व्यक्तिगत

मनःस्तापाची शिकवण

गोष्ट तशी फार मोठी नाहीये. आमच्या जुन्या वाय-फायची रेंज घरात सर्वत्र पोहचत नाही. तेंव्हा नेहमीप्रमाणे घेऊयात.. घेऊयात करत तीन-चार दिवसांपूर्वी एक नवीन, चांगला वाय-फाय राऊटर ऑनलाईन खरेदी केला. काल तो मला मिळाला. म्हटलं.. रेंजचा प्रश्न तर सुटला! पण काल दिवसभर लाईट नव्हती, तेंव्हा संध्याकाळ झाल्याशिवाय मला त्या नवीन राऊटची जोडणी करणे शक्य नव्हते. आता नवीन वस्तूंची लहानपणी वाटायची तितकी उत्सुकता वाटत नसल्याने संध्याकाळपर्यंत वाट पाहणे अवघड गेले नाही. संध्याकाळी लाईट आली. मी राऊटर जोडायचा प्रयत्न करु लागलो. पण सुमारे तास-दीड तास खटपट केल्यानंतर मला समजले की, राऊटरचे दोन प्रकार असतात! ..आणि मी बरोब्बर गरज नसलेला दुसरा प्रकार खरेदी केला होता.. झालं..! सगळ्या उत्साहावर पाणी पडलं.. आणि मनःस्तापास सुरुवात झाली.

टेलिफोनच्या वायरमधून मिळणार्‍या इंटरनेटसाठीचे मोडेम युक्त राऊटर मी खरेदी केले होते. पण आमच्यापर्यंत इंटरनेट हे केबलमधून पोहचत असल्याने मला केवळ राऊटरची गरज होती. मी स्वतः नेटवर्किंग किंवा इतर कोणत्याही क्षेत्रातील तज्ञ व्यक्ति नाही. तेंव्हा ‘ट्रायल अँड एरर’ पद्धतीनेच माझा सर्व क्षेत्रांत फेरफेटका सुरु असतो. जीवन तरी काय आपण ‘ट्रायल अँड एरर’ पद्धतीनेच जगतो! नाही का!? पण ही पद्धत अतिशय वेळखाऊ व किचकट असून अशाने कधीकधी गोष्टी दुरस्त होण्याऐवजी अधिकच बिघडू देखील शकतात. अंधारातून जसं काळजीपूर्वक चालावं लागतं, तसं ‘ट्रायल अँड एरर’ पद्धतीत सर्व गोष्टी अतिशय काळजीपूर्वक कराव्या लागतात.

मनःस्ताप झाला की चिडचिड सुरु होते. पण त्यातून काहीही सध्या न होता उलट आहे त्या गोष्टी देखील बिघडू लागतात, त्यामुळे अशावेळी शक्य तितकं शांत रहायला हवं. नवीन राऊटर चालत नसल्याने झालेल्या मनःस्तापचा माझ्या एकंदरीत वागणुकीवर परिणाम होणार नाही याची काळजी घेत मी शांतपणे जेवायला बसलो. पण माझे मन मला कसले स्वस्थ बसू देते? जेवण झालं की पुन्हा लगेच माझी खटपट सुरु झाली. दोन तास घालवल्यानंतरही काही यश आले नाही, तेंव्हा शेवटी ‘उद्या पाहू!’ म्हणत मी माझे प्रयत्न तात्पुरते सोडून दिले. त्यानंतर सकाळी उठल्या उठल्या आणखी दोन तास त्यात घालवले, तरी सरतेशेवटी काहीही साध्य झाले नाही. तेंव्हा मात्र ‘नुकसान’ घोषित करुन मी माझा प्रयत्नांचा गाशा गुंडाळला! मी माझ्यापरीने शक्य तितके प्रयत्न केले होते.

आता वरकरणी पाहिले असता माझे राऊटरचे पैसे आणि चार-पाच तासांचा वेळ हा अगदी निरर्थक वाया गेलेला दिसतो. पण अगदी तसंच काही म्हणता येणार नाही. या प्रक्रियेत नेटवर्किंग संदर्भातील माझ्या ज्ञानात बरीच भर पडली. ADSL, Modem, Router, NAT, DHCP, IP Address, RJ11, RJ45 Cabels, इत्यादी गोष्टी मला नव्याने अधिक चांगल्या समजल्या. यास मनःस्तापातून मिळालेली शिकवणच म्हणावं लागेल!

‘मी ते राऊटर खरंतर त्यावरील बॉक्ससाठी विकत घेतलं होतं. त्यापासून काहीतरी उपयोगाची वस्तू तयार करता यावी म्हणून!’, मी आईला गमतीने म्हणालो आणि नवीन राऊटरचे सामान गुंडाळून कपाटात टाकून दिले. त्याचं काय करायचं!? हे आत्ता सध्या मला माहित नसलं, तरी आज ना उद्या राऊटरचा अथवा सोबत आलेल्या केबल, अडाप्टर, इत्यादी सामानाचा काहीतरी उपयोग करुन घेता येईल अशी आशा व्यक्त करुन स्वतःचे समाधान करुन घेण्यास हरकत नाही.