Uncategorized

आमच्या काळचे हवामान

काल सकाळी फारच अल्हाददायक वातावरण होते. स्वच्छ सूर्यप्रकाश आणि त्यात गुलाबी थंडी असेल, तर मन अगदी प्रसन्न होते! आता ‘गुलाबी थंडी’ म्हणजे नक्की काय? हे मला पक्कं ठाऊक नसलं, तरी ‘स्वच्छ सूर्यप्रकाशात हलक्याश्या हवेसोबत स्पर्श करणारी किंचीत आद्रतायुक्त थंडी’ असा नेमका अर्थ मला स्वतःला व्यक्तिगतरीत्या त्या तिथे अभिप्रेत आहे. मुंबईत काल दुपारीच पाऊस सुरु झाल्याचे ट्विटरवरुन समजले होते.. त्यानंतर इकडे देखील दिवस मावळता मावळता पावसास सुरुवात झाली. मग काय!? नेहमीप्रमाणे एमएससीबीवाल्यांनी लपाछपीचा खेळ सुरु केला. पण आज त्याबाबत मला काही बोलायचे नाही. ‘हवामानातील बदल’ हा आजचा आपला विषय आहे.

अनेकांना कदाचित माहित नसेल.. शिवजी महाराज व त्यानंतर मराठा साम्राज्याच्या काळात पृथ्वीवर छोटेसे हिमयुम सुरु होते. ही गोष्ट अगदी स्वतः नासाने नमूद केली आहे. तेंव्हा कालपरत्वे नैसर्गिक कारणांनी पृथ्वीच्या एकंदरीत उष्णतेत फरक पडत असतो, हे या इथे लक्षात घ्यायला हवे. स्विकृतदर्शनी बदललेल्या हवामानाचे खापर अनेक लोक ‘ग्लोबल वॉर्मिंग’वर फोडत असले, तरी त्याबाबत जागतिक पातळीवर अनेक विरोधी मतप्रवाह आहेत. अगदी ‘वेदर चॅनल’चे संस्थापक जॉन कोलमनही ‘ग्लोबल वॉर्मिंग’बाबत साशंक आहेत. हवामान खात्याची मागील काही वर्षांची आकडेवारी मी स्वतः डोळ्यांखालून घातली नसल्याने मला कोणताही दावा करायचा नाही. पण माझ्या माहितीनुसार २०११ सालापर्यंत पृथ्वीचे एकंदरीत तापमान वाढले असले, तरी त्यानंतर ते आता कमी होऊ लागले आहे. सौरडागांची (Sunspot) गतीविधी घटल्याने सध्यातरी पृथ्वी थंड होत असल्याचे समजते.

‘ग्लोबल वॉर्मिंग’ आणि ‘प्रदुषण’ या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पृथ्विवरील प्रदुषणात वाढ होत आहे, यात कोणतेही दुमत असण्याचे कारण नाही. पण पृथ्वी गरम होत आहे, या गोष्टीचा मात्र पुनर्विचार करायला हवा. आपण पृथ्वीकडे देव म्हणून पाहतो आणि ते एका वेगळ्या पातळीवर खरं देखील आहे. पण नेहमीच्या दृष्टीने पाहता पृथ्वी हा आकाशगंगेतील इतर ग्रहगोलांप्रमाणे केवळ एक ग्रह असून इतरांप्रमाणे याचे स्वतःचे देखील एक विशिष्ट असे वातावरण आहे. मागील करोडो वर्षांत असंख्यवेळा हा ग्रहाचे हवामान बदललेले आहे व त्यामुळे अनेकदा सजिवसृष्टीचा विनाशही झाला आहे.

‘आमच्या काळात असले विचित्र हवामान नव्हते!’, अनेकजण रिकामटेकड्या गप्पांत असा सूर आवळून स्वतःचीच पाठ थोपटत असतात. जणूकाही पंचमहाभूतांच्यावतीने पूर्वी पृथ्वीचे हवामान खाते हे एकहाती सांभाळत होते. चार महिने ऊन, चार महिने पाऊस आणि चार महिने थंडी! एकदा ठरलं ते ठरलं! पावसाने उन्हाळ्यात पडायचे नाही की, थंडीने पावसात फिरकायचे नाही, असा यांचा दंडक! पण सेवानिवृत्त झाल्यापासून सगळ्या हवामानाने कसा ताळतंत्र सोडला आहे!

पूर्वी पृथ्वीचे हवामान असेलही चांगले.. पण त्यात तुमचे कर्तूत्त्व ते काय!? डायनॉसोरच्या काळात पृथ्विवरील ऑक्सिजनचे प्रमाण अधिक होते असे म्हणतात.. तेंव्हा डायनासॉरही कदाचीत स्वर्गातून म्हणत असावेत, ‘आमच्या काळात असले हवामान नव्हते!’. डायनासॉरच्या पिढ्या करोडो वर्षं पृथ्विवर नांदून शेवटी कालगर्भात गेल्या. त्यामानाने आपल्यात इनमिन चार दशकांचे अंतर! तेंव्हा आमचा काळ आणि तुमचा काळ तो काय?

‘हवामान बदलत आहे का?’ बरं.. ‘मग त्यामागे काय कारणे असतील?’ विचार करा! पृथ्वी अधिक सुंदर करण्यासाठी आपल्या परीने खारीचा वाटा उचला! काहीच समजत नसेल, तर भावी पिढीसाठी एक झाड तरी लावा! उगाच बाष्कळ बडबड करण्यापेक्षा काही आदर्शवत कृती करा. लहान मुलांस पर्यावरणाचे, स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगा. त्यांना निसर्गावर प्रेम करायला शिकवा.

‘आमच्या काळात’ म्हणून कशावरुनही ऊठसूठ स्वतःची पाठ थोपटून नव्या पिढीस तुच्छ लेखन्याची फॅशन ही मध्यंतरी अगदी जागतिक पातळीवर सर्वत्र बोकाळली होती. पण मागील काही वर्षांत ती हळूहळू कमी होत गेल्याचे जाणवत आहे.. तेंव्हा हा लेख सरसकट सर्वांसाठी लिहिलेला नसून ज्यांस अजूनही अशी सवय आहे त्यांनी मात्र यावर विचार करावा इतकीच अपेक्षा आहे.

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.