अर्थकारण

रुपयाच्या अवमूल्यनाचे परिणाम

सध्या डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार घसरण सुरू आहे. यानुषंगाने माझी जी काही प्राथमिक निरीक्षणे आहेत ती मी या इथे मांडत आहे. सगळ्यांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित मुद्द्यापासून आपण सुरुवात करू! आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव सध्या वाढत असले, तरी त्यासोबतच रुपयाचे जे काही अवमूल्यन सुरू आहे, त्यामुळे पेट्रोल व डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत. मालवाहतुकीचा खर्च वाढल्याने सहजिकच सर्व प्रकारच्या उत्पादनांचे दर यापुढे वाढीस लागतील.

इंटरनेटचा विचार केल्यास नजीकच्या भविष्यात इंटरनेटवरील सेवांच्या दरात वाढ होण्याची दाट शक्यता आहे. भूतकाळात रुपयाच्या घसरणीसह डोमेन नेम आणि वेब होस्टिंगचे दर वाढले होते, आता देखील हे दर पुन्हा नव्याने वाढतील. ‘जी सूट’ आणि ‘एव्हरनोट’ सारख्या सेवा भारतात खास सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिल्या जातात. परंतु रुपयाच्या अवमूल्यनासह या सेवांवरील आर्थिक ताण वाढणार आहे. त्यामुळे वर्गणीदराच्या अनुषंगाने ते काय निर्णय घेतात? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. आपण जर गुगल प्ले मधून अनुप्रणाली विकत घेत असाल किंवा एखाद्या ऑनलाईन सेवेचे वर्गणीदार असाल, तर या सेवा देखील यापुढे महाग होऊ शकतात. नेटफ्लिक्स, हॉटस्टार, अमेझॉन प्राईम अशा स्ट्रीमिंग सेवांनी जर आपल्या वर्गणीचे दर वाढवले नाहीत, तर पैशांची भरपाई करण्यासाठी ते उपलब्ध टायटल्सची संख्या कदाचित काही प्रमाणात कमी करू शकतात.

सध्या शेअर बाजारात मोठ्या प्रमाणावर पडझड झाली असली, तरी फार्मा आणि आयटी क्षेत्राशी निगडित कंपन्यांना त्यातल्यात्यात तुलनेने थोडा कमी फटका बसला आहे. याचे कारण म्हणजे फार्मा आणि आयटी क्षेत्रातून भारताबाहेर निर्यात केली जाते. या कंपन्यांची डॉलरमध्ये कमाई होत असल्याने साहजिकच त्यांचा रुपयांमधील फायदा वाढला आहे. ज्यांनी म्युच्युअल फंडच्या माध्यमातून अमेरिका, जपान अशा भारताबाहेरील शेअर बाजारांत गुंतवणूक केली असेल, त्यांना देखील याकाळात काही प्रमाणात फायदा झाला असेल.

जे परदेशात राहून शिक्षण घेत आहेत किंवा जे परदेशी प्रवास करणार आहेत त्यांना अर्थातच या अमूल्यनाचा फटका बसेल. दुसरीकडे जे परदेशात राहून कमवत आहेत त्यांना मात्र रुपयाच्या घसरणीचा फायदा होईल. बाकी इथे राहून काम करणारे कंटेंट क्रिएटर, डेव्हलपर, फ्रिलांसर, ज्यांना परदेशी ग्राहक, प्रेक्षक, वाचक आहेत, त्यांना या अवमूल्यनाचा फायदा होऊ शकतो.

डॉलरच्या तुलनेत रुपयाची जी घसरण सुरू आहे त्याचे व्यक्तीगणिक होणारे परिणाम निरनिराळे असले, तरी सर्वसामान्य माणसाला मात्र नजीकच्या काळात या गोष्टीचा तोटा झालेला दिसून येईल.