म्युच्युअल फंड

हायब्रिड म्युच्युअल फंडचे ६ उपप्रकार

‘सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया’ अर्थात ‘सेबी’ने निश्चित केलेल्या मानकांनुसार हायब्रिड फंडची ६ उपप्रकारांत विभागणी केली जाते. कोणतीही ‘अॅसेट मॅनेजमेंट कंपनी’ (म्युच्युअल फंड कंपनी) या उपप्रकारांमध्ये प्रत्येकी केवळ १ योजना सुरू करू शकते. हायब्रिड किंवा बॅलन्स्ड फंडच्या ६ उपप्रकारांची माहिती आपण आजच्या या लेखात घेणार आहोत, पण तत्पूर्वी म्युच्युअल फंडचे मुख्य प्रकार कोणते? हे वाचणे उपयुक्त ठरेल.

हायब्रिड फंडचे ६ उपप्रकार

१. कॉन्झरव्हेटिव्ह हायब्रिड फंड : अशाप्रकारच्या फंडच्या माध्यमातून एकूण गुंतवणुकीच्या १०% ते २५% रक्कम इक्विटी आणि इक्विटीशी निगडित साधनांमध्ये, तर ७५% ते ९०% रक्कम डेट साधनांमध्ये केली जाते.

२. बॅलन्स्ड हायब्रिड फंड : बॅलन्स्ड हायब्रिड फंडमध्ये एकूण गुंतवणुकीच्या ४०% ते ६०% रक्कम इक्विटी आणि इक्विटीशी निगडित साधनांमध्ये, तर ४०% ते ६०% रक्कम डेट साधनांमध्ये केली जाते. याप्रकारच्या योजनेतून मूल्यांतरपणन (Arbitrage) केले जात नाही.

अॅग्रेसिव्ह हायब्रिड फंड : अॅग्रेसिव्ह हायब्रिड फंडद्वारे ६५% ते ८०% रक्कम इक्विटी आणि इक्विटीशी निगडित साधनांमध्ये, तर २०% ते ३५% रक्कम डेट साधनांमध्ये केली जाते.

नोंद : योजना तयार करत असताना म्युच्युअल फंड कंपनी बॅलन्स्ड हायब्रिड फंड आणि अॅग्रेसिव्ह हायब्रिड फंड या दोनपैकी एका उपप्रकाराची निवड करू शकते.

३. डायनॅमिक अॅसेट अलोकेशन / बॅलन्स्ड अॅडव्हान्टेज : याप्रकारच्या फंडमधील इक्विटी आणि डेट साधनांचे प्रमाण बाजारातील चालूपरिस्थितीनुसार सातत्यपूर्ण पद्धतीने बदलले जाते.

४. मल्टी अॅसेट अलोकेशन : मल्टी अॅसेट अलोकेशनच्या माध्यमातून कमीतकमी ३ प्रकारच्या मत्तावर्गांत (Asset Class) प्रत्येकी कमीतकमी १०% गुंतवणूक केली जाते.

५. आब्रिट्राज फंड : आब्रिट्राज फंडमध्ये एकूण गुंतवणुकीच्या कमीतकमी ६५% रक्कम इक्विटी आणि इक्विटीशी निगडित साधनांमध्ये केली जाते. यात ‘मूल्यांतरपणन’ (Arbitrage) धोरण अवलंबले जाते.

६. इक्विटी सेव्हिंग्ज : अशाप्रकारच्या फंडमधील एकूण गुंतवणुकीच्या कमीतकमी ६५% रक्कम इक्विटी आणि इक्विटीशी निगडित साधनांमध्ये, तर कमीतकमी १०% रक्कम डेट साधनांमध्ये गुंतवली जाते. योजनेशी निगडित महितीपत्रात हेज्ड आणि अनहेज्ड गुंतवणुकीबाबत नोंद केलेली असते.

ज्यांना इक्विटी फंडचा परतावा आणि डेट फंडची सुरक्षितता हवी आहे, त्यांच्यासाठी हायब्रिड फंड हा एक अतिशय उत्तम पर्याय आहे. वय, आर्थिक उत्पन्न, जोखीम स्वीकारण्याची क्षमता यानुसार गुंतवणूकदार आपल्यासाठी योग्य अशा हायब्रिड फंडची निवड करू शकतो.