आयुष्य

हळहळणारा डॉक्टर

‘समस्या’ हा जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. मानसिक समस्या ही तर मानसिक समस्या असतेच! पण शारीरिक समस्या ही देखील मानसिक समस्या असते! कारण शारीरिक व्याधीचे ओरखडे मनासही घायळ करतात. मानसिक समस्येला गृहित धरण्याइतपत आपला समाज अजून प्रगल्भ झालेला नाही. पण आपणास जेंव्हा एखादी शारीरिक समस्या जाणवते, तेंव्हा आपण डॉक्टरांकडे जातो. शरीराचा आणि मनाचा परस्पर संबंध निष्णात डॉक्टर जाणून असतात. त्यामुळे रुग्णाची समस्या जाणून घेत असताना ते त्याच्याशी सकारात्मक संवाद साधतात. रुग्णाचे दुःख ऐकून डॉक्टर हळहळत नाहीत, तर त्याचा आतला आवाज शांतपणे ऐकून घेतात. स्वतः रुग्णाच्या यातनेचा आरसा न बनता निरामयता प्रतिबिंबित करतात. त्यामुळे रुग्णाच्या जखमी मनावर एक अल्हाददायक फुंकर घातली जाते. आशावाद त्यास आश्वस्त करतो. आश्वस्त मनापासून प्रेरणा घेत रुग्णाचे शरीरही त्यास साथ देऊ लागते.

आपल्याला जेंव्हा शारीरिक ‘समस्या’ असते, तेंव्हा आपण डॉक्टरांकडे जातो, आणि डॉक्टर आपल्याला ‘उपाय’ सुचवतात. पण आपल्याला जेंव्हा मानसिक ‘समस्या’ असते, तेंव्हा आपण कोणाकडे जातो? आपण आपली मानसिक समस्या घेऊन आपल्या जवळच्या व्यक्तिकडे जातो. तिच्याजवळ आपली ‘समस्या’ सुटेल, अशी भाबडी आशा आपल्या मनास लागून राहिलेली असते. स्वतःच्याही नकळत आपण त्या व्यक्तिस ‘डॉक्टरांच्या भूमिकेत’ पाहू लागतो. या तथाकथित डॉक्टरांजवळ आपण आपली समस्या प्रांजळपणे विषद करतो. पण हे डॉक्टर त्यांच्या सोयीप्रमाणे ऐकतात आणि जे ऐकलंय त्याचा सिमित बुद्धिस अनुसरुन सोयिस्कर अर्थ लावतात. वर समदुःखित्त्व सिद्ध करण्यासाठी ते हळहळतात, चुकचुकतात, चेहर्‍यावर आठ्या आणतात. रुग्णाच्या यातनेचा अथांग आरसा बनून ते त्याचे आमेयत्त्व स्वयंसिद्ध करतात. त्यामुळे रुग्णाच्या जखमा या आणखी भळभळू लागतात. निराशा त्यास आपल्या विळख्यात जखडून घेते. हतबद्ध मनापासून प्रेरणा घेत रुग्णाचे शरीरही त्यास साथ देऊ लागते.

ऐकमेकांसोबत सुख-दुःख वाटणे हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. आपणासाठी कोणी डॉक्टर असतो, तेंव्हा आपणही कोणासाठी तरी डॉक्टर असतो. अनुत्तरित प्रश्नांना उत्तर असेलच असे नाही.. पण काही झाले तरी, डॉक्टरांनी हळूहळू नये की, जखमांनी भळभळू नये! डॉक्टरांनी आपले ‘दुःख अनुभवावे’ असे रुग्णास वाटत नाही.. तर ते त्यांनी ‘ऐकावे, जाणावे’, इतकीच काय ती रुग्णाची माफक अपेक्षा असते. एखादे लहान मुल जर आपल्याजवळ एखादी समस्या घेऊन आले, तर हळहळू नये, चुकचुकू नये, की त्यास उपदेशाचे डोस पाजू नये! त्याचे बोलणे मनःपूर्वक ऐकून घ्यावे. लहान मुलाला, त्याच्या विचारांना, त्याच्या भावविश्वाला महत्त्व द्यावे! त्याचे बोलणे आदरपूर्वक ऐकून, लक्षात घेऊन त्याच्याशी आभ्यासपूर्वक मित्रत्त्वाने संवाद साधावा. एखाद्याचे दुःख ऐकून हळहळू नये.. तर हळहळणार्‍या मनावर अल्हाददायक फुंकर घालावी..!