सामाजिक

अपार्टमेंटमध्ये भरणार्‍या शाळा

आपल्या इथे आजकाल अगदी कुठेही शाळा काढलेल्या पहायला मिळतात. रहिवाशी भागातील एखद्या अपार्टमेंटसदृश ईमारतीमध्ये अशा शाळा भरतात. शाळा सुरु करण्यापूर्वी काही सरकारी नियमांची पूर्तता करावी लागते की नाही? असा प्रश्न या शाळा पाहून पडतो. पण आपल्याकडील एकंदरीत वैचारीक सखोलता पाहता मूळात शाळा सुरु करण्याबाबत आभ्यासपूर्वक बनवलेली काही सरकारी नियमावली आहे की नाही? हे पहायला हवे. आजकाल शाळा, कॉलेज हे एक व्यवसायाचे माध्यम झाले आहे, तेंव्हा ‘सरकारी नियमांनी’ त्यांच्या आड येण्यात काही ‘अर्थ’ नाही!

अशाप्रकारच्या शाळांची खेळाची मैदाने पाहून त्यावर खेळणार्‍या शालेय मुलांची कीव करावीशी वाटते. जुन्या काळातल्या शाळा या अगदी प्रशस्त मैदानावर बांधलेल्या असत. त्या मैदानास दगडी भिंतीचे कुंपन असायचे. मधली सुट्टी झाल्यानंतर शाळेतील सर्व मुले जरी खेळण्यासाठी मैदानावर आली, तरी ते मैदान अपुरे पडत नसे. आमच्या इथे ब्रिटीशांनी बांधलेली एक शाळा आहे. कित्तेक दशके मराठी मुले त्या शाळेत शिकली, खेळली, पण ती आजदेखील तितक्याच नाविन्याने टिकून आहे. ब्रिटीशांची ही दूरदृष्टी आपल्या इथल्या लोकांस जेंव्हा लाभेल, तेंव्हा तो ‘सोनियाचा दिनू’ म्हणूनच साजरा करावा लगेल.

पण मी स्वतः काही ब्रिटिशांच्या त्या प्रशस्त शाळेत शिकलो नाही. आमची माध्यमिक शाळा देखील वर नमूद केलेल्या ‘खुराडा’ सारखीच होती. पण आमच्या शाळेचे खेळाचे मैदान मात्र रहिवाशी भागापासून दूर व काहीसे प्रशस्त होते. त्यामुळे आमच्या खेळण्याचा त्रास शाळेच्या आसपास राहणार्‍या लोकांना फारसा झाला नसावा. पण ‘ऑफ’ तासास मात्र वर्गात गोंधळ चालायचा, तेंव्हा आसपासचे लोक हे आमच्या मुख्याध्यापकांस त्याबाबत तक्रार करत असत.

आता काळाची चक्रे उलटी फिरली असून मीच अशा एका शाळेच्या गोंधळात अडकलो आहे! या शाळेचे मैदानही इथेच! तेंव्हा दिवसभर अगदी हैदोस सुरु असतो! ‘दुसर्‍यांना आपला त्रास होत असेल, तरी आपण त्याचा विचार करायचा नाही’, असे बाळकडूच जणू अशा शाळा आपल्या विद्यार्थ्यांना पाजत असतात. ‘स्वातंत्र्य दिन’ व ‘प्रजासत्ताक दिन’ आला की मग काय विचारता!? खेळाचे शिक्षक हातात एक ढोल घेतात व जोरजोरात त्यास बदडायला सुरुवात करतात. पण मुलं ‘मार्च’ करणार कुठे? चार पावलं चालत नाहीत तोवर तर त्यांचे मैदान संपते!

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.