सामाजिक

भेसळयुक्त अन्नपदार्थ

आजकाल बाजारात शेंगदाने विकण्यापूर्वी ते पाण्यात भिजवतात की कुजवतात? ते काही कळत नाही! त्यातील निम्याहून अधिक शेंगदाणे तर अगदी निकृष्ट प्रतिचे असतात. जी गोष्ट शेंगदाण्यांना लागू पडते, अगदी तिच गोष्ट बाजारातील इतर खाद्यपदार्थांनाही लागू पडते. पालेभाज्यांवर तर रसायने मारलेलीच असतात, पण त्या रस्त्याच्या कडेला विकत असताना त्यावर प्रदुषणाची जी फवारणी होत असते, त्याचा तर कोणी विचार देखील करत नाही! उन्हाळ्यामध्ये जेंव्हा आंबे बाजारात येतात, तेंव्हा त्यासोबत ते पिकवण्यासाठी हानीकारक पावडर कशी वापरली जाते? याच्या बातम्या देखील येतात. नेहमीची येतो उन्हाळा! बाकी काय!?

पूर्वीच्या काळी तरुण वयात पांढारा केस दिसणे ही अगदी नवलाईची व हास्यास्पद गोष्ट मानली जात असे. आज मात्र एकही पांढरा केस नसलेला तरुण हा दूर्मिळच मानावा लागेल! लहान वयापासूनच मुलांना चष्म्याची लागण होऊ लागली आहे आणि त्याचा नंबर वरचेवर वाढतच जातो! तरुण वयातच टक्कल पडणे हे देखील आता नाविण्याचे राहिलेले नाही. असं देखील म्हणता येत नाही की, लोकांना चांगलं खायला मिळत नाही. आजकाल मध्यमवर्गीय लोक हे खाऊन-पिऊन मस्त असतात. पण तरीदेखील सुखनैव कुटूंबांमध्ये अकाली वृद्धत्त्व दिसून येते, त्याचे प्रमुख कारण हे ‘प्रदुषण’ व ‘भेसळ’ हेच असायला हवे. याशिवाय बदलेली जीवशैलीचा देखील हा परिपाक असू शकतो. तरुण मुलं नोकरी व शिक्षणासाठी बाहेर गावी रहायला जातात.. आता मला सांगा? ‘मेस’ मधलं जेवन हे काय जेवन असतं का?

मला तर वाटतं, ज्यांची गावाकडे शेती आहे, अशा लोकांनी गहू, ज्वारी, कांदे, शेंगदाणे अशा गोष्टी वर्षातून एकदा-दोनदा घरात भरल्या पाहिजेत. जे लोक शेती करत नाही, त्यांनी ओळखीच्या लोकांकडून अथवा आसपासच्या गावकर्‍यांकडून अन्नधान्य घरात भरले पाहिजे. किराणा मालाच्या दुकानातून माल भरण्यात काही अर्थ उरलेला नाही. अन्नधान्याची भेसळ करणारे लोक हे किती बेपर्वा व तत्त्वविहिन असतील! याची कल्पनाच केलेली बरी! समाजास अन्नपदार्थ पुरवणार्‍या लोकांस नैतिक जबाबदारीची थोडीतरी जाणिव असायला हवी. मोठ्या माणसांचा विचार राहू द्या, पण कमीतकमी निरागस अशा लहान मुलांकडे पाहून तरी भेसळ करणार्‍यांच्या पाषण हृदयास पाझर कसा फुटत नसेल? ही एक आश्चर्याची गोष्ट आहे! पैशांसाठी माणूस इतका कसा स्वार्थी होऊ शकतो? ते काही कळत नाही. अशावेळी कुठे जातात आपले महान भारतीय संस्कार?

आमच्या आधीच्या पिढीने त्यांच्या आयुष्याच्या पूर्वार्धात भेसळयुक्त अन्न खाल्लेले नाही. (या ठिकाणी जुन्या पिढीतील लोकांनी ‘काय तो काळ होता!’ म्हणत काही क्षण भुतकाळात रमायला हरकत नाही!) पण त्यांच्या आयुष्याचा उत्तरार्ध आणि आमच्या आयुष्याचा पूर्वार्ध हा तर भेसळयुक्त अन्न खाण्यातच निघून जात आहे. आता पुढील पिढी देखील असेच भेसळयुक्त पदार्थ खाऊनच मोठी होईल. त्यानंतर मात्र अन्नपदार्थांतील भेसळ हळूहळू कमी होऊ लागेल. लोक अधिक सुशिक्षित, तत्त्वाधिष्टित व प्रामाणिक बनतील. पण यात आपल्याला एक गोष्ट लक्षात आली का? आमच्या पिढीचं सबंध आयुष्य तर भेसळ व प्रदुषणयुक्त अन्न खाण्यातच जाणार ना!