सामाजिक

कर्जाच्या बढाया

सर्वसामान्य माणसाच्या मनात स्वतःबद्दल एक कमीपणाची भावना खोलवर रुतून बसलेली असते आणि त्यामुळेच तो यथासंधी बढाई मारण्याच्या प्रयत्नात असतो. कर्ज काढून कसेबसे एखादे घर घेणार आणि मग स्वतःचे घर आहे म्हणून बढाई मारणार! कर्ज काढून कार घेणार आणि मग पेट्रोल परवडत नाही म्हणून बहुतांश काळ ती दारातच लावून ठेवणार! ..आणि वर आमच्याकडे कार आहे म्हणून बढाई मारणार! जो पर्यंत आपण कर्ज पूर्ण फेडत नाही, तोपर्यंत कर्जाने घेतलेल्या वस्तूवर केवळ आपल्या एकट्याचा अधिकार नसतो, तर कर्ज देणार्‍याचा देखील अधिकार असतो. तेंव्हा कर्ज घेऊन घेतलेली गोष्ट आपली कशी? ते मला काही समजत नाही.

मुलीसाठी स्थळ बघत असताना मुलाचा पुण्यात फ्लॅट आहे या एका बढाईवर मुलगी त्या घरी दिली जाते. पण या फ्लॅटच्या कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी आपल्या मुलीला आयुष्यभर नोकरी करावी लागू शकते, हे पाहिले जात नाही. आजकाल तर केवळ कार असूनही भागत नाही, तर ती किती महाग आहे!? ते आवर्जून सांगावे लागते. आपल्याला लाल दिव्याची गाडी मिळाली, आपल्याला टोल भरावा लागत नाही, याचे पोलिसांना कौतुक! हा सर्वसामान्य जनतेने उत्स्फुर्तपणे दिलेला सन्मान नसून केवळ व्यवस्थेनी केलेली सोय आहे, इतका सखोल विचार करण्याची प्रवृत्ती दूर्देवाने यांच्याजवळ असत नाही.

आता बढाई मारणारा मारतो, ते एकवेळ जाऊ दे.. पण ही बढाई ऐकणारा सर्वसामान्य माणूस त्याने प्रभावित होतो हे विशेष! ज्याला स्वतःच्या योग्यबद्दल स्वतःच्या मनात शंका नाही, त्यास स्वतःचं महत्त्व हे असं दुसर्‍यांस ‘बढाया’ सांगून सिद्ध करावं लागत नाही. असे लोक शांत व नम्र असतात. इतरांच्या बढायांचा यांच्या मनावर परिणाम होत नाही. लोक बढाई का मारतात? तर त्यांना नसलेला मान हवा असतो, सन्मान हवा असतो. त्यामुळे उसनं आवसन आणल्याप्रमाणे ते ‘उसण्या बढाया’ मारतात, कर्ज काढून ‘कर्जाच्या बढाया’ मारतात. लोकांना आसुया वाटावी असा देखील त्यामागे छुपा हेतू असतो. ज्यांना स्वतःच्या योग्यतेबद्दल शंका आहे, त्यांस नक्कीच आसुया वाटू शकते. पण मनातून संपूर्ण समाधानी असलेल्या व्यक्तिस अशी आसुया वाटण्याचे कारण नाही. अशा व्यक्तिसमोर मात्र हे बढाईखोर नामोहरम होतात. त्यांना जे पाहिजे असते, ते ‘तृप्त’ माणसाकडून मिळत नाही.

माणसाने आपण जे आहोत, त्याच्याशी प्रामाणिक रहायला हवे. ‘कर्जाच्या बढाया’ त्या काय मारायच्या? कारण कधी ना कधी व्याजासकट अशा बढायांची परतफेड ही करावीच लागते.

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.