सामाजिक

वैद्याकडे मनाचा इलाज काय!?

ज्या आजारांचे मूळ मनात खोलवर रुजलेले असते, त्यावर वैद्याकडे जाऊन इच्छित फळ ते काय मिळणार!? मनात रुजलेले आजार हे मनाचा कस लावूनच सोडवावे लागतात.

मनास काही खटकते, तेंव्हा त्याची प्रतिक्रिया शरीरात उमटल्याशिवाय रहात नाही. मनाचा खेळ शरीर काहीकाळ झेलून घेते, पण अखेर निसर्गनियमानुसार मानवी शरीर दाद देऊ लागते. मनात दडलेल्या यातना आजाराच्या रूपाने प्रकट होऊ लागतात, तेंव्हा त्यावर वरचेवर केल्या गेलेल्या इलजांचा परिणाम दिसून येत नाही.

वैद्यकीय शिक्षण देत असताना त्यात ‘मन’ हा स्वतंत्र विषय अंतर्भूत करण्यात यायला हवा, इतका हा विषय महत्त्वाचा आहे. पण कोणताही विषय तयार होण्यापूर्वी त्यास प्रथम संशोधनात्मक बैठक मिळवून देणे आगत्याचे ठरते. त्यामुळे यापुढील काळात ‘मन’ या विषयाचे शास्त्रशुद्ध संशोधन व्हायला हवे.

मनाचा अभ्यास केल्यानंतर नवीन उपचारपद्धती, तसेच अधिक परिणामकारक औषधांची निर्मिती होऊ शकेल. अशी औषधे एखादा आजार मुळापासून बरा करू शकतील. अँटिबायोटिक देऊन एखादा रोग केवळ झाकून टाकण्याऐवजी तो मनातून समूळ अदृष्य करणे हेच वैद्यकीय क्षेत्राचे खरे यश असेल. भविष्यात वैद्यकीय क्षेत्रात जी काही प्रगती होईल ती याच दिशेने होईल.