राजकारण

आघाडीच्या राजकारणामागील हालचाली

अलीकडच्या काळात आपण जर पाहिले, तर नितीन गडकरींचा चेहरा प्रसारमाध्यमांतून सतत दिसू लागला आहे. गडकरींनी आपल्या कामातून प्राप्त केलेल्या यशाचा आलेख अशाप्रकारे लोकांसमोर वारंवार मांडला जात असून भविष्यात सत्ता स्थापनेसाठी इतर पक्षांची मदत लागल्यास संघातर्फे गडकरींचे नाव पुढे केले जाऊ शकते अशी चर्चा आहे. परंतु स्वतः गडकरींनी मात्र अर्थातच या चर्चांचे खंडन केले आहे. तरी देखील प्रत्यक्षात पंतप्रधानपदाचा पर्यायी उमेदवार म्हणून गडकरींच्या नावाची संघातर्फे चाचपणी सुरू असल्याचे सध्याचे एकंदरीत चित्र आहे. भारतीय जनता पक्षात जे काही आघाडीचे चेहरे आहेत, त्यात गडकरींची प्रतिमा त्यातल्यात्यात सर्वसमावेशक आहे. इतर पक्षांसोबत त्यांचे मित्रत्वाचे संबंध असल्यामुळे गरज पडल्यास या पक्षांना सोबत घेणे भाजपला सोपे जाऊ शकते. आपली कार्यतत्परता व निरपेक्षता अधोरेखित करण्यासाठी गडकरी देखील आजकाल अधिक प्रांजळपणे मुलाखत देताना पाहायला मिळत आहेत.

इकडे निमित्त मिळूनही नेहमीच्या तुलनेत मनसेने आपल्या स्वभावाविरोधात जात बराच संयम बाळगला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी सोबतची संभाव्य आघाडी हे त्यामागचे कारण असू शकते. कदाचित राष्ट्रवादीकडून त्यांना संयमी भूमिका घेण्याबाबत सुचवण्यात आले असावे. राष्ट्रवादी काँग्रेसचा उगम महाराष्ट्रात झाला असल्याने या पक्षावर काँग्रेसच्या तुलनेत मराठीचा प्रभाव अधिक आहे. त्यामुळे मनसेची कार्यपद्धत सोडल्यास या पक्षाला मनसेशी जुळवून घेण्यात फारशी अडचण नाही. काँग्रेस आणि मनसेचा मेळ बसणे मात्र अवघड आहे. एकतर भाजप प्रमाणेच काँग्रेसच्या उच्चस्तरीय नेतृत्त्वाला पूर्वीपासूनच महाराष्ट्राबद्दल सुप्त आकस आहे, त्यात मनसे सारखी कार्यपद्धत असणाऱ्या महाराष्ट्रवादी पक्षाला सोबत घेऊन जाणे त्यांच्यासाठी खूप कठीण आहे. संजय निरुपम यांनी नुकत्याच केलेल्या वक्तव्यावरून काँग्रेसचा उत्तर भारतीय कल स्पष्ट होत असला, तरी महाराष्ट्रात मात्र या पक्षाच्या विश्वासार्हतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

एकंदरीतच अलीकडच्या काळात काँग्रेसच्या परिस्थितीत फार काही सुधारणा झालेली नसताना भाजपला देखील अनेक बाबतींत पिछेहाट पत्करावी लागली आहे. अशावेळी आघाडीच्या राजकारणाचे महत्त्व वाढत गेल्यास नवल वाटायला नको. पर्यायाने आगामी निवडणूक जसजशी जवळ येत जाईल, तसतशी आघाडीच्या राजकारणाला अधिकाधिक गती मिळालेली आपणास पाहायला मिळेल.

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.