व्यक्तिगत

अहो.. जाऽऽहो!

मराठीमध्ये असलेल्या या ‘आहो-जाहो’मुळे माझ्या वयाच्या व्यक्तिस अनेकदा विचित्र प्रसंगांना सामोरे जावे लागते. लोकांना माझ्याकडे पाहून कळत नाही की, याला ‘आहो-जाहो’ बोलावं? की सरळ ‘अरे-तुरे’ करावं!? त्यामुळे संवाद सुरु असताना कधी ते एखाद्या वाक्यात ‘आहो-जाहो’ घालून माझा सन्मान वाढवतात, तर लगेच पुढील वाक्यात ‘अरे-तुरे’ करत हार-तुरे काढून घेऊन खाली पाडतात. थोडक्यात ते मला ‘घालून-पाडून’ बोलतात! पण समोरची व्यक्तिही बिचारी ‘संकोचित प्रसंगात’ (awkward situation) अडकल्यामुळे काहीशी केविलवाणी झालेली असते. संवादादरम्यान अचानक होणारा हा बदल सहाजिकच एक क्षण खटकतो, पण आता ते तसं अनपेक्षित राहिलेलं नाही!

‘आहो-जाहो’ व ‘अरे-तुरे’ ला ‘मान-सन्मान’ आणि ‘औपचारिकता-अनौपचारिकता’ असे दोन पदर आहेत. त्यामुळे कोणी आपल्यास ‘आहो-जाहो’ बोलत असेल, तर समजावे की तो आपल्याला सन्मान देत आहे.. आणि कोणी ‘अरे-तुरे’ करत असेल, तर अनौपाचरीक बोलण्याइतपत समोरची व्यक्ति आपल्याला जवळचं मानते, याचं समाधान बाळगावं.

आता समोरची व्यक्ति अगदी प्रौढ अथवा म्हातारी असेल, तर सरळ ‘आहो-जाहो’ बोलण्यात काही अडचण येत नाही. कोणी शाळकरी मुलगा अथवा कॉलेज कुमार असेल, तर ‘अरे-तुरे’ करण्यास काही वाटत नाही. पण एखादी समवयस्क अनोळखी व्यक्ति भेटल्यावर मात्र विचित्र पेचप्रसंग उभा राहतो. त्यास स्वतःला ‘अहो-जाहो’ इतपत मान कधी मिळालेला नसतो आणि मी देखील माझ्या मित्राच्या वयाच्या व्यक्तिस कधी ‘अहो-जाहो’चा सन्मान दिलेला नसतो! पण अनोळखी व्यक्तिस अचानक ‘अरे-तुरे’ तरी कसे करणार? अशावेळी दोन्ही बाजूंनी शक्यतो ‘आहो-जाहो’, ‘अरे-तुरे’ टाळायचा प्रयत्न केला जातो. दरम्यान समोरच्या व्यक्तिचा अंदाज घेतला जात असतो. पण शेवटी कोणाला तरी पुढाकार हा घ्यावाच लागतो! कारण ‘अहो-जाहो’ अथवा ‘अरे-तुरे’ केल्याशिवाय आपली मराठी भाषा सहजा-सहजी कोणास सोडत नाही. एकाने पुढाकार घेऊन दबक्या साशंक आवाजात ‘अहो-जाहो’ केलं, की मग संभाषणादरम्यान ‘संकोचित परिस्थिती’ निर्माण होते.

दूरध्वनी, ईमेल अशी संवादाची नवी माध्यमे आल्यापासून तर या गोंधाळात चांगलीच भर पडली आहे! संवादाच्या अशा अप्रत्यक्ष माध्यमांत समोरची व्यक्ति दिसत नसल्याने तिच्या वयाचा थांगपत्ता लावणे अवघड जाते, त्यामुळे अनेकजण इंग्रजीचा सोपा पर्याय निवडतात. पण आम्ही मराठीवर प्रेम करणारी माणसे! तेंव्हा आमचा संवाद हा तर मराठीतूनच चालायचा!

आजकालच्या लहान मुलांनी मात्र या ‘अहोऽऽ’स ‘जाऽऽहोऽ!’ करायला सुरुवात केली आहे. ते आपल्या वडीलांस ‘अरे-तुरे’ करताना पाहून ‘काय ही आजची पिढी!’ असं जुन्या म्हातार्‍यांप्रमाणे तीरस्कारदर्शक उद्गार काढण्याची चांगली संधी चालून येते.. पण मी ती मनःपूर्वक दवडतो. ‘आहो-जाहो’ असावे की नसावे!? याबाबतची माझी भुमिका तटस्थ आहे! येणारी भावी पिढीच काय तो निवाडा करेल आणि तो चांगलाच असेल, असा मला विश्वास आहे. पण एकंदरीतच सध्याची परिस्थिती पाहता ‘आहो-जाहो’चे दिवस भरत आल्याचे दिसते! अर्थात लोक आता अनौपचारिक पद्धतीने ऐकमेकांच्या अधिक जवळ येऊ लागले आहेत.

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.