समिक्षा

मॅक्झिम गॉर्की : आई – भाग २

एखादे आत्मचरित्र किंवा खर्‍या जीवनाची पार्श्वभूमी असलेली कादंबरी आपण जेंव्हा वाचत असतो, तेंव्हा काही क्षण स्वतःहाचे जीवन विसरून त्या कथानायकांच्या जीवनाशी समरस होतो. तेंव्हा वाटू लागतं की, जीवनात एवढी मोठी दुःखं, संकटं आहेत तरी हे लोक त्यांच्याकडे किती सहज दृष्टीने पाहतात आणि मी माझ्या किती क्षुल्लक गोष्टी मनात घेऊन बसलो आहे. जेंव्हा माणसासमोर उदात्त ध्येय असतं, तेंव्हाच त्याला जीवनाचा खरा मार्ग सापडतो.

नवर्‍याच्या मृत्यूनंतर तिचा मुलगा पावेल हेच विश्व असणारी ‘आई’ आपल्या विश्वात नव्याने दिसणार्‍या गोष्टींनी गोंधळून गेली. तिचा मुलगा पावेल हा त्या वस्तीत आत्तापर्यंत कोणी केलं नव्हतं, असं काहीतरी करू लागला आहे, हे तिला आता कळून चुकलं होतं, आणि त्यामुळेच तिला भितीही वाटू लागली होती. ती त्याबाबत त्याला सरळ सरळ विचारू शकत नव्हती. तेव्हढं तिच्यामध्ये धाडस नव्हतं. पण पावेलने तिच्या मनातील ही खळबळ जाणली होती. एका प्रसंगात जेंव्हा पावेलने शहरातील काही लोक त्याला भेटायला येणार आहेत असं आईस सांगितलं, तेंव्हा ती एकाएकी हुंदके देऊन रडू लागली. यावेळी पावेल तिच्यावर थोडासा चिडला, पण त्याने तिची समजूत घातली. तरीही ती विलक्षण माणसं आपल्या घरी येणार ही कल्पना मनात येताच ती दचके व तिच्या अंतःकरणाचा थरकाप होई.

जेंव्हा पावेलच्या घरात त्याची व त्याच्या सहका-यांची गुप्त बैठक चालत असे, तेंव्हा आईला त्यांच्या बोलण्यातील अवघड शब्द काही कळत नसत. मग ती नुसतंच तिथे जमलेल्या लोकांच्या चेहर्‍यांचे निरीक्षण करत असे व प्रत्येकाच्या स्वभावाबद्दल आपल्या मनात काही समजूत करुन घेत असे.

पावेलचा जवळचा सहकारी असलेल्या आंद्रेईची पहिल्याच भेटीत आईवर चांगली छाप पडली व नंतर ती स्वतःहून पावेलला एक दिवस म्हाणाली, ‘त्याला आपल्याच घरी राहायला सांगू या.’ आंद्रेई स्वभावाने प्रेमळ होता व तो आईशी पावेलपेक्षाही अधिक समजून घेऊन वागत असे. आपल्या मुलाबरोबर त्याला साथ देणारं, त्याची काळजी घेणारं कोणीतरी असावं, असा आईचा आंद्रेईला सोबत बोलावण्यामागे उद्देश होता.

क्रांतीकारी चळवळी व अशा चळवळी करणारे लोक, या सर्व गोष्टी आईला आधी फार दूर देशीच्या वाटत होत्या. तिच्या जुन्या जीवनाचा या नव्या जीवनाशी तिळमात्र संबंध नव्हता. श्रीमंतीत वाढलेली असूनही रात्री-अपरात्री मोठे कष्ट घेऊन गुप्त कार्य करणारी साशा.. आईला अशा तरुण मुलींकडे पाहून वाटत असतं, आपण आपलं आत्तापर्यंतचं सर्व जीवन उगाच निरुद्देश व्यतीत केलं. आईला माहित असतं साशा व पावेलचं एकमेकांवर प्रेम आहे व तिलाही त्या दोघांचं लग्न व्हावं असंच वाटत असतं. पण पावेलला आपले कार्य करता यावे म्हणून संसारात पडायचं नसतं. शिवाय साशा अटेकेत असताना पावेल बाहेर असायचा, तर जेंव्हा पावेलला अटक झाली तेंव्हा नुकतीच साशा सुटून आली होती.

कधी रात्री अचानक घरांची घेतली जाणारी झडती, अखंड बडबड करणारी आईची शेजारीण, पावेलला व आंद्रेईला ‘मे’ दिनादिवशी झालेली अटक! त्यानंतर स्वतः कारखाण्यात गुप्तपणे पत्रके वाटणारी, आपल्या मुलाच्या कार्यात आपण त्याला मदत केली म्हणून स्वतःहाचे कौतुक वाटणारी व यामुळे पावेलला मिळणार्‍या आनंदातच आपला आनंद मानणारी आई! इथपर्यंतचा पुस्तकातील सर्वच भाग हा फारच वाचनीय आहे.

कादंबरीच्या दुसर्‍या भागात आईचे कार्य व साम्यवादी विचारसरणींना महत्त्व दिले गेले आहे. उत्तरार्धात तोच तोच पणा जाणवू लागतो. काही ठराविक विचार, तिच वाक्यं केवळ शब्दरचना बदलून वेगवेगळ्या व्यक्तिंनी , वेगवेगळ्या प्रसंगी उच्चारलेली आहेत. क्रांतीनंतर पुढील जीवन ‘भव्य असेल, दिव्य असेल, समानतेचे असेल’ असे त्यातील पात्र असंख्य वेळा म्हणतात. पण तेंव्हा नेमकी शासनप्रणाली कशी असेल? हे त्यांनी सांगितलेले नाही. वास्तविक लेखक एखाद्या पात्राच्या तोंडून अगदी थोडक्यात ते सहज सांगू शकले असते. दुसरी गोष्ट म्हणजे सर्वांनी एकत्र काम करून समान नफा वाटून घ्यावा, हे पटत व समजत नाही. हा समानतेवरील उपाय कधीच ठरू शकत नाही. मूळ मानवी स्वभावाचा विचार करता नफा समान वाटून घेणे शक्य नाही व ते न्याय्य देखील नाही.

आणखी एक गोष्ट म्हणजे गॉर्कींनी कादंबरीत अगदी कुठेही पावेलचा हिंसक आंदोलनाचा विचार प्रकट केलेला नाही. ‘मे’ दिनादिवशी तर मला वाटलं अहिंसेचा शोध यांनीच आगोदर लावला होता की काय? पण प्रत्यक्षात कादंबरी पूर्ण वाचून झाल्यावर खर्‍या पावेलविषयी माहिती सांगताना तिथं स्पष्ट म्हटलं आहे की, ‘मॉस्कोत प्योत्रवर (खरा पावेल) सशस्त्र दले उभारण्याचे काम सोपविण्यात आले होते व तो त्याच्या पत्नीसह बाँबची कवचे बनवत असे.’

पण एकंदरीत विचार करता मॅक्झिम गॉर्की यांचे आई हे पुस्तक अप्रतिम आहे. नवीन जीवनाशी समरस होऊन आपल्या मुलाच्या बरोबरीने कार्य करणं हे नक्कीच आईला सोपं गेलं नाही. तिचा जुन्या जीवनाकडून नवीन जीवनाकडे झालेला प्रवास हाच कादंबरीचा अत्यंत वाचनीय भाग आहे. आपल्या स्वतःच्या जगापेक्षाही एक फार मोठं जग आहे आणि जेंव्हा आपण ह्या संपूर्ण जगाचा विचार करतो, तेंव्हा आपण आपल्या स्वतःच्या दुःखांना विसरुन जातो.