Uncategorized

वेळेचे विचित्र गणित

वेळ म्हणजे काय? जीवन म्हणजे काय? अशा प्रश्नांचा लहानपणी कोणी फारसा विचार करत नाही. पण एके दिवशी अचानकच हे प्रश्न दत्त म्हणून समोर उभे ठाकतात! तेंव्हा अगदी अस्तित्त्वाशी निगडीत इतक्या महत्त्वाच्या प्रश्नांवर उत्तरं शोधायची सोडून आसपासचं जग कोणत्या तंद्रीमध्ये फाल्तू प्रश्नांवरील उत्तरांच्यामागे पळत आहे? ते काही कळत नाही! नंतर समजतं की, ते प्रश्न प्रत्यक्षात माहित असूनही जगाने त्यांच्याकडे सोयीस्कर दूर्लक्ष केलं आहे. कारण जीवन सुखाने जगायचे असेल, तर स्वतःस त्या प्रश्नांना अज्ञेय (जे कधीच जाणून घेतलं जाऊ शकत नाही) म्हणून गृहित धरण्यास शिकवावं लागतं. जुनी पिढी नव्या पिढीला जीवनाशी निगडीत मूलभूत प्रश्नांची उत्तरं देऊ शकत नाही, पण ते प्रश्न कसे टाळायचे? हे मात्र चांगल्या प्रकारे शिकवू शकते. दूर्देवाने हे चांगल्याप्रकारे शिकवण्याइतपत ज्ञान आणि प्रगल्भता सर्वसामांन्यांत सहसा असत नाही. तरी सरतेशेवटी टक्के-टोणपे खात का असेना, ते प्रश्न दूर्लक्षित करण्यास प्रत्येकाला शिकावेच लागते. मृत्यूचा क्षणभर विचार करून पहा! मन लगेच तो विचार झटकून देते!

प्रत्यक्षात वेळ म्हणजे नक्की काय? जो आपल्या व्यक्तिगत आयुष्यातील अनुभवांशी बांधिल आहे, तो वेळ? की जो प्रकाशाच्या गतीशी बांधिल आहे, तो वेळ? की दोन्ही? आयुष्याच्या नजरेतून वेळेकडे पाहिले असता, ती वय आणि अनुभव अशा दोन गोष्टींवर अवलंबून असल्याचे जाणवते. वयासोबतच आपल्यासाठी वेळेची गती देखील वाढते, असे म्हणतात.. आणि माझ्या व्यक्तिगत अनुभवावरुन मला त्यात तथ्य वाटते. अनुभवाच्या अनुशंगाने विचार केला असता.. वेदनादायी काळात वेळ अगदीच संथगतीने पुढे सरकताना जाणवते, तर आपण जेंव्हा उल्हासित असतो, तेंव्हा वेळ कसा झटकन निघून गेला!? ते काही कळत नाही. वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करायचा झाल्यास.. प्रकाशाच्या गतीशी निगडीत वेळेची गती ही वस्तूमान व अंतराळातील गतीवर अवलंबून असते. तेंव्हा प्रत्येक माणसाचे वजन व अंतराळातील गती हे वेगवेगळे असल्याकारणाने अत्यंतिक सूक्ष्मरीत्या का असेना, पण वेळ प्रत्येकासाठी वेगळा असायला हवा. तेंव्हा या दृष्टीकोनातूनही वेळेची जाणिव ही व्यक्तिगतच म्हणावी लागेल.

हे जग वरचेवर अधिकाधिक आनंदी, समाधानी होत आहे, यावर माझा विश्वास आहे. त्यामुळेच की काय? ‘वेळ कसा निघून जातोय काही कळत नाही!’ हे वाक्य आजकाल वारंवार माझ्या कानावर पडू लागले आहे. वेळेचे गणित हे तसं विचित्रच आहे!