Uncategorized

मूर्खत्त्वाची प्रमाणवेळ

शाळेय वयात पहाटे ४ वाजता ऊठून आभ्यास करावा असे जुनी-जाणती माणसे सांगत असत. एव्हाना घड्याळही घराघरात पोहचले होते, तेंव्हा थेट ४ चा गजर लावायचा! अर्थात मी अंतःप्रेरणेने ४ ला ऊठून कधी आभ्यास केलेला नाही, तरी परिक्षेच्या काळात आभ्यास झाला नसल्याकारणाने ऊठावं लागायचं! पण जुनी-जाणती माणसे सांगतात तशी प्रसन्नतेची अनुभूती काही मला ४ वाजता यायची नाही. उलट त्या स्मशान शांततेत भुताखेतांचाच आभास अधिक जाणवायचा! पाचला साधारण दहा-पंधरा मिनिटे कमी असताना मात्र पक्षांचा किलबिलाट सुरु व्हायचा.. निसर्गात नवचैतन्य अवतरायचे! मोठ्या लोकांच्या शब्दाप्रमाणेच त्या वयात माझ्यासाठी वेळही अगदी प्रमाण होती! तरी त्या प्रमाणवेळेचे असे विचित्र वागणे मात्र माझ्यासाठी अनेक वर्षं एक कोडंच होतं! कारण वडीलधार्‍यांच्या शब्दांस ती काही प्रमाण मानत नव्हती! पण शेवटी घड्याळ मागे पडलं, तरी वेळ कधी मागे पडत नाही.. तेंव्हा वेळ तरी कशी चुकेल? ..मग मला वाटायचं की, मीच कुठेतरी चुकत असेन!

त्यानंतर शाळेत प्रमाणवेळचा धडा अगदी चांगल्यारितीने  गिरवला, तरी या कोड्याची आणि त्या धड्याची सांगड काही घातली गेली नाही. आता राष्ट्रिय पातळीवरील स्पर्धापरिक्षेसाठी भरलेल्या शिबारात प्रत्यक्ष प्राचार्यच आम्हाला घड्याळातील ४ वाजता उठण्यास सांगत होते, तेंव्हा सर्वसामान्य जनतेची ती काय कथा? पुढे एकदा भिंतीच्या सावलीवरुन मी माझ्या इथल्या नैसर्गिक वेळेचा अंदाज घेतला, तेंव्हा मला समजलं की माझ्या इथली नैसर्गिक वेळ ही प्रमाणवेळेहून साधारण पाऊण तास मागे आहे! पण लहाणपणीचं ते कोडं एव्हाना मागे पडलं असल्याने मी त्यावर फार काही विचार केला नाही. त्यानंतर काही वर्षांनी कॉलेजमध्ये असताना अचानकच मला ते लहानपणीचं कोडं आणि भिंतीचा तो प्रयोग एकत्रितपणे आठवला! ..आणि माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला! आपण किती मूर्ख आहोत, ते देखील नव्याने समजले.

आपण ज्या वेळेस प्रमाण मानतो, ती ‘प्रमाणवेळ’. याचा अर्थ ती निसर्गास धरुन असेलच असे नाही! स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात दोन प्रमाणवेळा अस्तित्त्वात होत्या. अगदी स्वातंत्र्यानंतरही १९५५ सालापर्यंत मुंबईची प्रमाणवेळी ही भारताच्या सध्याच्या प्रमाणवेळेपेक्षा ३९ मिनिटे मागे होती. त्यानंतर मात्र संपूर्ण भारतात एकच प्रमाणवेळ अस्तित्त्वात आली. त्यामुळे यापुढे पहाटे पक्षांचा किलबिलाट सुरु झाला, की चार वाजले असे समजावे! कारण निसर्गाच्या सानिध्यात राहणार्‍यांनाच आता वेळेचे भान उरले आहे.. जे निसर्गापासून दूरावात आहेत ते वेळेचे भान हरखून प्रमाणवेळेवर पळत आहेत. आज रात्री झोपण्यास १२ वाजले, तरी उशीर झाला म्हणून काळजी करु नका.. निवांत झोपा.. सव्वा आकराच वाजले आहेत! ..आणि हे मी पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांना सांगतोय!