सामाजिक

रिकामटेकड्या बातम्या

मराठी बातम्यांची आणखी एक नवी वाहिनी सुरु होणार आहे आणि ‘उतारमतवादी’ नेतृत्त्वाखाली ही वृत्तवाहिनी चालवली जाणार आहे अशी ‘बातमी’ आहे. अधिच सतरा न्यूज चॅनल असताना त्यात आणखी एकाची भर पडावी यावरुनच सरासरी समाजास स्वतःचं सोडून सगळ्या जगाचं कित्ती पडलेलं असतं! हे नव्याने सिद्ध होतं! मूळात सर्वसाधारणपणे पत्रकार हे सर्वसामान्य प्रगल्भतेचे लोक असतात. त्यामुळे त्यांच्याकडून ताळतंत्र बाळगून जबाबदारीने वृत्तांकन होईल ही अपेक्षाच बाळगणे चुकीचे आहे. व्यावसायिक लोकांच्या ताब्यात असलेल्या या वृत्तवाहिन्या अथक २४ तास ७ दिवस चालवाव्या लागतात. तेंव्हा नाही नाही त्या बातम्या शोधून दाखवणे क्रमप्राप्तच आहे! आणि शेवटी काहीच नवे न मिळाल्याच तेच ते हजार वेळा दाखवणे हेही क्रमप्राप्त! मला वाटतं वृत्तवाहिन्यांचं अर्थकारण हे केवळ जाहिरातींवर अवलंबून असतं, तर कदाचित एव्हढ्या वृत्तवाहिन्या निघाल्याच नसत्या. त्यामुळे यांची आर्थिक गणितं ही काही वेगळीच असली पाहिजेत.

सतत वृत्तवाहिन्या पाहणार्‍या लोकांनी उगाच स्वतःचा असा ग्रह करुन घेतलेला असतो की, आपण फार बुद्धिवादी महामानव आहोत. त्यामुळे महामानवतेच्या या धुंदीत ते कोणाचे तरी स्वयंस्फूर्त अनुयायी बनून त्यांच्यातर्फे अगदी हिरिरीने रिकामटेकडे वाद फुकट झोडत असतात. जे लोक ‘डेली सोप’ पाहतात, अशांना ते ‘तुच्छ’ लेखतात आणि स्वतः दिवसभर राजकारण्यांचा निरर्थक ‘रिअ‍ॅलिटी शो’ पाहण्यात मग्न राहतात. नकारात्मकतेत मनोरंजन देण्याचा व मिळवण्याचा हा प्रकार अतिशय निंदनीय आहे. अखेर वृत्तवाहिन्या आणि प्रेक्षक हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. नकरात्मकतेतला हा आनंद दोघेही हातात हात घालून घेत असतात.

पण मग वृत्तवाहिन्यांनी दाखवावं तरी काय? समाजातील महत्त्वाच्या अशा चांगल्या-वाईट घटना समाजाच्या दृष्टीपथात आणने हे मूळात पत्रकारीतेचा भाग असल्याने बातम्यांपासून नकारात्मकता पूर्णतः वेगळी करता येणार नाही. पण नकारात्मक गोष्ट जाणून घेऊन, त्यावर विचार करुन सकारात्मकतेकडे मार्गस्थ व्हायचं की नकारात्मकतेतच सतत रेंगाळत रहायचं! याची काहीतरी जाणिव वृत्तवाहिन्यांनी बाळगायला हवी! दुसरं असं की, वृत्तवाहिनी पाहणं न पाहणं हे शेवटी प्रेक्षकाच्या हातात आहे. तेंव्हा आपणास आपल्या जीवनात काय हवं आहे? याचं भान प्रेक्षकांनीही राखायला हवं. काही लोक तर दिवसभर बातम्या लावून स्वतःच्याच घरातील वातावरण गढूळ करत राहतात. कमीतकमी जेवताना तरी काही चांगलं पहावं!

इंटरनेट, सोशल नेटवर्क हा बातम्या मिळवण्याच्या आजच्या काळातील सर्वोत्तम मार्ग आहे. इथे मुख्य बातमी आणि थोडक्यात गोषवारा समजला की, रेंगळण्याचे फारसे कारण उरत नाही. परदेशात हा बदल सुरु झाला आहे, आता इथेही हळूहळू हा बदल घडू लागेल. समाजाचे सरासरी बौद्धिक वय काळपरत्वे वाढत आहे, तेंव्हा रिकामटेकड्या बातम्यात रेंगाळणेही पर्यायाने कमी होईल अशी आशा बाळगण्यास हरकत नाही.