सामाजिक

अंधश्रद्धेची भिती

अंधश्रद्धेचे निर्मुलन करायचे झाल्यास ‘अंधश्रद्धा म्हणजे नक्की काय?’ यावर विचार व्हायला हवा. ‘अंधश्रद्धा’ या शब्दाकडे डोळसपणे पाहिल्यास ‘श्रद्धा’ असल्याखेरीज ‘अंधश्रद्धा’ पूर्ण होत नाही, ही गोष्ट दिसून येते. त्यामुळे मुळात ‘श्रद्धा म्हणजे नक्की काय?’ या प्रश्नाच्या उत्तराचा मागोवा घेणे हे या दृष्टीने प्रस्तुत ठरते. त्यायोगे आपणास अंधश्रद्धेवर शाश्वत उपाय सापडू शकेल.

माणूस हा अनाकलनिय मितींत अडकला आहे, काळबंधनात जखडला आहे. मेंदू जीवन सोडवण्यात व्यस्त आहे, पण हाती आलेली सारी उत्तरे ही अखेर अनंतात विलिन होत आहेत. अनंत अज्ञेय आहे. अस्तित्त्वाचे अज्ञेयत्त्व मान्य करण्याखेरीज आता त्याच्यासमोर उपाय नाही. पण मुळात अज्ञेय धुंडाळण्याकरिताच तो अस्तित्त्वात आला आहे. त्यामुळे अस्तित्त्वाचे अज्ञेयत्त्व मान्य करणे त्यास सहजासहजी जमत नाही. तो संघर्ष करता करता हे द्वंदही लढू लागतो. काही माणसे पूर्वजांच्या वा स्वतःच्या पुण्याईवर तरुन जातात. परंतु अखेर अस्तित्त्व हे बेसावध माणसास लोटांगण घालायला लावते. अस्तित्त्वाची नश्वरता जाणवते, तेंव्हा तो भयकंपीत होतो. आपले कशावरच नियंत्रण नाही! ही जाणिवच त्याच्या अस्तित्त्वास पोखरु लागते. जीवनातील अर्थ निघून जातो, तेंव्हा तो दिसेल त्या गोष्टीत निरर्थक अधार शोधू लागतो. सारासार विचारांवरील श्रद्धा काळोखात लुप्त होते, तशी अंधश्रद्धा सुरु होते. जेंव्हा अस्तित्त्वाच्या दिवशी काळोख दाटतो, तेंव्हा डोळस माणूस आंधळ्यागत जाणवू लागतो.

या जगात व्यवहार करायचा असेल, तर आपल्या मर्यादा जाणून काही गोष्टी सोडून द्याव्या लागतात. अस्तित्त्वाचे अस्तित्त्व जेंव्हा अज्ञेयावर प्रेमळ विश्वासाने सोपवले जाते, तेंव्हा ती ‘श्रद्धा’ ठरते. अशाप्रकारे श्रद्धेचा उलगडा झाल्यास अंधश्रद्धेची भिती बाळगण्याचे कारण उरत नाही. अंधश्रद्धा जर हटवायची असेल, तर निखळ ज्ञानाच्या तेजाने मानवी अस्तित्त्व हे प्रकाशमान करावे लागेल. तेंव्हाच माणसास सारासार विचार दिसू लागतील. अस्तित्त्व हे नश्वर असले, तरी ते अनंतात विलिन होणार आहे, याकडे तो सकारात्मक दृष्टीने पाहिल. अस्तित्त्वाचे अज्ञयेत्त्व जाणून घ्यायचे झाल्यास अज्ञेय धुंडाळणे व्यर्थ आहे, हे त्यास कळून चुकेल, तेंव्हा त्यास अनुभूती प्राप्त होईल. यातूनच अज्ञेयाप्रती त्याच्या मनी श्रद्धा निर्माण होईल. तो आणखी एका मितीची पायरी चढेल! त्याचे क्षितिज विस्तारेल व त्यास परमज्ञान मिळेल! कदाचित तरीही अज्ञेय हे अज्ञेयच राहिल! पण एव्हाना तोही अज्ञेयात सामावून गेलेला असेल!

अंधश्रद्धेला आव्हान देण्यापेक्षा ज्ञान दिल्यास अंधश्रद्धा निर्मुलनास अधिक गती प्राप्त होईल. अर्थात विशिष्ट परिस्थितीत खंबिर भूमिका घेणे गरजेचे ठरु शकते, पण दिर्घकालिन विचार करता अंधश्रद्धा निर्मुलन करण्याकरिता मानवी जीवनातील श्रद्धेचे स्थान हे नेमकेपणाने लक्षात घ्यावे लागेल.

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.