मराठी महाराष्ट्र

मराठी माध्यमांकडून सुरू असलेली फसवणूक

जेंव्हा तुम्हाला वेळोवेळी गृहीत धरले जाते, तेंव्हा तो तुमच्या अस्तित्त्वाला अंकित करण्यासाठी केलेला एक कट असतो. प्रत्येक मराठी माणसाला हिंदी येते हे माध्यमांचे गृहीतक देखील असेच मराठी संस्कृतीला अंकित करू पहात आहे. आजच्या काळात मराठी माध्यमांतून केवळ हिंदी भाषेचाच नव्हे, तर हिंदी कार्यक्रमांचा देखील संचार होऊ लागला आहे. यास भाषिक उदारतेचा कितीही सोनेरी मुलामा दिला, तरी प्रत्यक्ष आतून मात्र मराठी भाषेप्रति माध्यमांची असलेली कर्तव्यकसुरता आणि महाराष्ट्रविरोधी मानसिकता दडलेली आहे.

मला हिंदी भाषा येते किंवा नाही हे माध्यमांनी परस्पर ठरवू नये, कारण तो माझा व्यक्तिगत प्रश्न आहे. जेंव्हा आपण मराठी असल्याचे एखादे माध्यम सार्वजनिकरित्या स्पष्टपणे जाहीर करते, तेंव्हा त्यावर परकीय भाषेचा वापर होणे अपेक्षित नाही; आणि जर परकीय भाषा वापरावीच लागणार असेल, तर सोबत त्याचे शाब्दिक भाषांतर देणे अत्यावश्यक आहे. मराठी म्हणून जर मी एखादे माध्यम पाहू लागलो आणि त्यावर मध्येच हिंदी संवाद, मुलाखत वा कार्यक्रम दिसणार असेल, तर ग्राहक म्हणून ती माझी शुद्ध फसवणूक आहे.

पण ही गोष्ट केवळ ग्राहकांच्या फसवणुकीपुरती मर्यादित रहात नाही, तर मराठी माध्यम म्हणून त्यांनी केलेली ती एक दर्जात्मक तडजोड बनते. सादरीकरण करताना वा विषय मांडताना माध्यमांनी मूलभूत भाषिक नियम पाळणे अपेक्षित आहे. अशावेळी भाषांतराची तसदी न घेणे हे कामचुकारपणाचे लक्षण आहे. कामचुकारपणा आणि कर्तव्यकसुरता या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, ज्या भविष्यात महाराष्ट्राच्या मुळावर घाव घालू शकतात.

मराठी माणसाला हिंदी समजते म्हणून गृहीत धरणे हा केवळ पहिला टप्पा आहे, हिंदी ही मराठी माणसाचीच भाषा असल्याचे त्याच्या अंतर्मनावर बिंबवणे हा पुढील टप्पा असेल. बालवयात लहान मुलांना दिले जाणारे हिंदीचे अनावश्यक शिक्षण, मातृभाषा म्हणून आपण हिंदी जपली पाहिजे असा राजकीय पक्षांकडून केला जात असलेला धूर्त प्रचार, हे सारे मराठी मनाला पर्यायाने महाराष्ट्राला अंकित करण्याच्या कटाचाच एक भाग आहे. पण अशी कट-कारस्थाने केवळ निद्रिस्त माणसावर चालू शकतात! आणि म्हणूनच आज महाराष्ट्राने आपल्या अस्तित्त्वासाठी जागृत होण्याची नितांत आवश्यकता आहे.

मराठीच्या नावाखाली आमच्या माथी हिंदी भाषा का मारली जात आहे? याचा आपण माध्यमांना जाब विचारायला हवा. मराठी हीच आमची मातृभाषा आहे हे आपण राजकारण्यांना ठणकावून सांगायला हवे. आपल्या मुलांचा अमूल्य वेळ हिंदीचे धडे गिरवण्यात का वाया घालवला जात आहे? याचा पालकांनी शिक्षणव्यवस्थेकडे माग लावायला हवा. यासोबतच मुलांसाठी मराठी भाषेतून कार्टून वाहिन्या का प्रसारित होत नाहीत? खेळांचे समालोचन मराठीतून का ऐकता येत नाही? हे प्रश्न देखील आपल्याला पडायला हवेत. एकदा हे प्रश्न पडू लागले की, त्या अनुषंगाने पाठपुरावा सुरू होईल, आणि मग आपल्या अभिव्यक्तीची भाषिक घुसमट न होता आपल्याला खऱ्या अर्थाने मानसिक स्वातंत्र्य मिळेल, अखेर मानसिक स्वातंत्र्य हेच खरे संपूर्ण स्वातंत्र्य आहे!