माहिती

स्टेम सेल्स

काल रात्री ‘स्टेम सेल्स’ संदर्भात माहिती पाहण्याचा योग आला. या विषयासंदर्भात मला थोडीफार कल्पना होती, पण त्या विषयाची पुन्हा एकदा काहीशी उजळणी झाली. मी काही या विषयातील तज्ञ नसल्याने मी देत असलेली माहिती ही पूर्णतः योग्य आहे, असे माझे म्हणने नाही. माझ्या बुद्धिला जे काही झेपलं, समजलं ते मी या लेखात देत आहे.

तर ‘स्टेम सेल’ म्हणजे काय? गर्भातील भ्रूण अगदी प्राथमिक अवस्थेत असताना त्यात ‘स्टेम सेल्स’ आढळून येतात. लहान बाळास जसे आपण जीवनात पुढे जाऊन काय करणार? ते माहित नसतं, अगदी त्याप्रमाणेच हे पेशी देखील पुढे जाऊन मानवी शरिरातील कोणत्या अवयवाचा भाग बनणार? हे सांगता येत नाही. भविष्यात त्यापैकी काही पेशी हे हृदयाचे कार्य करु शकतात, तर काही पेशी मेंदूचे कार्य सांभाळू शकतात. जीनमध्ये उपलब्ध असलेल्या माहितीवरुनच त्यांचे भविष्यातील कार्य निश्चित होते.

२०१२ साली स्टेम सेलच्या क्षेत्रात कार्य करणार्‍या जॉन बी. गॉर्डन व शिनया यामानाका यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. पूर्वी असं मानलं जात असे की, स्टेम सेल हे केवळ मानवी भ्रूण अवस्थेमधून मिळविले जाऊ शकतात. पण या दोन शास्त्रज्ञांनी हे दाखवून दिले की, आपल्या शरिरामधील पूर्णतः विकसित अवस्थेतील पेशींचे देखील प्राथमिक अवस्थेतील स्टेम सेल्समध्ये रुपांतर केले जाऊ शकते. हा एक अत्यंतिक महत्त्वाचा शोध होता. या संशोधनामुळे भविष्यात वैद्यकीय क्षेत्रात मोठे क्रांतीकारी बदल अपेक्षित आहे.

या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मानवी हृदयाची एकसमान प्रतिकृती निर्माण केली जाऊ शकते. त्यामुळे एक हृदय जरी खराब झाले, तरी अगदी त्यासारखेच दुसरे हृदय हे त्याजागी लावले जाऊ शकते. स्पाईनल कॉर्ड खराब झाल्यामुळे काही लोकांना आपल्या पायांची हालचाल करता येत नाही. यावर सध्यातरी कोणताही इलाज उपलब्ध नाही, पण स्टेल सेल तंत्रज्ञानाच्या रुपाने यासंदर्भात आशा निर्माण झाली आहे. याबाबत उंदरांवर केलेल्या प्रयोगांमधून चांगला परिणाम दिसून आला आहे. या नवीन तंत्रज्ञानाने म्हातारपणावर देखील मात केली जाऊ शकते.

स्टेम सेलचे हे तंत्रज्ञान अजून पूर्णतः विकसित झालेले नाही, पण त्यावर अगदी वेगाने कार्य सुरु आहे. ‘आपल्या जवळील ताकद जशी वाढत जाते, तशी जबाबदारीही वाढते’, असं म्हटलं जातं. त्यायोगे भविष्यातील पिढीवर खूप नव्हे तर प्रचंड मोठी जबाबदारी आहे, यात काहीच शंका नाही. भविष्यात ‘मानव’ असणे म्हणजे नक्की काय? अशा अगदी मूलभूत प्रश्नांच्या अनुशंगाने इतर गुंतागुंतीचे तात्विक प्रश्न निर्माण होतील. मानवी प्रजाती आता अशा एका वळणावर उभी आहे, जिथून पुढे जाऊन ती स्वतःचा पूर्णतः विनाश तरी करुन घेईल किंवा त्यापुढे जाऊन मोक्ष प्राप्त करेल.