सामाजिक

महाराष्ट्र धर्म वाढवावा!

आज महाराष्ट्राकडे पाहिले असता माझ्या मनास एक प्रांजळ खंत लागून राहते. एव्हढी प्रामाणिक गुणवत्ता असणारा हा प्रदेश केवळ स्वतःला ओळखू न शकल्याने आजमितीस जागतिक स्तरावर आपली स्वतंत्र ओळख निर्माण करू शकला नाही. महाराष्ट्राने समाजसुधारकांचा सुधारणावादी वारसा जपत जर स्वतःकडे आदराने, आपुलकीने, उदारतेने लक्ष दिले असते, तर आजघडीला हा देश युरोपीय देशांच्या पंक्तीत जाऊन बसला असता याबाबत माझ्या मनात शंका नाही!

मागील शंभर वर्षांत महाराष्ट्राची झालेली वाताहात आत्मीयता जोपासणाऱ्या मराठी मनास नक्कीच क्लेशदायक ठरते. तरी एका व्यवस्थेत अडकलेले मराठी मन हा क्लेश उरी बाळगून प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडत राहते. महाराष्ट्राचे भावी हित हेरून त्यादृष्टीने दिशा दाखवण्याची दृष्टी मध्यंतरीच्या काळातील लेखक, समाजसुधारक दाखवू शकले नाहीत हे वास्तव आहे. दुर्देवाने ते देखील सर्वसामान्य माणसांप्रमाणे बदलत्या काळातील प्रचलित व्यवस्थेत नकळत अडकून पडले. तरी हे काम आता भविष्यात व्हायला हवे असे आज महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने वाटते.

सध्याचा काळ हा महाराष्ट्राची परीक्षा पाहणारा आहे. महाराष्ट्रात हिंदीचा प्रचार-प्रसार व्हावा व भविष्यात हिंदी महाराष्ट्राची राजभाषा व्हावी यासाठी माध्यमांना हाताशी धरून राजाश्रयाने प्रयत्न होताना दिसत आहेत. प्रामाणिकता, उदारता आणि न्यायनिष्ठता जोपासणारा ‘महाराष्ट्र धर्म’ बुडावण्याचे मनसुबे रचले जात आहेत. त्यासाठी खोटारडेपणाचा आधार घेतला जात आहे. ज्या दिवशी ‘महाराष्ट्र धर्म’ बुडालेला असेल, त्या दिवशी महाराष्ट्राची वैचारिक पुण्याई संपलेली असेल. विचारविहिन महाराष्ट्रास व पर्यायाने मराठी माणसास त्यानंतर कवडीचेही मोल राहिलेले नसेल. तेंव्हा हा ‘महाराष्ट्र धर्म’ जोपासणे हे आजच्या मराठी पिढीचे परमकर्तव्य आहे. ‘मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा’ ही समर्थ रामदास स्वामी यांची ओळ आज युगांतरानंतरही महाराष्ट्राच्या दृष्टीने प्रस्तुत ठरते.

मराठी भाषा हा महाराष्ट्राचा प्राण आहे. मराठी माणसाच्या निष्काळजीपणामुळे महाराष्ट्राचे एव्हढे वैचारिक प्रदूषण झाले आहे की, आजमितीस त्यात मराठी माणसाचाच श्वास कोंडत आहे. आता ही घुसमट थांबल्याखेरीज महाराष्ट्राचा उत्कर्ष साध्य होणे शक्य नाही. याबाबतीत खूप काही करता येण्यासारखे असून महाराष्ट्रास एका वैचारिक बैठकीची गरज आहे. त्याकरिता महाराष्ट्रातील लेखकांनी, विचारवंतांनी, तसेच समाजसुधारकांनी आपुलकीने व आत्मविश्वासाने पुढे येण्याची आवश्यकता आहे. आज ५८व्या महाराष्ट्र दिनानिमित्त मी सर्व मराठी बांधवांना मनापासून शुभेच्छा देतो! आपल्या सर्वांच्या एकजुटीने महाराष्ट्र येत्या काळात संपूर्ण जगात आपली ओळख निर्माण करेल याबाबत विश्वास आहे! जय महाराष्ट्र!