोत्साहन मिळालं ? – अनघा (@AnaghaSawant3)

उत्तर : प्रत्येक माणसात एक उपजत उर्मी असते जिच्या प्रेरणेतून अशा गोष्टी पूर्ण होतात.


प्रश्न : भाषेच्या अर्थकारणाबद्दल काय वाटतं तुला? – सुशील (@hpsonar)

उत्तर : भाषा हा एकप्रकारचा व्यवहारच आहे. मराठी भाषा व्यवहारात मोठ्या प्रमाणावर वापरली जाते म्हणूनच ती आजही टिकून आहे. आपल्याला केवळ हा व्यवहार शक्य तेव्हढा वाढवायचा आहे!


प्रश्न : मराठीवर तुमचे येवढे प्रभुत्व कसे काय…..???? – विनायक साबळे (@vinayaksable4)

उत्तर : लहानपणी मी बऱ्यापैकी पुस्तके वाचत असे. बाकी नैसर्गिक गुणवत्ता.


प्रश्न : मराठी भाषेसाठी काम करायला तुम्हाला कुणी राजकीय पक्षात आमंत्रण दिलं तर तुम्ही जाल का..? – मनी माऊ (@_Meowww7)

उत्तर : दूर भविष्यात जर कधी गरज पडलीच तर कदाचित मी राजकारणात जाईन, राजकीय पक्षात जाईन का? ते सांगता येत नाही. शक्यतो नाही. पण सध्या मात्र मला त्याची आवश्यकता वाटत नाही.


प्रश्न : सर आपली पुस्तक “संगणकाची गोष्ट” लिहितांना एकंदरीत अनुभव कसा आणि काय होता?? – मुक्ता (@Mukta_rocks)

उत्तर : अगदी समृद्ध करणारा अनुभव होता. एका दृष्टीने संगणक हे केवळ एक निमित्त होते. खरे तर संगणकामागील माणसांच्या आयुष्याचा प्रवास, अनुभव या पुस्तकातून उलगडत जातो. या पुस्तकातून माणसाला आयुष्य शिकायला मिळावं अशी त्यामागील एक भूमिका होती.


प्रश्न : आपल्या देशात इंटरनेट वरून पैशाचे व्यवहार किती सुरक्षित आहेत?? – विजय स्वामी (@shyvijay)

उत्तर : आपण आपल्याबाजूने जर व्यवस्थित काळजी घेतली, तर मला वाटतं इंटरनेट वरून होणारे पैशांचे व्यवहार सुरक्षित आहेत.


प्रश्न : पुस्तक लिहिताना एखादा पॉईंट असा येतो की जेव्हा आपण पूर्ण ब्लँक होतो म्हणजे किंवा मनात शंका येते आणि आपण थांबतो अस तुमच्या बरोबर झालं होतं का आणि त्यासोबत कस डील केलं? – परिक्षित (@Parix26)

उत्तर : खूपवेळा होतं.. तेंव्हा मी वेळ घेतो.. आपण आपल्यापरीने सर्वोत्कृष्ट देत नाही, तोपर्यंत वेळ घ्यावा. एकवेळ पुस्तक लिहून झाले नाही, तरी चालेल! पण जर झाले, तर ते आपल्या स्वतःसाठी सर्वोत्कृष्ट असायला हवे! अनेक गोष्टींचा दबाव असतो, पण अखेर तो आयुष्याचा भाग!


प्रश्न : अलीकडे प्रत्येक धर्म हा आपली धार्मिकता सोडून कट्टरतेची वस्त्रे घालत आहे… याबद्दल आपले मत काय आहे? – प्रतिराज (@PMangolikar)

उत्तर : या सगळ्या तात्पुरत्या गोष्टी आहेत. भविष्य प्रगल्भतेचे आहे!


प्रश्न : मराठी भाषेतील अर्थकारण वाढण्यासाठी YouTube या संकेस्थळावरील मराठी चित्रफिती पाहताना दाखविल्या जाणाऱ्या जाहिराती दुर्लक्षित न करता त्या पहाव्यात , हे तर्कशुध्द आहे का ? – (@pabuj)

उत्तर : पहाव्याच असे नाही. पण मराठीचा मुद्दा मांडणाऱ्या कोणाला जर एक सद्भावना म्हणून पहायच्या असतील तर पाहू शकतो! अखेर आपण जेंव्हा जाहिरात पाहतो तेंव्हा तिचा आपल्यावर नकळत का असेना परिणाम होतोच! अखेर यात जाहिरातदाराचाही फायदा आहेच!


प्रश्न : दादा वर्षाच्या पहिल्याच दिवशी(रात्री) तुम्हाला कट्ट्यावर बोलावलं…सेटिंग आहे का 😉 – (@jebita2018)

उत्तर : योग जुळून आला! बाकी काही नाही! 🙂


प्रश्न : बरं हा माझा शेवटचा आणि नेहमीचा प्रश्न 🙂 अभिनेत्री श्रद्धा कपूर बद्दल काही बोलणार का – पौर्णिम पवार (@pournimapawar98)

उत्तर : गोड मराठी मुलगी! 🙂 तिला मराठी चित्रपटात पाहायला आवडेल, पण त्यासाठी तिला व्यक्तिमत्त्वाचे वलय असलेला सुरेख चित्रपट मिळायला हवा. 🙂


जेंव्हा खूप सारे नोटिफिकेशन येतात, तेंव्हा ट्विटर व्यवस्थित काम करत नाही. त्यामुळे आज मी दिलेली काही उत्तरे पोस्ट झाली नाहीत, तरी उद्या ती मी पुन्हा पोस्ट करेन! सोबतच आणखी काही प्रश्नांची उत्तरे देणे बाकी आहे! उद्या सकाळी! शुभरात्र!

– रोहन जे (@vicharpravah)


प्रश्न : “ट्विटर” शब्दासाठी सुयोग्य मराठी शब्द शोधायचा असेल तर तुम्ही काय सुचवाल ? – (@pabuj)

उत्तर : ‘ट्विटर’ हे एक नाव आहे. त्यामुळे ‘ट्विटर’ला ‘ट्विटर’ म्हणनेच योग्य ठरेल!


प्रश्न : भारतस्तरावर कुठल्याही कामानिमित्त संभाषण हिंदीतूनच करावं ही मानसिकता मराठी माणसांमध्ये खोलवर रुजली आहे. हिंदी म्हणजेच भारत व देशासाठी हिंदीतूनच संभाषण असं बर्‍याच मराठीजणांचा विचार.. वरुन शाळेत चुकीचं बाळकडू शिकवलंच आहे की हिंदी ही राष्ट्रभाषा.. हिंदीत बोललो की आपण अधिक भारतीय बनतो.. या बद्दल आपले मत काय? – (@Satyanveshi1526)

उत्तर : आर्थिक, सामाजिक, तसेच राजकीय परिस्थितीमुळे मधल्या काळात असे समज निर्माण झाले. परंतु बदलत्या समिकरणांनुसार आता परिस्थिती देखील बदलू लागली आहे.


प्रश्न : मराठी संमेलन अध्यक्ष निवडणूक व स्थळ यावरून वाद होतांना दिसत आहे.या मागे एक पॅटर्न दिसून येतो या बद्दल रोहनजी आपल मत? – विष्णू (@_MeVishnu)

उत्तर : मराठी साहित्य संमेलनाची एकंदरीत प्रक्रिया बदलणे अत्यंत गरजेचे आहे. साहित्य संमेलनातून समाजासाठी ठोस असे काही साध्य व्हायला हवे.


प्रश्न : वेगळ्या विदर्भावर आपलं काय मत आहे ? – शुभम (@shubham_pb)

उत्तर : विदर्भ वेगळा झाल्यास तिथे हिंदीला मराठीसह राजभाषेचा दर्जा देण्यात येण्याची अत्यंत दाट शक्यता आहे. अशाने कालोघात तिथे मराठी भाषा आपोआप मागे पडेल. यात सर्वसामान्य मराठी माणसाचे प्रचंड नुकसान होईल. त्यामुळे संयुक्त महाराष्ट्रातच सर्व मराठी प्रांताचे हित सामावलेले आहे.


प्रश्न : रोहनजी,मराठी कलाकारंबद्दल काय वाटतंॽ ते मराठीचे तारक आहेत की मारकॽ दाखवतात एक व करतात एक असं वाटतं का आपल्यालाॽ – उमेश (@ParseUmesh)

उत्तर : त्यांच्यापैकी अनेकांच्या मनात मराठीप्रति प्रामाणिक भावना आहेत. पण ते देखील इतरांप्रमाणे बदलत्या परिस्थितीत गोंधळलेले आहेत. ‘ऐकमेकां साहाय्य करू अवघे धरू सुपंथ’ हे लक्षात घेऊन आपण प्रत्येकाने मराठीसाठी आपापली जबाबदारी उचलायला हवी.


प्रश्न : शिक्षण सेमी इंग्रजीतून किंवा इंग्रजी माध्यमातून झालेल्यांनी जर मराठीतून शिका असा आग्रह केला तर तो त्यांचा दुटप्पीपणा असेल का ? – अनिकेत देशमुख (@ankith_official)

उत्तर : आपण कोणत्या माध्यमातून शिक्षण घ्यावे हे आपले पालक ठरवतात. त्यामुळे पुढे जाऊन जर एखाद्याला मातृभाषेतून शिक्षणाचे महत्त्व पटले, आणि त्याने त्याकरिता मुद्दे पटवून दिले, तर त्यात काहीही वावगे नाही.


प्रश्न : ट्विटरवरील RT व Likes बद्दल काय वाटतंॽ – उमेश (@ParseUmesh)

उत्तर : ट्विटर हे केवळ व्यक्त होण्याचे एक माध्यम आहे. त्यात RT आणि Like म्हणजे प्रोत्साहनाची थाप! जे जे आपल्याला आवडते, चांगले वाटते त्यास आवर्जून प्रोत्साहन द्यावे.


‘ट्वविटरकट्टा’वर इतके प्रश्न आले आहे वाटतं रोहन यांना की अजून माझा छोटेसे प्रश्न या गर्दीत हरून गेले तर नाहीत ना 😉 मात्र रोहन भाऊंची प्रश्नांची उत्तरं पाहून त्यांच्या ज्ञानाची आणि विचारांची उंची समजते आहे ‘ट्विटरकट्टा’ मला तर खुपचं मस्त वाटतंय

– अमोल गोरे (@AmolUddhav)


प्रश्न : ‘कलेला भाषा नसते’ नावाची पाटी महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या माथी मारून व नंतर चित्रपटगृहासाठी न्याय मागताना अचानक भाषाप्रेमींकडे धाव घेणे कितपत योग्य आहे असे तुम्हाला वाटते? – सागर (@SagarKanire)

उत्तर : ‘कलेला भाषा नसते’ असे अनेकदा सोयीने म्हटले जाते. परंतु प्रत्यक्षात ‘कलेला भाषा असते’ हे अशाप्रकारे अप्रत्यक्षपणे वेळोवेळी सिद्ध झालेले आहे. आता ‘कलेला भाषा असते’ म्हणजे नक्की काय? याची प्रत्यक्ष मांडणी करणे आवश्यक आहे.


प्रश्न : हा हा टेक्निकल प्रश्न कितपत सत्य? मानवी मेंदूची क्षमता असते अदमासे २.५ पेटाबाईट. १ पेटाबाईट म्हणजे १००० टेराबाईट. १ टेरा बाईट १००० जीबी. मानवाचा मेंदू संगणकापेक्षाही जास्त गतीने काम करतो. आपला मेंदू एका सेंकदात ३८ हजार ऑपरेशन करू शकतो.. – जोशी काका (@joshisuresh285)

उत्तर : काका मला नक्की आकडेवारी माहीत नाही. परंतु कमीतकमी आजच्या घडीला तरी मानवी मेंदूची क्षमता ही निश्चितपणे अधिक आहे. दुसरे असे की मानवी मेंदू हा आजच्या सर्वसाधारण संगणकापेक्षा एका वेगळ्या पातळीवर काम करतो.


प्रश्न : मराठी सिनेमाला स्क्रीन मिळण्यासाठी आवाज उठवणारे कलाकार व काही पक्ष ग्रामिण भागातील मराठी शाळा बंद करण्याच्या निर्णयावर मात्र शांत दिसतात? – विष्णू (@_MeVishnu)

उत्तर : कमीतकमी ग्रामीण भागासाठी काम करणारे मराठी कलावंत आणि राजकीय पक्ष यांनी तरी याबाबत काही भूमिका घ्यायला हवी असे मला वाटते.


प्रश्न : रोहनजी फेसबुक वर होणाऱ्या अतिरेकाला कंटाळुण ट्विटर वर मी आले, तरी काही नालायकि वृत्तींचा त्रास विनाकारण सहन करावा लागतो वाटतं सोशल साईट्स न वापरलेलच बरं. काय करायला हवं?? – सिमा (@me_seema_)

उत्तर : समाज म्हटले की सर्व प्रकारची माणसे येतात आणि अखेर हे एक समाजमाध्यम आहे. तरी कमीतकमी इथे आपण नको असलेल्या लोकांना ब्लॉक करू शकतो.


रोहन दादा तुमचा विचारप्रवाह कमालीचा आहे…1नंबर प्रेरणादायी मी तर तुमच्या विचाराचा,हुशारीचा फॅन झालोय.. तुम्ही आमच्या सोबत मिञाप्रमाने रहा,आम्हाला काही मदत मागायला संकोच नाही वाटणार.. तुमच्या टॅलेंटची आमच्या सारख्या नवख्या ट्विटरकराना खुप गरज

– पिनू भाऊ (@shinde_pinu)


प्रश्न : माझं रोहन बद्दल चं एक वेगळं मतं  ‘रोहन’ हे नाव कोणत्याही एका विचारसरणीला वा बाजूला वाहिलेलं नाही. त्यामुळे तुमच्याकडे सर्व प्रकारच्या विचारचं स्वागत आणि योग्य टिका होते हे माझे मत योग्य आहे का ? – अमोल गोरे (@AmolUddhav)

उत्तर : समतोल दृष्टीने विचार मांडण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो अमोल! खूप खूप आभारी आहे!


प्रश्न : आवडती इंग्रजी सिरीज कुठली? – परिक्षित (@Parix26)

उत्तर : आवडती इंग्रजी सिरीज सांगण्यापेक्षा मी पाहिलेल्या इंग्रजी सिरीज सांगतो. Friends, How I Met Your Mother, Two and a Half Men, Silicon Valley, Big Bang Theory, Constantine, etc.


प्रश्न : मी एक संगणक दुरुस्ती करतों. नेटवर्किंग पण जमते सध्या. डिजिटल मार्केटिंग चे शिक्षण घेतोय मला काही मार्गदर्शन. – (@marathipamu)

उत्तर : तुमच्याकडे खूप चांगले कौशल्य आहे. आपण स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याबाबत विचार करावा. मला वाटतं त्यात तुम्हाला चांगले यश मिळेल.


प्रश्न : आपला आवडता लेखक कोणता? – (@PuneriSpeaks)

उत्तर : प्रत्येकाकडून काहीतरी शिकण्यासारखे असते. तेंव्हा आवडता असा लेखक कोणताही नाही.


प्रश्न : काही राजकीय पक्षांबद्दल मतं मांडलीत आपण. काय वाटतं या राजकीय पक्षांबद्दलॽ कुणी तिकीट देऊ केलंत तर जाल का राजकारणातॽ – उमेश (@ParseUmesh)

उत्तर: दूर भविष्यात महाराष्ट्रासाठी जर कधी गरज पडलीच तर कदाचित मी राजकारणात उतरण्याचा प्रयत्न करेन! पण सध्या मात्र मला त्याची आवश्यकता वाटत नाही.


प्रश्न : संगणकाची गोष्ट च्या वाचकांसाठी काही संदेश? वाचकांचा प्रतिसाद कसा होता? – दिगंबर (@Digamber)

उत्तर : संगणकाची गोष्ट’ या पुस्तकाला अपेक्षेप्रमाणे वाचकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. लवकरच या पुस्तकाला एक वर्ष पूर्ण होत आहे. तेंव्हा मी यासंदर्भात माझ्या ब्लॉगवर सविस्तर विस्ताराने लिहीन.


प्रश्न : फावल्या वेळेत काय करायला आवङतं ? – अनघा (@AnaghaSawant3)

उत्तर : चित्रपट पाहणे, गाणी ऐकणे, वाचन करणे आणि सोबत आपले युट्युब, ट्विटर आहेच! 🙂


प्रश्न : संगणक ची Programming Language देवनागरी / मराठी लिपीत करता येईल का? याबद्दल तुमचं काय मत?? – प्रशांत पोटेकर (@PotekarPrashant)

उत्तर : शक्य आहे, पण तिचा व्यवहारात वापर होणे सध्यातरी कठीण आहे.


प्रश्न : रोहनजी, तुमची तीन तीन ट्विटर खाती आहेत, म्हणजे मला जी माहित आहेत ती, कसं सांभाळताॽ – उमेश (@ParseUmesh)

उत्तर : माझ्या इतर ट्विटर खात्यांवरून मी तुलनेने कमी सक्रिय आहे.


प्रश्न : एक-दोन अपवाद वगळता मराठी कलाकार दाक्षिणात्य कलाकारांप्रमाणे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कधी आवाज उठवतांना दिसत नाही? या बद्दल आपल मत? – विष्णू (@_MeVishnu)

उत्तर : नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे, सयाजी शिंदे असे काही कलाकार ग्रामीण भागासाठी काम करत असतात. दक्षिणेची सांस्कृतिक परिस्थिती आणि महाराष्ट्रातील सांस्कृतिक परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे इथे मराठी कलाकार कोणत्याही प्रश्नावर ठाम भूमिका घेत नाहीत, जे समजून घेण्यासारखे आहे.


प्रश्न : महाविद्यालयात मराठी विषय घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होत आहे .मराठी अधिकाधिक व्यवसायाभिमुख झाली तर मराठी विषयाकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही वाढेल. याबद्दल काय मत आहे आणि काय उपाय सुचवाल ? – निकिता विचारे (@Nikitasvichare)

उत्तर : आपण सर्वजण दैनंदिन व्यवहारात मराठी भाषेचा जेव्हढा अधिक वापर करू तेव्हढे मराठी भाषेमागील अर्थकारण वाढीस लागेल. तेंव्हा मराठीला व्यवसायाभिमुख करणे ही आपल्यापैकी प्रत्येकाची जबाबदारी आहे. सुमारे १० कोटी लोक मराठी भाषा बोलतात. या भाषेत खूप मोठी आर्थिक ताकद आहे.


प्रश्न : समविचारी लोकांबरोबर जोडून घ्यायला सोशल मीडिया तुम्हाला उपयोगी पडतो का ? – अमोल गोरे (@AmolUddhav)

उत्तर : हो.. खूप उपयोग होतो.


प्रश्न : संगणकाची गोष्ट हे पुस्तक कुठे मिळेल ? – (@Pramoddhayalkar)

उत्तर : माझ्याकडे!


प्रश्न : महाराष्ट्रातील सध्याचे राजकारणी हिंदी भाषा जबरदस्तीने महाराष्ट्रावर लादत आहेत असे वाटते का ? त्याच्या विरुदध आपण कसा प्रतिकार करणार ? – अभिजित औताडे (@abhiautade)

उत्तर : हो.. महाराष्ट्रावर हिंदी भाषा जबरदस्तीने लादण्यात येत आहे. आपण स्वतः पूर्णपणे मराठी राहणे, सरकारला कायदा पाळायला लावणे, महाराष्ट्रवादी पक्षांना झुकते माप देणे असे काही उपाय आपल्या हातात आहेत.


प्रश्न : तुम्ही नवीन वर्षाचं स्वागत कशा प्रकारे केलं? – दशरथ सोनवणे (@Dasharathsonaw3)

उत्तर : रोजच्या दिवसाप्रमाणे! 🙂


प्रश्न : मराठी टंकित करण्याच्या सवयीमुळे या पिढीची लेखणीने लिहिण्याची सवय मोडली आहे का काय वाटते? – (@mibawari)

उत्तर : टंकलेखनामुळे प्रत्यक्ष लिहिण्याची सवय मोडली नसली, तरी कमी झाली आहे हे खरे!


प्रश्न : रोहनजी, मराठीभाषिक हिंदी प्रेमींना काय सल्ला द्यालॽ – उमेश (@ParseUmesh)

उत्तर : माणसाने नेहमी स्वतःशी प्रामाणिक असावे. आपण कोण आहोत? याचा कधीही विसर नसावा.


प्रश्न : तुमची अजुन पुस्तकें येणार आहेत का? जेव्हा तुम्ही लिहित नसता, तेव्हा तुम्ही काय करता? – दिगंबर (@Digamber)

त्तर : माझी अजून पुस्तके निश्चतपणे येतील. जेंव्हा मी लिहीत नसतो, तेंव्हा कोणत्यातरी विषयावर चिंतन करत असतो.


प्रश्न : मागील वर्षातील तुमची सर्वात जास्त लक्षात राहिल अशी घटना ? – दशरथ सोनवणे (@Dasharathsonaw3)

उत्तर : मागील वर्षी मी ‘संगणकाची गोष्ट’ हे माझे पुस्तक प्रकाशित केले.


प्रश्न : आम्हाला सोबत घेऊन चालण्यासाठी मराठी हँडल पाहिजे एवढे सहकार्य करत नाही.त्यासाठी आम्ही काय करायला पाहिजे ? – (@MarathiAshtapa1)

उत्तर : आपण एखादा चांगला मराठी उपक्रम सुरू करावा. इथे चांगल्या कामास सगळे सहकार्य करतात.


प्रश्न : प्रश्न थोडा खट्याळ आहे मात्र उत्तर द्या बरं 🙂 तुम्ही नवीन वर्षात तुमचा (Display Picture ) बद्दलण्याचा विचार आहे करत आहात का विचार प्रवाहामध्ये 😉 – अमोल गोरे (@AmolUddhav)

उत्तर : एखादा छान फोटो निघाल्यास नक्कीच बदलेन!


प्रश्न : ‘मराठी’ शिवाय अजून कोण कोणत्या भाषा बोलायला जमतात? – सायली (@RSayaali)

उत्तर : मराठीवर माझे प्रभुत्त्व आहे. पण इंग्लिश आणि हिंदी या भाषा मला बऱ्यापैकी जमतात.


प्रश्न : मराठी माणुस ह्याचा त्याचा झेंडा हातात घेउन फिरत आपल्या आयुष्याची महत्वाची वर्ष वाया घालवतो असे वाटत नाही का ? – अभिजित औताडे (@abhiautade)

उत्तर : हो.. आपली स्वतःची गुणवत्ता आणि कार्यक्षमता वाढवण्याकडे आपला कल असायला हवा.


प्रश्न : तुम्ही शाळेच्या किंवा महाविद्यालयात असताना कधी कोणावर प्रेम केलं का ? 😉 – अमोल गोरे (@AmolUddhav)

उत्तर : सगळ्यांनाच कोणीतरी आवडत असतं! 🙂


प्रश्न : ट्विटरकरांपैकी तुझे पहिले पुस्तक पैसे देऊन कुणी विकत घेतले! – गोपाळ (@madanegopal)

उत्तर : @minitinnaik ही गोष्ट मी कधीही विसरणार नाही! 🙂


रोहन 🙂 सांगायला आनंद होतोय की तुझं पुस्तक आतापर्यंत माझ्यासहित १५ जणांनी वाचून पूर्ण केलंय!

– नितीन (minitinnaik)


प्रश्न : १.चित्रपट प्रकारांमध्ये तुमची सर्वात आवडती शैली (Genre) कोणती? २.आपला सर्वात आवडता/आवडते दिग्दर्शक कोणते? – (@malvanispices)

उत्तर : साहसरम्य (Adventure) चित्रपट, तसेच निखळ विनोदी चित्रपट!


प्रश्न : यशस्वी करियरसाठी तुमच्या दृष्टीने सर्वाधिक प्राधान्य कशाला असायला हवं.. ( काही पॉईंट ) – नरेंद्र पवार (@narenspeaks1)

उत्तर : करिअर घडवण्याकरिता गुणवत्तेच्या जोडीला कार्यक्षमता असणे अत्यंत गरजेचे आहे. तेंव्हा आपले ज्ञान आणि कार्यक्षमता वाढवण्याच्या दृष्टीने भर असावा. कार्यक्षमतेसाठी मन आणि शरीराचे संतुलन महत्त्वाचे!


प्रश्न : रोहन एका दिवसासाठी तुला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री केल्यास कोणते 3 निर्णय त्वरित घेशील? – गोपाळ (@madanegopal)

उत्तर : तीन निर्णय संगण्याऐवजी मी तीन धोरणे काय असतील? ते सांगतो! १. जनतेच्या भाषेत जनतेसाठी राज्यकारभार २. गुणवत्तेला प्रोत्साहन ३. आधुनिकतेची कास


प्रश्न : मराठी चा मुद्दा मांडताना भारताच्या संघराज्य ढाच्याला आपण कुठे तरी धक्का पोहोचणार नाही याची काळजी घ्यावी अस वाटत का ? – निलेश (@inileshj)

उत्तर : जोपर्यंत लोकशाही मार्गाने लढा सुरू आहे, तोपर्यंत कोणतीही काळजी करण्याची आवश्यकता नाही. कारण अखेर माणसासाठी व्यवस्था आहे, व्यवस्थेसाठी माणूस नाही.


प्रश्न : सोशल मिडियावर मराठीत व्यक्त होताना मराठी माणूस कमी पडतोय असे वाटते का? तुमचे निरिक्षण. – (@DnyaneshwarGk7)

उत्तर : अजिबात नाही वाटत. उलट मराठीतून व्यक्त होण्याचे प्रमाण दिवसागणिक वृद्धिंगत होत आहे. आता अधिकाधिक लोक मराठीकडे वळत आहेत.


प्रश्न : सोशल मीडियामुळे तुम्हाला तुमची (आयडेंटिटी) स्वओळख मिळाली आहे असं वाटतं का ? 😉 – अमोल गोरे (@AmolUddhav)

उत्तर : हो.. नक्कीच! 🙂


प्रश्न : ‘मराठी’साठी निस्वार्थीपणे काम करणारा पक्ष कुठला…?? – नितीन (@Ni3_Sonwale)

उत्तर : राजकीय पक्षाला स्वार्थ असणे अपरिहार्य आहे!


प्रश्न : बरेच ‘मराठी’ लोक आपल्या इथे ‘हिंदी’ मध्ये का बोलतात?? – विजय स्वामी (@shyvijay)

उत्तर : हिंदी राष्ट्रभाषा असल्याचा गैरसमज आणि आता सवय!


प्रश्न : ‘महाराष्ट्र’ मध्ये भविष्यातील राजकारण कस असेल?? कोणत्या नेत्यांकडून तुम्हाला अपेक्षा आहेत?? – विजय स्वामी (@shyvijay)

उत्तर : महाराष्ट्रातील राजकारण जुन्या वैचारिकतेवर आपले दिवस काढत आहे. आता महाराष्ट्राची वैचारिकता अद्ययावत होण्यास सुरुवात झाली आहे. तेंव्हा येत्या काळात महाराष्ट्रातील राजकारणात आपल्याला बदल पाहायला मिळतील! कदाचित यातून महाराष्ट्रात एक नवे सर्वव्यापी नेतृत्व उदयास येऊ शकेल!


प्रश्न : तुमच्या मते मराठी म्हणजे काय?? प्रत्येक ठिकाणी मराठीच वापरावी या विषयी तुमचं मत काय??? – पिनू भाऊ (@shinde_pinu)

उत्तर : ‘भाषा’ आपल्या अस्तित्त्वाला व्यवहाराशी जोडते. ‘मराठी’ हा आपल्या अस्तित्त्वाचा व्यवहार आहे. जिथे जिथे आपल्याला आपले अस्तित्त्व हवे आहे, तिथे तिथे आपण आपली भाषा वापरायला हवी.


प्रश्न : असा प्रसंग सांगा तो आठवला की नकळत तुमच्या चेहऱ्यावर हसू येते ? – स्वरुप रहाणे (@swaruprahane)

उत्तर : एक असा प्रसंग सांगता येणार नाही. अनेक लहान-सहान प्रसंग असतात, जे आठवल्यानंतर कधी नकळत हसू येते, तर कधी हसता-हसता पुरेवाट होते!


प्रश्न : मराठी भाषेच्या विस्तार करण्यासाठी तुमच्या मनात एखादी नवीन कल्पना अथवा उपक्रम? – स्वरुप रहाणे (@swaruprahane)

उत्तर : महाराष्ट्राची वैचारिकता कालसुसंगत आणि अद्ययावत करण्याची आवश्यकता आहे. मी शक्यतो वृत्तपत्रात लिहिणे टाळतो. पण यावर्षी वृत्तपत्रातून लिहिण्याचे मनावर घेईन!


प्रश्न : मराठी भाषेचं संवर्धन झालंच पाहिजे पण भाषेचा राजकारणासाठी होणार वापर कितपत योग्य वाटतो. – अनुराग (@anurag291199)

उत्तर : समाजकारण आणि राजकारण या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, तेंव्हा कोणताही मुद्दा राजकारणापासून दूर राहू शकत नाही. उलट मला वाटतं की सगळ्याच राजकीय पक्षांनी मराठी भाषेचं प्रामाणिक राजकारण करावं, जेणेकरून त्यातून काही चांगले साध्य होऊ शकेल.


प्रश्न : संगणकाची गोष्ट पूर्ण करण्यासाठी कीती दिवस (महीने) लागले? थोडक्यात त्याबद्दल माहिती ऐकायला आवडेल. – दिगंबर (@Digamber)

उत्तर : साधारण १० महिने! त्यानंतर संपादन आणि प्रकाशन यास २-३ महिन्यांचा कालावधी लागला.


प्रश्न : महाराष्ट्राच्या स्वायत्ततेचा आपणाकडून अनेकदा उल्लेख होतो, “स्वायत्तता” म्हणजे आपल्याला नेमक काय अपेक्षीत आहे हे थोड स्पष्ट करा – निलेश (@inileshj)

उत्तर : व्यापक हिताच्या दृष्टीने काही ठराविक गोष्टींशी बांधील राहून उर्वरित साऱ्या गोष्टींचे निर्णय स्वतः घेणे!


प्रश्न : मराठी या नावाने ट्विटर वरती खूप लोक हे आपल्या पक्षाचा आणि संघटने साठी वापरतात यावरती आपले मत – दादासाहेब गाटे (@dadagate)

उत्तर : अनेकांना भाषा प्रिय असते आणि भाषेसोबत भाषेचा मुद्दा उचलणारा राजकीय पक्ष, संघटना प्रिय वाटू लागते. जसजशी प्रगल्भता वाढत जाईल, या गोष्टी कमी होतील!


प्रश्न : मराठी शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी काय सांगशील? – अनिल काळे (@anil_kalepatil)

उत्तर : सर्वप्रथम अभ्यासक्रमाचे स्वरूप बदलण्यापासून सुरुवात करावी लागेल. दुसरे म्हणजे जेव्हढे पैसे इंग्लिश शाळेवर खर्च केले जातात, त्याच्या काहीप्रमाणात तरी मराठी शाळेवर खर्च व्हावेत. त्यासाठी शालेय फी वाढवावी लागेल. त्यातून शिक्षकांना प्रशिक्षण, आधुनिक सुविधा देता येतील.


प्रश्न : तुम्हाला दुसऱ्यांची मते कधीच पटत नाहीत! नेहमी स्वतःचीच खरी वाटतात. या बद्दल आपलं काय मत आहे? – शलाका (@itsshalaka)

उत्तर : मला जे पटतं ते मी नेहमीच मोकळ्या मनाने स्वीकारतो, आणि म्हणूनच मी जे बोलतो ते इतरांना पटतं! 🙂


प्रश्न : आवडता गायक ??? – पौर्णिमा पवार (@pournimapawar98)

उत्तर : जे गाणे मनापासून आवडते, ते गाणे गाणारा! 🙂


प्रश्न : अभिव्यक्तीसाठी अर्थात व्यक्त होण्यासाठी तुम्ही सोशल मीडिया वापरतात मात्र काही गोष्टी बघून वाटतं का ? की कुठं तरी या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला मर्यादा असावी का ? यांवर तुमचं मत काय – अमोल गोरे (@AmolUddhav)

उत्तर : म्युट करणे, ब्लॉक करणे, दुर्लक्ष करणे, फिल्टर वापरणे, तक्रार करणे असे अनेक उपाय आपल्याकडे आहेत. तेंव्हा समाजमाध्यमांवर अतिरिक्त बंधनांची आवश्यकता आहे असे वाटत नाही.


प्रश्न : आत्ताच्या सरकारविषयी थोडक्यात? – दशरथ सोनवणे (@Dasharathsonaw3)

उत्तर : सध्याचे सरकार एका विशिष्ट विचारसरणीशी बांधील आहे. त्यामुळे त्यांच्याकडून मर्यादित अपेक्षा आहेत.


प्रश्न : मराठी भाषाचं वैभव वृधिंगत करण्यासाठी काय करता येईल असं तुम्हाला वाटतं? जसे बरेच ईंग्रजी शब्दांसाठी पर्यायी शब्द देणे आणि वापरात आणणे. – पियुष (@PiyushNamra)

उत्तर : भाषेमध्ये व्यक्त होत असताना काही मोकळ्या जागा असतात, अनेकदा इतर भाषेतील शब्द त्या जागा आपसुक भरून काढतात. त्याचवेळी मराठीतील मूळ शब्दाची जागा इतर भाषेतील शब्द घेणार नाहीत याची काळजी घ्यायला हवी. आपल्या भाषेत शब्दनिर्मिती करता आली तर उत्तमच! पण अट्टाहासही नसावा!


प्रश्न : महाराष्ट्रात खुप वेळेस काहींना इतर भाषेचा पुळका दिसून येतो पण दक्षिण भारतात ते त्यांच्या भाषेसाठी कट्टरवादी असतात. आपल्याकडे असे परिवर्तन केव्हा होईल ? – (@praveengavit)

उत्तर : मध्यंतरीच्या काळात महाराष्ट्र वैचारिक गोंधळात अडकला होता. परंतु आता नवीन पिढीसोबतच नवे विचार महाराष्ट्रात रुजू लागले आहेत. वैचारिकता हा महाराष्ट्राचा पाया आहे. तेंव्हा येत्या काही वर्षांत महाराष्ट्रातील भाषिक चळवळ वैचारिकतेच्या दिशेने पुढे गेलेली पाहायला मिळेल.


प्रश्न : कोणतं गाणं आवडतं रोहन होऊन जाऊदे 2 ओळी तुझ्या आवाजात 😉 – गोपाळ (@madanegopal)

उत्तर : नशीब! हा खराखुरा Live कट्टा नाही! 😉


प्रश्न : रोहनजी मराठी, महाराष्ट्र या बद्दलचा आदर मनामनांमध्ये तर आहेच पण स्वभाषे साठी आग्रही असणाऱ्यांचा अतिरेक कितपत योग्य? – सिमा (@me_seema_)

उत्तर : भाषेवरील अन्याय जसा दूर होईल, भाषेभोवतालचा वैचारिक गोंधळ जसा कमी होईल, तशी भाषेशी निगडित असुरक्षिततेची भावना देखील ओसरू लागेल. परिणामी भविष्यात भाषेचा अतिरेक दिसून येणार नाही.


प्रश्न : मराठी भाषेसाठी प्रयत्न चालू असताना हिंदीकरणाला ठाम विरोध होतो मात्र इंग्रजी भाषेला मांडीवर घेऊन कुरवाळले जाते हे कितपत योग्य? व्यवसायिक शिक्षण सुद्धा मराठीत उपलब्ध होऊ शकते की आणि इंग्रजी वाचून काही अडत नाही याचे उत्तम उदाहरण चीन आहेच. – मार्मिक (@Rajgurunagar)

उत्तर : इंग्लिश भाषा लोकांनी स्वतःहून स्वीकारली आहे आणि हिंदी भाषा कायद्याने लादली जात आहे हा मुख्य फरक आहे. हिंदीमुळे उत्तर भारतीयांना इतर भारतीयांपेक्षा अधिकचा फायदा मिळतो. हा भेदभाव आहे. इंग्लिश भाषेमुळे प्रत्येकाला समान संधी मिळते.


प्रश्न : नवीन कर पद्धतीत(GST) मध्ये लेखण साहित्यावर छपाई, पुस्तक बांधणी यांचा खर्च वाढला आहे, पूर्वी लेखकांना रॉयल्टीवर 15% सेवाकर द्यावा लागत होता आता GST 18% द्यावा लागतोय यावर तुझे मत काय? – मार्मिक (@Rajgurunagar)

उत्तर : लेखकाला वा प्रकाशकला अधिकचा कर द्यावा लागणार असल्याने अप्रत्यक्षपणे पुस्तकांच्या किंमतीत भर पडेल. कला व साहित्य समाजाच्या उत्कर्षाला कमी मोबदल्यात मोठा हातभार लावतात. तेंव्हा कला, तसेच साहित्य क्षेत्रास नवीन कर प्रक्रियेतून वगळायला हवे होते किंवा सवलत द्यायला हवी होती असे वाटते.


मी साऱ्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. नजरचुकीने एखाद्या प्रश्नाचे उत्तर देणे राहून गेले असेल, तर सांभाळून घ्यावे.. मला व्यक्त होण्याची संधी दिली याबद्दल ‘मराठी ट्विटरकट्टा’, ‘मराठी विश्वपैलू’ आणि आपणा सर्वांचे अगदी मनःपूर्वक आभार!

– रोहन जे (@vicharpravah)


खूप छान उत्तरे दिलीत, भावी वाटचालीस आपणास खूप शुभेच्छा!

– मराठी ट्विटरकट्टा (@TweetKatta)


प्रशस्ती

कौशल इनामदार (कौशलदादा) - ट्विटरकट्टा ३३


@ksinamdar होय, अगदीच. कधीच संपू नये वाटणारा कट्टा.

– मराठी रिट्विट (@MarathiRT)


@ksinamdar सुंदर विश्लेषण. खरंतर रोहनजींची विचार मांडण्याची शैली खूप भावते. खूप छान लिहितात. वैयक्तिक मत सांगायचं तर त्यांच्या लिखाणामुळे मला खप फायदा होतोय. मराठी विषयावर सर्वांना कस अनुकूल बनवायचं, आपले मुद्दे कसे मांडावे हे शिकण्यासारखे आहे. या उपक्रमासाठी सर्वांचे आभार

– सूरज (@soorajgawde)


पहिल्यांदा कटटयावरचे सगळे टविट वाचले गेले खुपच मस्त

– अनुराग (@anurag291199)


यंदाचा ‘ट्विटरकट्टा’ झकास रंगला, आपले आवडते रोहन ह्यांच्यासोबत झालेल्या संवादातील सडेतोड,स्पष्ट,नेटक्या आणि नेमक्या उत्तरांतून भरपूर शिकायला मिळालं, हे सगळं पुढं वापरण्यासाठी आम्ही नोंद करून ठेवत आहोत, आयोजकांचे आभार! 

– मराठी आमुची मायबोली (@Marhathi)


~ सांगता ~


About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.