व्यक्तिगत

हुंदडणारा आनंद

‘बाहेर हुंदडण्यातच जीवनाचा आनंद दडलेला आहे!’, असा वरकरणी सरासरी समाजाचा सिद्धांत दिसतो. ज्यांना असं हुंदडून खरोखरच आनंद मिळतो, त्यांचं ठिक आहे! पण ज्यांना असं निरर्थक हुंदडून आनंद मिळत नाही, त्यांचा मात्र उगाचच गोंधळ होतो! त्याचं होतं असं, की, बाहेर कारण नसताना हुंदडायची तर ईच्छा नसते.. पण मग हुंदडलं नाही, तर आसपासचे लोक असा समज करुन द्यायला लागतात की, तू ‘जीवनाचा आनंद’ न घेण्याचं काहीतरी महाभयान असं पातक करत आहेस! त्यामुळे ज्यांना हुंदडायला आवडत नाहीत, तेही उगाच हुंदडून चार उड्या मारुन हसल्यासारखं करुन सेल्फी काढून येतात! त्याअर्थी सोशल नेटवर्कवर हे सिद्ध करता येतं की, ‘आम्ही तर ‘जीवनाचा आनंद’ घेतोय बाबा! आता तुमचं काय ते तुम्ही बघा!’. अशाप्रकारे एकंदरीतच समाजाची हुंदडून आनंद घेण्याची नैतिक जबाबदारी वाढत जाते आणि मग हा समाज ओसाड पठारावर, बसायलाही जागा नाही अशा बागेत, जिथे प्रातःविधी आटोपले जातात अशा नदीच्या किनारी, आपलं तेच गलिच्छ मन घेऊन जीवनाचा केविलवाणा आनंद घेऊ पाहतो. ‘मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण’, हे तुकोबारायांनी कधीचेच सांगून ठेवले आहे, तरी अजूनही आपण त्यातून फारसे काही शिकलो आहोत असे वाटत नाही.

बाकी हुंदडून आनंद मिळायलाही मनं जुळणारी माणसे सोबत असावी लागतात. आता चार प्रकारच्या मित्रांचं नमुनेदाखल उदाहरण घेऊ.

मित्र १ – यांचं प्रत्येक वाक्य हे निराशादायी अशा थकलेल्या आवाजात ‘काय होणार? कसं होणार? जाऊ दे!’ यावर संपतं.

मित्र २ – यांस जर आपण हळूहळू यशस्वी होऊ लागलो आहोत, हे समजलं, तर त्यांस सहन न होणारी आसुया त्यांच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसू लागते.

मित्र ३ – ‘माझ्या मावस भावाच्या चुलत भावाकडे कार आहे! तुझ्या मावसभावाच्या चुलत भावाकडे कार आहे का?’, यांना आपल्यापेक्षा आपल्या घरात काय चाललंय? यात अधिक रस असतो.

मित्र ४ – हे लोक येड्या डोक्याचे असतात! हे कधी चिडतील आणि कधी थंड होतील सांगता येत नाही!

सकारात्मकता, कला, प्रतिभा, अभिरुची, नियोजन, महात्त्वाकांक्षा अशा गोष्टी आसपासच्या लोकांत अत्यंत अभावाने आढळतात. त्यामुळे उगाचच अशा लोकांबरोबर वेळ वाया घालवण्यापेक्षा आपण स्वतःच स्वतःचा विकास साधायला हवा. तेंव्हा उगाच कोणासोबत तरी हुंदडण्यापेक्षा एकटं फिरणं कधीही चांगलं! कारण आपण स्वतःस जितके ओळखतो, तितके इतर कोणीही ओळखत नाही. शेवटी आनंद ‘हुंदडत’ नसतो, तर तो आपल्याच आसपास ‘फिरत’ असतो.