आयुष्य

शून्यानंत परीक्षा

असंख्य पेशींच्या संवेदनांमधून प्रकट झालेले मानवी मन जेंव्हा स्वतःचा विचार करते, तेंव्हा त्यास काहीतरी चुकत असल्याचे कळून चुकते. स्वतःला ओळखण्याचा प्रयत्न करुनही ते त्यास जमत नाही, कारण त्याने स्वतःला कधी पाहिलेलेच नसते. खरंतर कोणीच कोणाचं नसतं, हे जेंव्हा त्यास आयुष्याच्या एका टप्यावर समजतं, तेंव्हा ते नकळत स्वतःशीच गप्पा मारु लागतं. रोज गप्पा मारता मारता ते स्वतःला जाणून घेण्याचा प्रयत्न करु लागतं. पण आपण कोण आहोत? आणि आपण कोणाशी गप्पा मारतोय? हे काहीकेल्या त्यास उमजत नाही. अशाने जीवनाप्रती मनाची गूढता वाढत जाते. त्याचे हे कुतूहल त्यास निरनिराळे मार्ग चोखाळायला प्रेरित करते. कधी ते भरकटते, विस्कटते, चुकते, रडते आणि मग स्वतःवरच हसून पुढे चालू लागते. कारण काळाला केवळ एकच दिशा असते. जीव दमला तरी जीवाच्या आकांताने वेळ गाठाविच लागते. हीच मनाची खरी परीक्षा असते! वेळ गाठता गाठता वेळेचं भान हरपू लागतं.. मन हरवलेल्या वेळेत विरघळून जातं.. आणि मग स्वतःला न ओळखणं हेच खरं ओळखणं आहे, अशी अनुभूती त्यास या जीवनरुपी परिक्षेत प्राप्त होते.

मनही कधी रेंगाळलेलं असतं, साचलेलं असतं, गढूळपणाने ग्रस्त होऊन त्रस्त झालेलं असतं..! पण जीवन हे वाट पाहिल्याने नव्हे, तर वाट तुडवल्याने ‘जगता’ येतं, याची त्यास अशीच कधीतरी उपरती घडते.. आणि मग स्वत्व गवसण्यासाठी.. स्वतःला विसरण्यासाठी.. मन स्वतःलाच आजमावून पाहू लागतं. स्वप्नांकडे घेऊन जाणारी.. मंत्रमुग्ध करणारी.. ध्येयरुपी वाट ते शोधू लागतं. कधी ती वाट त्यास क्षितिजापर्यंत घेऊन जाते, तर कधी अनंतात विलिन होते! आणि हे सारं मनोमन जाणूनही मन मार्गस्त राहतं.. कारण त्यास स्वतःची परीक्षा पहायची असते. ते स्वतःला कितपत ओळखतं? हे त्यास पडताळून पहायचं असतं.. स्वतःस विसरुन स्वतःस शोधायचं असतं! परीक्षा देणे हे सुरुवातीला जीवावर येतं, पण नंतर मन हे त्यातच रमून जातं. कारण तत्क्षणी ते क्षणात गुंतते.. गुरफटते.. असंख्यतेच्या नियंत्रणाऐवजी शून्यानंताकडे डोळे लावून एकात आश्वस्त होते. ‘शून्यानंत’ दरम्यान जे काही घडतं ते ‘जीवन’! शून्यातून ते प्रकट होतं आणि अनंतात विलिन होतं. कदाचित ‘शून्य’ आणि ‘अनंत’ हे एकाच असावेत!

आता हळूहळू मनेही एकत्र येऊ लागली आहेत. मने जेंव्हा एकत्र येतील तेंव्हा कदाचित त्यांस क्षतिजापलिकडील अज्ञात मिती दिसेल. कदाचित या मितीत मनाची सत्वपरिक्षा अखेर पूर्ण होईल. किंवा त्यास नव्या परीक्षेला सामोरं जावं लागेल.