म्युच्युअल फंड

स्मॉल कॅप म्युच्युअल फंड

बाजारमूल्यानुसार शेअर बाजारात ज्या कंपन्यांचा क्रमांक २५१ पासून पुढे येतो त्यांचा समावेश स्मॉल कॅप विभागात केला जातो. स्मॉल कॅप कंपन्या पुरत्या स्थिरस्थावर झालेल्या नसतात, त्यामुळे स्मॉल कॅप प्रकारातील गुंतवणुकीवर होणारा नफा किंवा तोटा हा अधिक असू शकतो. थोडक्यात स्मॉल कॅप समभागांची दोलायमानता जास्त असल्याने त्यांमध्ये केलेल्या गुंतवणुकीवरील जोखीमही वाढीस लागते. परिणामी अशाप्रकारच्या कंपन्यांमध्ये होणारी गुंतवणूक मर्यादित असते.

स्मॉल कॅप म्युच्युअल फंड

स्मॉल कॅप फंडच्या माध्यमातून ‘अॅसेट मॅनेजमेंट कंपनी’ (म्युच्युअल फंड कंपनी) शेअर बाजारातील स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करते. प्रत्येक म्युच्युअल फंड कंपनी प्रत्येकी एक स्मॉल कॅप योजना सुरू करू शकते. या योजनांचा तुलनात्मक अभ्यास करून आपण स्वतःसाठी योग्य अशी योजना निवडू शकतो. आपल्यावर जर फारशी जबाबदारी नसेल आणि आपणास चांगला परतावा हवा असेल, तर जे पैसे आपण प्रदीर्घ काळासाठी गुंतवून ठेवू शकाल, ते स्मॉल कॅप मध्ये गुंतवण्यास हरकत नाही. पण केवळ स्मॉल कॅप मध्ये गुंतवणूक न करता सर्वप्रथम आपल्या गुंतवणुकीचा योग्य हिस्सा लार्ज कॅप तसेच हायब्रिड फंडमध्ये ठेवावा.