व्यक्तिगत

लॅपटॉपची नवी बॅटरी

चुकीचे राऊटर विकत घेतल्याने माझा ऑनलाईन शॉपिंग वरचा विश्वास उडाला आहे, अशातला काही भाग नाही. पण नक्की कोणत्या प्रकारची बॅटरी ही माझ्या लॅपटॉपच्या विशिष्ट मॉडेलसाठी चालेल? हे माहित नसल्याने मी ती प्रत्यक्ष दुकानात जाऊन घ्यायचे पूर्वीच ठरवले होते. काल रविवार असल्याने मित्राला सुट्टी होती. त्यामुळे सकाळी फोन करुन मी त्यास दीड तासाने पुलाखाली येण्यास सांगितले. आता हे नेहमीचे भेटायचे ठिकाण असल्याने त्याबाबत त्यास विस्ताराने सांगायची काही गरज नव्हती. तो वेळेच्या आधीच पुलाखाली पोहचला आणि मला फोन करुन म्हणाला, ‘मी पोलिस स्टेशनच्या समोर उभा आहे!’. आता माहित आहे की, ते पोलिस स्टेशन पुलाखालीच आहे! पण पुलाखालीच उभं राहायचं.. तर ‘पुलाखाली उभा आहे’ म्हणावं ना! ‘पोलिस स्टेशनसमोर उभा आहे!’ म्हणून सांगायची काय गरज आहे? जाऊ दे! मी काही अगदीच वेळेवर पोहचणार्‍यांपैकी नाही. तेंव्हा ठरलेल्या वेळेपेक्षा १०-१५ मिनिटांचा उशीर तो मला व्हायचाच! इकडे माझी गाडी लवकर सुरु होता होईना.. तोपर्यंत त्याचा धीर सुटू नये म्हणून मी त्यास पुन्हा फोन केला. तेंव्हा तो म्हणाला, ‘ठिक आहे! ठिक आहे! मी मसणवाट्यासमोर उभा आहे! ये लवकर!’. आता मान्य आहे की, त्या पुलाच्या शेजारीच मसणवाटा आहे! पण पुलाखालीच उभं रहायचं, तर ‘पुलाखालीच उभा आहे’ म्हणावं ना! ‘मसणवाट्यासमोर उभं आहे! ये लवकर!’ म्हणून सांगायची काय गरज आहे?

पंधरा मिनिटांनी मी पुलाखाली पोहचलो, तेंव्हा तो तिथे माझी वाट पहात उभा होता. मला स्वतःला गाडी चालवायचा कंटाळा आला असल्याने मी त्यास गाडी चालवायला दिली. आजकाल माझी निरीक्षण शक्ति ही कमालीची वाढली आहे. पहिल्या दहा सेकंदातच तो वाहतुकीचे नियम पाळत असल्याचे माझ्या लक्षात आले. मी त्यास काही बोललो नाही, पण इतक्यात त्यानेच सांगायला सुरुवात केली, ‘अरे! काल अपघाताचे व्हिडिओ पाहिले युट्यूबवर! त्यामुळे गाडी नीट चालवली पाहिजे असं वाटायला लागलंय मला!’. मी सिग्नल पाळत असताना ‘भित्रा’ म्हणून माझी हेटाळणी करणारा हा.. आज स्वतःच सर्व सिग्नलचे कधी नव्हे तो अगदी व्यवस्थित पालन करत होता याचे मला समाधान वाटले. त्याच्यातील या चांगल्या बदलावर आमची चर्चा चालू होती.. मी त्याचे कौतुक केले.. म्हटलं, ‘चांगला बदल आहे.. असाच बदल कायम ठेव!’. मी माझं वाक्य पूर्ण करतो न करतो त्याने अचानकच गाडी थांबवली. समोर बघतोय तो काही अंतरावर पोलिसमामा आमचीच वाट पहात उभे होते. बोलण्याच्या नादात पिवळ्या दिव्यास गृहित धरुन त्याने एक कमी वाहतुकीचा सिग्नल तोडला होता. आम्ही आमची गाडी बाजूला उभी केली. मार्च अखेर असल्याने पोलिसांनी शहरात चांगलाच बंदोबस्त केला होता. विशेष गोष्ट म्हणजे, इतकी वर्षं तो वाहतुकीचे नियम फारसे मनावर घेत नसतानाही त्यास पोलिसांनी कधीही पकडले नाही. पण आज जेंव्हा त्याने पहिल्यांदाच स्वतःहून ही गोष्ट मनावर घेतली, तेंव्हा त्यास पोलिसांनी बरोब्बर पकडले! त्यांनी त्यास त्याचे लायसंस मागितले. पण अखेर त्याची ओळख असल्याने दंड वगैरे काही भरावा लागला नाही.

दुकानात पोहचल्यानंतर दुकानदाराने ३५०० हजार रुपयांच्या बॅटरीची किंमत अपेक्षेप्रमाणे ४००० रुपये सांगितली. मी त्यास ऑनलाईन किंमत पाहिल्याचे सांगून काही डिस्कांऊट देण्यास सांगितले. आमच्या संभाषणाचे वैशिष्ट्य म्हणजे, तो पूर्णतः हिंदीत बोलत होता, तर मी पूर्णतः मराठीत बोलत होतो. अशाप्रकारचे संभाषण यापूर्वी केल्याचे माझ्या स्मरणात नाही. मागेच सांगितल्याप्रमाणे माझ्या तोंडातून सहजासहजी हिंदी शब्द फुटतच नाहीत. मला मूळात हिंदीत बोलायची सवयच नाहीये.. आणि समोरच्या माणसाला मराठी समजत असताना आपण कशाला हिंदीत बोलायचे कष्ट घ्यायचे? दुकानदाराने किंमत कमी करण्यास नकार दिला, तेंव्हा मी शेजारच्या दुकानात गेलो. या मराठी दुकानदाराने ३५०० रुपये अशी योग्य किंमत सांगितली, पण ती बॅटरी उद्या मिळणार होती. आता परत उद्या एव्हढ्या लांब कोण येणार? तेंव्हा मी दुसर्‍या एका कंपनीची २००० रुपयांची बॅटरी घेतली. मी त्यास सहज बोलता बोलता म्हणालो की, ‘मी खरं तर ही बॅटरी ऑनलाईच घेणार होतो, पण परत ती लॅपटॉपला चालेल की नाही? असं वाटल्याने मी इथे येऊन घेत आहे.’ तेंव्हा तो म्हणाला की, ‘ते तर आहेच! शिवाय आफ्टर सेल सर्व्हिसही मिळत नाही!’. ऑफलाईन विक्री करणार्‍या सर्व दुकानदारांचा हा मुद्दा ठरलेला असतो. बिल देत असताना त्याचा प्रिंटर बिघडलेला असल्याने त्याने मला थोडावेळ थांबण्यास सांगितले. मी तिथेच एका खुर्चीवर बसलो. समोर पाहिले असता भिंतीवर एक पत्रक लावल्याचे दिसून आले. त्यात ऑनलाईन व ऑफलाईन खरेदी मधील फरक हा अगदी मुद्देसुद विषद करण्यात आला होता. यावरुन ऑनलाईन शॉपिंगचा अशा दुकानदारांवर किती परिणाम होत आहे, ते लक्षात आले. ऑनलाईन शॉपिंग साईट्सनी खरेदीमध्य़े अत्यंत पारदर्शकता आणली आहे. एखाद्या वस्तूचे नेमके मूल्य हे ग्राहकास माहित होत असल्याने ऑफलाईन दुकानदारांची मोठीच पंचायत झाली आहे. त्यांस अखेर योग्य त्या दरात वस्तू पुरवणे क्रमप्राप्त होत आहे. त्यामुळे एखादी वस्तू ही ऑफलाईन खरेदी करायची असेल, तर त्याच वस्तूची ऑनलाईन किंमत ही ग्राहकाने पहायलाच हवी! जेणेकरुन किमतीबाबत आत्मविश्वासाने घासाघाशी करणे हे फार सोयीचे जाते.

आजचा लेख मोठा होत आहे, तेंव्हा काल घडलेला पुढील घटनाक्रम मी काही लिहित नाही. पण कालपासूनचा अनुभव लक्षात घेता बॅटरी तरी अगदी व्यवस्थित काम करत आहे.