म्युच्युअल फंड

मिड कॅप म्युच्युअल फंड

बाजरामूल्यानुसार शेअर बाजारात ज्या कंपन्या १०१ ते २५० क्रमांकात मोडतात त्यांची गणना ‘मिड कॅप’ विभागात होते. ‘मिड कॅप फंड’च्या माध्यमातून मिड कॅप प्रकारातील मध्यम आकाराच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यावर भर दिला जातो. अशाप्रकारच्या कंपन्या काहीशा स्थिरस्थावर झालेल्या असल्या, तरी लार्ज कॅप कंपन्यांच्या तुलनेत त्यांच्या वाढीसाठी आणखी बराच वाव असतो. त्यामुळे एकंदरीत पाहता मिड कॅप फंडमध्ये केलेल्या गुंतवणुकीतून कालांतराने चांगला परतावा मिळण्याची शक्यता अधिक असली, तरी यातील गुंतवणुकीची दोलायमानता व पर्यायाने जोखीम ही लार्ज कॅप फंडच्या तुलनेत जास्त असते.

गुंतवणूक वृद्धी

म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीवर अधिक परतावा मिळावा यासाठी जे मध्यमप्रतीची जोखीम स्वीकारण्यास तयार आहेत, ते स्वतःसाठी मिड कॅप फंडची निवड करू शकतात, मात्र मिड कॅप फंडमध्ये गुंतवणूक करत असताना आपल्या डोळ्यांसमोर दीर्घकालीन नियोजन असायला हवे. अल्पमुदतीत लागणारे पैसे मिड कॅप विभागात गुंतवू नयेत, कारण बाजारातील दोलायमानतेमुळे आपला तोटा देखील होऊ शकतो. दिर्घकालीन नियोजनामध्ये गुंतवणुकीवरील दोलायमानतेचा परिणाम कमी होत जातो, अशाने भविष्यात आपल्याला चांगला परतावा मिळण्याची शक्यता वाढीस लागते. आपल्यावर जबाबदारीचा फारसा ताण नसेल आणि लार्ज कॅप फंडमध्ये नियमित गुंतवणूक सुरू असेल, तर मिड कॅप फंडमध्ये गुंतवणूक करण्यास हरकत नाही.