सामाजिक

मराठी चित्रपट सोहळा

मराठी चित्रपटांचा दर्जा हा आजकाल सुधारु लागला आहे, यात काही शंका नाही. तांत्रिकदृष्ट्या उत्तोमोत्तम अशा कलाकृती आता सादर होऊ लागल्या आहेत. ‘मराठी लोकच मराठी चित्रपट पहायला जात नाहीत’, असे नेहमीचे रडगाणे आजकाल ऐकू येत नाही. स्वतःच्या अकार्यक्षमतेचे खापर हे सामान्य मराठी लोकांवर फोडून पूर्वी कलाकार निमानिराळे होऊ पहात असत. आता त्यांच्या खिशात थोडे पैसे खुळखुळू लागताच हा प्रघात बंद झाला. आजही काही फार चांगले कलाकार मराठी चित्रपटसृष्टीत वावरत आहेत, असं म्हणता येणार नाही. अभिनेते तर दिसायला चांगले नाहीतच, पण त्यांना धड अभिनयही येत नाही. पूर्वी सामान्य मराठी लोकांवर आपल्या अपयशाचे खापर फोडणार्‍या या लोकांना आज उलट त्याच सामान्य मराठी लोकांनी तारलं आहे. पण मराठी चित्रपटसृष्टीत अजय – अतुल सारखे काही अत्यंत गुणी लोकही आहेत. अशा लोकांमुळेच आज त्या क्षेत्रातील सर्वांना सोनियाचे दिवस दिसत आहेत.

आत्ताच मी ‘लोकमान्य – एक युगपुरुष’ या चित्रपटाचा ट्रेलर पुन्हा एकदा युट्यूबवर पाहिला. मराठी चित्रपटांच्या ट्रेलरमध्ये आजकाल कमालीची सुधारणा झालेली दिसून येते. हिंदी – इंग्रजी चित्रपटांमधील सफाईदारपणा आता मराठीमध्ये देखील येऊ लागला आहे. माझ्या मते मागील वर्षी ‘लई भारी’ या चित्रपटापासून अशा जबरदस्त ट्रेलरची सुरुवात झाली. ‘लोकमान्य – एक युगपुरुष’ या चित्रपटाच्या ट्रेलरने आता एक पाऊल पुढे टाकले आहे. लोकमान्य टिळकांच्या विचारांशी मी तसा फारसा सहमत नाही, पण हा चित्रपट चांगला चालेल अशी मला अपेक्षा आहे. चांगल्या मराठी चित्रपटांचे पुढे हिंदी, इंग्रजीत भाषांतर करुन त्यांनी अधिक व्यवसाय करावा असं मला वाटतं. मराठी मातीशी असलेलं आपलं नातं घट्ट राखून मराठी चित्रपटसृष्टिने जागतिक क्षितिजाला गवसणी घालावी यासाठी माझ्या शुभेच्छा आहेत.

परवा झी टॉकिजवर ‘मिफ्टा’ सोहळा रंगला!? होता. स्वतःच स्वतचं कौतुक करायचं आणि स्वतःच स्वतःला बक्षिसे द्यायची असे त्याचे स्वरुप होते. दरम्यानच्या काळात अत्यंत दर्जाहीन लेखकांनी लिहिलेले फुटकळ विनोद हे अपरिपक्व कलाकार सादर करत होते. स्वतःच्याच विश्वात रममान झालेले हे कलाकार स्वतःच स्वतःवर खूष दिसत होते. समोर बसलेल्या इतर सहाकारी कलाकारांनाही हसूनहसून पुरेवाट झाल्याचा अभिनय करावा लागत होता. यांना ‘प्रेक्षक’ नावाचा एक बिचारा प्राणी टि.व्ही. समोर बसला असल्याची जाणिवही राहिली नसावी. विचारपरिवर्तक, सुंदर अशा मराठी कलाकृतींची अत्यंत बालिशपणे थट्टा करण्यात आली, ते काही शोभणारे नव्हते. आम्ही मराठी कलाकार जगात कसे सर्वोत्तम आहोत? याचा वृथा अभिमानही बाळगण्यात आला. अर्थात हा त्यांचा आत्ममग्न सन्मान सोहळा पूर्णतः पाहणे हे काही माझ्याच्याने झेपले नाही. झी मराठीने कमीतकमी सोहळ्यांच्या निमित्ताने तरी ई टिव्ही मराठीकडून काही विनोदी लेखक व कलाकार उसने घ्यायला सुरुवात करायला हवी. मला वाटतं, आपण जी कलाकृती सादर करणार आहोत ती सर्वांगसुंदर व परिपूर्ण कशी करता येईल? याचा मराठी कलाकारांनी सतत विचार करायला हवा.