म्युच्युअल फंड

लार्ज कॅप म्युच्युअल फंड

‘सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया’ अर्थात सेबीने निर्धारित केलेल्या मानकांनुसार भांडवली बाजारात ज्या कंपन्या बाजारमूल्यानुसार पहिल्या १०० क्रमांकात मोडतात त्यांना ‘लार्ज कॅप’ म्हणून ओळखले जाते. ‘लार्ज कॅप फंड’च्या माध्यमातून शेअर बाजारातील ‘लार्ज कॅप’ कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यावर भर दिला जातो. अशा कंपन्या स्थिरस्थावर झालेल्या असल्याने त्यांमध्ये केलेल्या गुंतवणुकीची दोलायमानता इतर कंपन्यांच्या तुलनेत कमी असते. इक्विटीमध्ये लार्ज कॅप प्रकारात केलेली गुंतवणूक बऱ्यापैकी सुरक्षित मानली जाते. म्हणूनच अशाप्रकारच्या फंडमध्ये होणारी गुंतवणूक देखील अधिक असते.

गुंतवणूक वृद्धी

प्रत्येक ‘अॅसेट मॅनेजमेंट कंपनी’ (म्युच्युअल फंड कंपनी) प्रत्येकी एक ‘लार्ज कॅप योजना’ सुरू करू शकते. या साऱ्या योजनांचा तुलनात्मक अभ्यास करून आपण आपल्यासाठी योग्य अशी योजना निवडू शकतो. अॅक्सिस ब्ल्यूचिप फंड, एचएसबीसी लार्ज कॅप इक्विटी फंड, आयसीआयसीआय पृडेंशिअल ब्ल्यूचिप फंड, एसबीआय ब्ल्यूचिप फंड या सद्यपरिस्थितीतील काही चांगल्या लार्ज कॅप योजना आहेत. ज्या गुंतवणूकदारांना वयामुळे, जबाबदारीमुळे किंवा इतर काही कारणांमुळे अधिक जोखीम पत्करण्याची इच्छा नसते अशा गुंतवणूकदारांसाठी लार्ज कॅप फंड हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. आपण पाहिल्यांदाच दीर्घकाळासाठी ‘एसआयपी’ (पद्धतशीर गुंतवणूक योजना) सुरू करत असाल, तर लार्ज कॅप फंडची अवश्य निवड करावी.