म्युच्युअल फंड

म्युच्युअल फंडचे मुख्य प्रकार

गुंतवणूकदारांच्या निरनिराळ्या गरजा लक्षात घेऊन म्युच्युअल फंड योजना देखील वेगवेगळ्या प्रकारांत उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. यथावकाश या सर्व प्रकारांची माहिती आपण घेणारच आहोत, पण तत्पूर्वी ढोबळमानाने म्युच्युअल फंडचे जे ३ मुख्य प्रकार आहेत, त्यांची अगदी थोडक्यात माहिती घेऊ.

इक्विटी फंड : अधिक परतावा, अधिक दोलायमानता

शेअर बाजाराच्या माध्यमातून निरनिराळ्या कंपन्या भविष्यातील आपल्या वाढीसाठी गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा करत असतात. परंतु यापैकी कोणत्या कंपन्यांमध्ये आपण गुंतवणूक करायला हवी? याची सर्वसाधारण गुंतवणूकदाराला कल्पना नसते. अशावेळी प्रत्यक्ष त्या क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञांच्या ज्ञानाचा आपल्याला चांगला उपयोग होऊ शकतो. इक्विटी फंडच्या माध्यमातून नेमकी हीच गोष्ट साध्य होते. अशाप्रकारच्या म्युच्युअल फंड योजनेत गुंतवलेले पैसे हे पुढे तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली प्रामुख्याने शेअर बाजारांतील कंपन्यांमध्ये गुंतवले जातात. सामान्यतः इक्विटी म्युच्युअल फंडद्वारे मिळणारा परतावा तुलनेने जास्त असला, तरी अल्पमुदतीत (short-term) हा परतावा कमी-जास्त होण्याची शक्यता देखील अधिक असते. दुसरीकडे दिर्घमुदतीत (long-term) मात्र ही दोलायमानता कमी होत जाते.

डेट फंड : कमी परतावा, कमी दोलायमानता

म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून केवळ शेअर बाजारात गुंतवणूक करता येते असे नाही. आपल्याला जर म्युच्युअल फंडद्वारे अल्पमुदतीसाठी पैशांची सुरक्षित गुंतवणूक करायची असेल, तर त्यासाठी डेट फंड या उत्तम पर्याय आहे. डेट फंडच्या माध्यमातून कॉर्पोरेट बॉण्डस, सरकारी कर्जरोखे अशाप्रकारच्या अर्थबाजारांतील साधनांमध्ये आपले पैसे गुंतवले जातात. थोडक्यात ज्या माध्यमांतून कर्जांची विश्वासनियरीत्या देवाण-घेवाण होते, त्या माध्यमांत पैशांची गुंतवणूक केली जाते. अशाप्रकारच्या गुंतवणुकीवरील परतावा इक्विटीच्या तुलनेत जरी कमी असला, तरी या परताव्याची दोलायमानता देखील कमी असते.

हायब्रिड फंड : मध्यम परतावा, मध्यम दोलायमानता

ज्यांना इक्विटी फंडचा परतावा आणि डेट फंडची सुरक्षितता हवी असते, ते गुंतवणुकीसाठी हायब्रिड फंडची निवड करू शकतात. हायब्रिड फंडमध्ये करण्यात आलेली गुंतवणुक शेअर बाजार आणि अर्थबाजारातील साधनांमध्ये विभागली जाते. अशाप्रकारच्या गुंतवणुकीवरील परतावा सहसा इक्विटीपेक्षा कमी असला, तरी तो डेटपेक्षा अधिक असतो. शिवाय या फंडची दोलायमानता देखील इक्विटी आणि डेट फंड दरम्यान पाहायला मिळते.

इक्विटी, डेट आणि हायब्रिड फंडचे आपल्या गरजेनुसार पुढे अनेक उपप्रकार आहेत. आपले वय, आर्थिक परस्थिती, तसेच गरजा लक्षात घेऊन आपण स्वतःसाठी योग्य अशा म्युच्युअल फंड योजनेची निवड करू शकतो.