सामाजिक

भांडणात निरर्थक वाया जाणारी उर्जा

‘शहाण्याने कधी कोर्टाची पायरी चढू नये’ असे म्हणतात. भांडण छोटे असो वा मोठे.. भांडणात आपली उर्जा निरर्थक वाया जाते. भांडणामुळे माणसास शारिरीक व मानसिक त्रास तर होतोच, पण त्यास आर्थिक तोट्यासही सामोरे जावे लागते. जे लोक ध्यान करतात त्यांस भांडणांची कारणे ही अगदी क्षुल्लक व तुच्छ वाटू शकतात. पण जो आवेशाने, तावातावाने भांडत असतो, त्यास मात्र ती त्याक्षणी जगातील सर्वांत महत्त्वाची गोष्ट असते.

योगायोग पहा! मी वरील ओळी लिहित असताना सर्वत्र अगदी शांतता होती, पण आत्ता इतक्यातच शेजारी एक भांडण सुरु झाले व त्याचा आवाज माझ्या कानावर या क्षणी पडत आहे. त्यातला एकजण केवळ एकच तुणतुणे वाजवत आहे, ‘तुमचा काय संबंध!?’. तर ज्यास वाटले की, त्याचा काहीतरी संबंध असावा, तो दुसरेच तुणतुणे वाजवत म्हणत आहे, ‘एऽऽ चलऽऽ हलऽऽ’. आवाज येणे बंद झाले.. भांडण कदाचित निवळले असावे.

या जगातील सर्व देश हे परस्पर सामंज्यस्याने व गुण्यागोविंदाने एकत्र रहात असते, तर मानवाने आत्तापर्यंत किती प्रगती केली असती! पण राग, द्वेश, स्वार्थ या भावना अजूनही मानवाच्या मनातून हद्दपार झालेल्या नाहीत, त्यामुळेच त्यास सरहद्दीवर आपले सहकारी तैनात करावे लागतात. खर्व, निखर्व हे आकडे देखील तोकडे वाटावेत इतकी संपत्ती ही जगभरात केवळ भांडण करण्यासाठी वाया घालवली जाते.

हीच संपत्ती जर एकंदरीत मानव जातीच्या उत्थानासाठी वापरली गेली असती, तर आत्तापर्यंत सर्वांस परमानंदी टाळी लागली असती. पण एका हाताने टाळी वाजत नाही! तेंव्हा पुढाकार घेणार कोण!? हा प्रश्न कायम अनुत्तरीत राहतो! समोरील व्यक्तिचा आवेश संपलेला नसेल, तर आपण तरी आपले शस्त्र कसे म्यान करणार? तेंव्हा कोणताही देश आपले शस्त्र भांडार कमी करण्यास तयार नाही. याउलट प्रत्येकजण दरवर्षी त्यात भरच घालत आहे.

पृथ्वी कमी पडली होती म्हणून की काय? आता लवकरच चंद्रावर देखील भांडणे सुरु होतील. त्याची नांदी देखील झाली आहे! अमेरिकेच्या खाजगी कंपन्या ‘नासा’च्या सहकार्याने चंद्रावरील मोक्याच्या जागी आपले बस्तान बसवण्याच्या तयारीत आहेत. पण इकडे चीनने देखील तीच तयारी चालवलेली आहे! तेंव्हा भविष्यात ‘चंद्र कोणाचा?’ हा वाद उद्भवनं अपरिहार्य आहे, असे दिसते.

पण परिस्थिती तितकीही निराशाजनक नाही. जुन्या लोकांचे विचार पहा! त्यापेक्षा आजच्या पिढीचे विचार हे नक्कीच आशादायक चित्र निर्माण करतात. मात्र अतिसंहारक शस्त्रास्त्रे व विज्ञानाने बदलत चाललेली ‘मानवी संकल्पना’ यामुळे  नवीन पिढीवरील जबाबदारी देखील खूपच वाढली आहे. त्यामुळे भविष्यात त्यांना सामंजस्य व सहकार्याची परिसिमा गाठावी लागणार आहे. यातूनच पुढील शतकात ‘युरोपियन युनियन’ प्रमाणे जागतिक एकत्रिकरणाची एक चळवळ उभी राहण्याची शक्यता मला दिसून येते.