व्यक्तिगत

माझी पहिली दैनंदिनी

दैनंदिनी लिहायला मी फार पूर्वी सुरूवात केली होती. पण ते काही माझे स्वनिर्मीत लेखनातील पहिलेच पाऊल नव्हते. पहिलीला जाण्याआधीच मी कविता लिहायला सुरुवात केली होती. त्या दोन कविता आजही माझ्याकडे आहेत. त्या मी तुमच्यासमोर पुढे मागे सादर करेनच. चौथीमध्ये असताना छोट्या मावशीने (मोठ्या मावशीपेक्षा छोटी, ती छोटी मावशी) एक छोटी डायरी दिली होती. व सांगितलं की, यामध्ये रोज काय काय घडलं, त्याबद्दल तुला काय वाटलं, ते लिहित जा. लहानपणी मी डायरीसाठी फार हावरा होतो व कुणाकडून एखादी डायरी मिळाली की, मला फार आनंद होत असे. खास करून नवीन वर्षाच्या सुरूवातीला मी पप्पांकडून एक नवीन डायरी घेतच घेत असे. (हा भाग वेगळा की त्या डायरीची निम्यापेक्षा जास्त पानं वर्षाच्या अखेरपर्यंत कोरीच रहात.) अशा अनेक डायर्‍या आज माझ्याकडे आहेत.

ती मावशीने दिलेली छोटीशी डायरी दवाखाण्याशी संबंधीत एका गोळ्यांच्या कंपणीची होती. त्यावर एका सर्दीने त्रासलेल्या, फुगून लाल झालेल्या नाकातून पाणी गळत असलेल्या, थकलेल्या डोळ्यांतून आपण किती बेजार झालो आहोत हे दर्शवणार्‍या माणसाचं चित्र होतं. तेंव्हा मीही सतत सर्दीने आजारी पडत होतो (इतरांपेक्षा जास्त) नी त्यामुळे माझा चेहराही काहीसा तसाच होत असावा. म्हणून मला मावशी त्यावरून चिडवत असे की, तो मीच आहे म्हणून!

तेंव्हा मी सांगेल ते ऐकणारा एक गुणी आणि हुशार मुलगा होतो. आणि त्यामुळंच वर माझाच(?) फोटो असणार्‍या त्या छोट्याशा डायरीत मी माझी पहिली दैनंदिनी लिहायला सुरूवात केली. तो पहिलाच दिवस त्यावेळी मी जसा लिहीला आहे तसाच इथेही लिहीतो..

१७/१/९७ शुक्रवार

आजचा शाळेतला दिवस फार चांगला गेला.
आज तास 8 ते 12 होता. आणि जिल्हा परिषदेची
(स्कॉलरशीप) परीक्षाही होती. बाईंनी तासात
प्रश्नाउत्तरे घेतली, त्यातल्या एका गणिताचा पर्याय
चुकीचा आहे असे मुले म्हणाली. पण मी म्हणालो
तो पर्याय बरोबर आहे. तसे मीबाईंना कसे ते
समजावून सांगितले. बाईंना ते पटले, लगेच बाईंनी
माझे कौतूक केले. त्यावेळी मी आजारी असल्यामुळे
बाईंनी माझे जास्तच कौतुक केले. कारण त्यावेळेस
मी १५-१६ दिवस आजारी होतो, म्हणून मी शाळेत
आलो नव्हतो.
नंतर मला बाईंनी एक प्रश्न विचारला,
तो प्रश्न पण मला आला.
आजची परिक्षा तर फारच
सोपी होती. दोन प्रश्न फक्त आले नाहीत. माझा पेपर
लगेच ४०मिनिटांत पार पडला. मला स्कॉलरशीप चा
पेपर मला कधीही सोपा गेला नव्हता. मला ९० च्या
पुढे मार्क पडण्याची अपेक्षा आहे.
तो तास गणिताचा
होता. मला आज बाईंनी सांगितले तुला(महाराष्ट्र विद्यापिठ
मध्ये ८८ मार्क आहेत.) चांगले आहेत.

ते वर्ष माझं यशाच्या दॄष्टीनं सर्वांत चांगलं वर्ष होतं. टिळक विद्यापीठ, भारती विद्यापीठ, महाराष्ट्र विद्यापीठ, सामान्य ज्ञान अशा अनेक परीक्षांतून कधी वर्गातून, कधी जिल्हातून, तर कधी महाराष्ट्रातून क्रमांक पटकावला होता. स्कॉलरशीपच्या परीक्षेत जिल्हातून मला १४वा क्रमांक मिळाला होता. तर टिळक विद्यापीठ परिक्षेत मी राज्यात पाचवा आलो होतो. आणि जेंव्हा मी कधी कधी मागे वळून बघतो, दैनंदिनी वाचतो… तेंव्हा वाटतं, मीही कधीतरी काहीतरी केलं होतं तर..