राजकारण

डॉनल्ड ट्रम्प : किमयागार की कॉन आर्टिस्ट?

कोणत्याही क्षेत्रात जर सर्वोच्च पदावर पोहचायचं असेल, तर एक तर तुम्हाला सर्वोत्तम असावं लागतं आणि दुसरं म्हणजे तुम्ही सर्वोत्तम आहात हे तुम्हाला माहीत असावं लागतं. सर्वोत्तम असणं हे अव्यक्त असू शकतं, चांगल्या किंवा वाईट गुणवैशिष्ट्यांचं मिश्रण असू शकतं, पण जो खरंच सर्वोत्तम असतो, त्याला त्याच्या अंतरातम्यातून माहीत असतं की तो सर्वोत्तम आहे! काहीजण ट्रम्पनां जगातील सर्वोत्तम ‘उद्योजक’ मानतात, काहींच्या मते ते आजवरचे सर्वोत्तम ‘कॉन आर्टिस्ट’ आहेत, तर काहींसाठी ट्रम्प हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वोत्तम राष्ट्राध्यक्ष आहेत! खरं काही असो, पण ज्याअर्थी ते आज एका महाशक्तीचे नेतृत्त्व करत आहेत, त्याअर्थी ते सर्वोत्तम आहेत आणि ही गोष्ट त्यांना स्वतःला देखील चांगलीच ठाऊक आहे!

डॉनल्ड ट्रम्प सारखी व्यक्ती मला माझ्या आसपास आवडेल का? कदाचित नाही..! पण या जगात काही जागा अशा असतात, ज्या केवळ काही विशिष्ट व्यक्तीच भरून काढू शकतात. उदारतेच्या नावाखाली भ्रष्ट झालेल्या राजकाराण्यांना, विधात्याच्या आविर्भावात वावरणाऱ्या पत्रकारांना आणि बुद्धिवादाचा अभिनय करू पाहणाऱ्या कलाकारांना ताळ्यावर आणणे ही काळाची गरज होती आणि त्या गरजेतूनच डॉनल्ड ट्रम्प नावाच्या व्यक्तीमत्त्वाचा उदय झाला आहे. डॉनल्ड ट्रम्प हे अचानक राष्ट्राध्यक्ष झालेले नाहीत, राष्ट्राध्यक्ष होण्याचा विचार काही दशकांपासून त्यांच्या मनात घोळत होता. पण राजकारण हे काही त्यांचे प्रमुख कार्यक्षेत्र नव्हते, त्यामुळे जिंकण्यासाठी ते अगदी चाणाक्षपणे योग्य वेळेची वाट पहात होते. २०१४च्या सुमारास ही वेळ आपसुक चालून आली आणि एका कसलेल्या उद्योजकाप्रमाणे त्यांनी ती अजिबात दवडली नाही.

उदारतेच्या छत्रछायेखाली जेंव्हा युरोपात अनियंत्रित बेकायदेशीर स्थलांतर सुरू झाले, तेंव्हा अमेरिकेवर त्याची पडछाया पडणे स्वाभाविक होते. सर्वसामान्य माणसाला वेठीस धरून त्यास ‘पॉलिटिकली करेक्ट’ करू पाहणाऱ्या माध्यमांना व राजकारण्यांना जेंव्हा एक ‘पॉलिटिकली इनकरेक्ट’ माणूस शब्दांमध्ये पकडू लागला, त्यांची खिल्ली उडवून त्यांना नामोहरम करू लागला, तेंव्हा जेरीस आलेल्या जनतेने त्यास उचलून धरणे स्वाभाविक होते, स्वतः डॉनल्ड ट्रम्प यांना देखील हेच हवे होते. अखेर ट्रम्प यांच्यातील धूर्त उद्योजकाला राजकीय सत्याची जोड मिळाली आणि त्यांनी भल्याभल्यांना पाणी पाजत राष्ट्राध्यक्ष होण्याची किमया करून दाखवली! ट्रम्प यांच्यावर विनोद करता करता आपले स्वतःचेच हसू कधी झाले याचा स्टेफन कोलबर्ट, जॉन ऑलिव्हर, जिमी किमल सारख्या होस्टना पत्ता देखील लागला नाही. आपण लोकांना प्रभावित करू शकतो, पण त्यांना गृहीत धरू शकत नाही हा धडा माध्यमांनी यातून घ्यायला हवा.

बाकी उदारतेच्या अनियंत्रित गाडीला ब्रेक लावण्याचे कार्य ट्रम्प यांच्या हातून घडले असले, तरी जगभरातील हा बदल तात्पुरत्या स्वरूपाचा आहे. मुळात जगाला प्रगती हवी आहे आणि त्यासाठी डोळस उदारमतवाद गरजेचा आहे. स्वतःला उदारमतवादी म्हणवणाऱ्या माणसांना आत्मचिंतन करण्यास सध्याचा बदल प्रवृत्त करेल. शेवटी आंधळ्या उदारमतवाद्यांना जेव्हढ्या लवकर दृष्टी प्राप्त होईल, तेव्हढ्या लवकर सत्तेची चाके पुन्हा त्यांच्या हाती येतील. पण जोपर्यंत त्यांना आपली चूक लक्षात येणार नाही, तोपर्यंत डॉनल्ड ट्रम्प यांच्यासारखे तथाकथित कॉन आर्टिस्ट आपली किमया दाखवत राहतील!

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.