सामाजिक

अज्ञानाचे शिक्षण

‘आता नाईलाज झालाय म्हणून शिक! पण सरतेशेवटी आयुष्यभर तुला चाकरीच करायची आहे, तेंव्हा चाकोरीबाहेरील असे काहीही शिकू नकोस. शिक्षण घेत असताना तुला त्यातल्यात्यात जेव्हढं म्हणून काही अज्ञानी राहता येईल तेव्हढं रहा! अखेर अज्ञानात सुख असतं!’, आपल्या समाजिक सुप्त मनाची अशीच काहीशी भावना असावी. उमेद, उत्साह, महात्त्वाकांक्षा जे काही असेल, ते त्या चाकरीच्या चौकटीत बसले तर बसले! नाहीतर खाली मान घालून आपला रोजचा दिवस कंठावा!

या गळाटलेल्या मानसिकतेतून सामाजिक व्यवस्थेचे जे दुष्टचक्र सुरु झाले आहे, त्यात नवीनसे वेगळं करु पाहणार्‍यांना फारसा वाव नाही. जे काही ‘शोध’ आहेत, ते परदेशी लोकांनी लावावेत! आपण केवळ अट्टहासाने ‘प्रतिशब्द’ शोधावेत. इथे राहून वेगळा विचार करु पाहणार्‍याचे जितके म्हणून करता येईल तितके खच्चिकरण करु! आणि तो परदेशात जाऊन नावारुपास आला की, तो आमच्याच वंशाचा म्हणून मूर्खासारखे मिरवू!

अज्ञानाचे शिक्षण घेऊन पदवीधर झालेल्या या लोकांनी तर स्वभाषेचे आतोनात हाल केले आहेत. त्या भाषेस व पर्यायाने स्वतःस काही किंमत म्हणून ठेवलेली नाही. परभाषेचे जे अनावश्यक उदात्तीकरण झाले आहे, त्यावर अनेकांनी आपले बस्तान बसवले आहे. मराठी आभ्यास केंद्राने नमूद केल्याप्रमाणे ‘इंग्रजीचे शिक्षण’ आणि ‘इंग्रजीतून शिक्षण’ हा फरक काही आपल्या लोकांना समजलेला नाही. शिवजयंतीला जेंव्हा शाळेतील मुले इंग्रजीतून भाषणे देतात, तेंव्हा ‘याची साठी केला होता का अट्टहास?’ असा प्रश्न पडतो व मन व्यथित होते.

गुलामीच्या मानसिकतेत जगणार्‍या या समाजास इतके दिवस काही कळले नाही, आणि आता कळूनही काही उपयोग होईल असे दिसत नाही. भाषेसंदर्भात बोलायचे झाले तर निर्णायक वेळ निघून जात असल्याचे आतून कुठेतरी जाणवत आहे. तरी देखील सुरेश भटांच्या अत्यंत सुरेख ओळींची याप्रसंगी आठवण होते, ‘करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची रणात आहेत झुंजणारे अजून काही’.

असो! अखेर सर्वोत्कर्ष तर ठरलेलाच आहे. तेंव्हा पिढी दर पिढी चाकोरीचे क्षेत्र वाढत जाऊन ते चौफेर होईल अशी खात्री बाळगण्यास हरकत नाही. समस्या आहे ती इतकीच की, अज्ञानाच्या शिक्षणामुळे जे आज साध्य होऊ शकले असते, त्यास आणखी काही दिवस वाट पहावी लागणार, आणि स्वतःच्या उन्नतीसाठी दुसर्‍यावर विसंबून रहावे लागणार! सरतेशेवटी आपला उत्कर्ष हा निश्चिपणे होईल! पण त्यावेळी त्यात आपले असे काही वेगळेपण असणार नाही.

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.