आयुष्य

सवयीचे नशीब

केवळ माणूसच नव्हे, तर इतर जीवही सवयीचे गुलाम असतात. पण माणूस हा असा एकमेव प्राणी आहे जो आपल्या सवयींकडे निरखून पाहू शकतो आणि त्या सवयींना लक्षात घेऊन त्या बदलू शकतो. ज्या सवयी आपल्या लक्षात येत नाहीत, त्या सवयींचे बरे-वाईट परिणाम नशीब बनून आपल्या आयुष्यासमोर उभे ठाकतात. काही सवयी अशाही असतात, ज्या आपल्या लक्षात येतात, पण त्या आपल्याला बदलता येत नाहीत. अशाप्रकारच्या सवयी देखील नशिबाचाच एक भाग म्हणून अनेकदा काळापुढे निमूटपणे स्वीकारल्या जातात. थोडक्यात सवयींचा आणि नशिबाचा आपला असा अनन्यसाधारण संबंध आहे.

आता हे विश्वच सापेक्षतावादावर उभे ठाकले असल्याने प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचे आपले असे निरनिराळे पैलू आहेत. आपल्या प्रत्येक सवयीला आपण स्वतः जबाबदार की आपले पूर्वज जबाबदार? हा देखील असाच एक सापेक्षतावादी प्रश्न आहे. सर्वसामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून पाहिले असता, तो केवळ नशिबावर भरोसा ठेऊन आल्या-गेल्या परिस्थितीत वाहावत असतो. त्याने स्वतःच्या नकळत पूर्वजांनी दिलेली शिदोरी आपल्या गाठीशी मारलेली असते. त्यात एका विशिष्ट वयानंतर तो आपली स्वतःची अशी काही भर घालत असेलही, पण एकंदरीतच आयुष्याच्या पूर्वार्धात पूर्वजांकडून मिळालेल्या सवयींचा त्याच्या आयुष्यावर पगडा असतो, जो तो आपले नशीब म्हणून स्वीकारतो.

माणसाला आपले नशीब बदलायचे असल्यास त्याने आपल्या सवयी बदलणे आगत्याचे ठरते. सवयी बदलण्याकरिता प्रथम त्या लक्षात यायला हव्यात. यालाच आत्मपरीक्षण म्हणतात. आत्मपरिक्षणातून माणूस आपले नशीब व पर्यायाने आपल्या आयुष्याची दिशा एका मर्यादेत बदलू शकतो.