Uncategorized

संकल्पांच्या स्वप्नपूर्तीचा प्रवास

एखादा ‘संकल्प’ राहिला की मग राहूनच जातो. तो काळाबरोबर हळूहळू मागे पडतो आणि मग पुन्हा नव्याने सुरुवात करायची म्हटलं तर ते सहजशक्य होत नाही. अनेकदा अगदी पहिल्यापासून सगळा खेळ मांडावा लगतो. सुंदर कल्पनेचे सत्यात रुपांतर करणं हे माणसाच्या जीवनापुढील खरं आव्हान असतं. जुन्या सवयींनी आपली मुळं ही माणसाच्या मनात, हृदयात अगदी घट्ट रोवलेली असतात. नको असलेल्या सवयींची पाळंमुळं उखडून टाकून तिथे नव्या सवयींचे बिजारोपण करुन त्यांस फुलवणे ही तशी धिराची व धैर्याची गोष्ट आहे.

‘संकल्प’ ते ‘सवय’ हा प्रवास मोठा कठिण असतो. तो अगदी नियमीतपणे नेटाने करावा लागतो. कल्पनेच्या अवस्थेत असलेली सवय म्हणजेच कदाचित संकल्प असावा. प्रवासास निघण्यापूर्वी नियोजन केलेले असेल, तर खडतर प्रवासही सोपा होऊ शकतो. संकल्पाच्या दिशेने चालणार्‍या प्रवासाच्या बाबतीतही अगदी हेच सांगता येईल. संकल्पपूर्तीसाठी नियोजन अतिशय महत्त्वाचे आहे. दिशाहीन प्रवास तो आपणास कुठे घेऊन जाणार?

पण जीवन हे मोठं चमत्कारीक आहे! काही वर्षांपूर्वी अशक्यप्राय असणार्‍या गोष्टीदेखील ‘योग्य वेळ’ येताच अगदी सहज साध्य होतात. वर्षानुवर्ष अथक प्रयत्न करुनही पूर्णत्त्वास न गेलेले संकल्प हे काळाच्या विशिष्ट टप्यावर अगदी अलगतच माणसाची सवय बनून जातात. माणूस ‘आतून’ तयार असल्याशिवाय त्यास काहीही मिळत नाही. पण हा आतला बदलही कधी कधी अगदी सहज घडून येतो.

माणूस हा सवयीचा गुलाम आहे. भाग्यवान लोकांच्या बालवयातच त्यांचे आईवडील त्यांच्या हृदयात चांगल्या सवयींचे बीजारोपण करतात. त्यामुळे मनात व हृदयात जी सुंदर बाग निर्माण होते त्याची गोड फळे त्यांना आयुष्यभर चाखता येतात. इतरांना मात्र आयुष्यातील खाचखळग्यात प्रथम पडावं लागतं, आपण पडलेले पाहून आसपासचे लोक जी मजा लुटतात ती पचवावी लागते, पुन्हा पडू नये म्हणून अनुभवातून, चांगल्या लोकांकडून शिकावं लागतं आणि मग आपल्या आयुष्याची चाल ठरवावी लागते!

पण अनुभवसिद्धीचा हा प्रवास काही सोपा नाही. यात वेळेचा व उर्जेचा प्रचंड अपव्यय होतो. ‘संकल्प’ केले जातात ते काळपरत्वे आपोआप मोडले जातात. ते पुन्हा केले जातात, पुन्हा मोडले जातात. अनेकदा लाटा निघून जातात.. हलकावे खाणार्‍या जीवनरुपी होडीचा प्रवास मात्र त्याच बिंदूवर मृगजळाप्रमाणे आभास बनून राहतो. पण सातासमुद्रापार आपला झेंडा रोवण्याची स्वप्ने पाहणारी होडी ही जेंव्हा त्या स्वप्नांत अगदी मनापासून रमलेली असते, तेंव्हाच खरं तर त्या होडीचं सार्थक झालेलं असतं.

संकल्परुपी स्वप्नपूर्ती तर शेवटी महत्त्वाची आहेच, पण संकल्पांच्या स्वप्नपूर्तीचा प्रवासही तितकाच महत्त्वाचा असून माणसास समृद्ध करणारा एक अनुभव आहे. त्यामुळे सतत संकल्प करत राहिले पाहिजे, काही ठरवले पाहिजे.. संकल्प मोडले जातील, कष्ट पाण्यात जातील, पण प्रयत्न ते केले पाहिजेत. सुंदर, संपन्न अशी स्वप्ने पाहिले पाहिजेत आणि ती सत्यात उतरवण्याची दूर्दम्य ईच्छा बाळागली पाहिजे. यशापयश गौण आहे, पण यशप्राप्तीसाठी मनापासून यथाशक्ति केला जाणारा प्रयत्न हा ‘अंतत्त्व’ आहे.