व्यक्तिगत

ब्लॉगची सहामाही वाटचाल

या ब्लॉगला कोणी नियमित वाचक असेल असे मला वाटण्याचे काही कारण नाही. कारण या ब्लॉगच्या फीडचा पत्ता बदलल्यानंतर एकानेही या ब्लॉगला सब्स्क्राईब केल्याचे माझ्या निदर्शनास आलेले नाही, आणि गेल्या सहा महिन्यात या ब्लॉगवर एखादी प्रतिक्रियादेखील आलेली नाही. तरी या ब्लॉगला रोज कोणी ना कोणी भेट देत राहतं, हे मात्र नक्की! ‘मराठी ब्लॉग विश्व’ आणि ‘मराठी ब्लॉगर्स’ या दोन्ही संकेतस्थळांवर विनंती करुनही या ब्लॉगची नोंद केली गेली नाही, हे देखील वाचक कमी असण्याचे एक प्रमुख कारण आहे. याशिवाय मी स्वतः प्रकाशित करत असलेल्या लेखांची वारंवारता फारशी नाही, त्यामुळे देखील नियमित असे वाचक या ब्लॉगला लाभले नसावेत.

हा ब्लॉग वाचून आपल्यास अंदाज येत असेल, तितका मी काही वाईट ‘लेखक’ नाही. अनेकदा ‘काय लिहावं?’ आणि ‘काय लिहू नये?’ या प्रश्नांमध्ये ब्लॉगची वाटचाल अडखळते. मध्यंतरी बराच काळ ब्लॉग लेखन बंद करण्यामागे तेच एक महत्त्वाचे कारण होते. व्यक्तिगत असं काही लिहिणं हे नेहमीच सोपं असतं आणि ते वाचकांच्या पसंतीसही उतरतं. पण आपलं व्यक्तिगत जीवन ज्यांस आपण ओळखतही नाही अशा त्रयस्तांसमोर कारण नसताना उघड करणं हे कितपत योग्य आहे? आणि विशेषतः होतं असं की, आपण आपल्या पडत्या काळात आपल्या कलेचा आसरा घेतो. तेंव्हा मग ब्लॉगवर एक नकारात्मक छाया दाटून येऊ लागते.

पण जन्मजात असलेली लेखानाची उर्मी ही काही संपत नाही. तेंव्हा सरतेशेवटी मी मधला मार्ग निवडला व समाजिक, राजकीय असे जे काही ज्वलंत प्रश्न असतील त्यासंदर्भातील माझा दृष्टीकोन मी या ब्लॉगच्या माध्यमातून मांडण्यास सुरुवात केली. अर्थात अधूनमधून मी काही व्यक्तिगत लेखही प्रकाशित करतो, पण ते काही फारसे गंभीर नसतात. यावर्षी मी ब्लॉग लेखनास पुनः सुरुवात केली, तेंव्हा मी सलग सहा महिने अधूनमधून का असेना, तरी नियमितपणे लेख प्रकाशित करु शकेन अशी कल्पना केली नव्हती. पण बघता बघता सहा महिने झाले! व माझ्या दोन लेखांमध्ये दोन आठवड्यांहून अधिकचे असे अंतर या सहा महिन्यांत काही पडलेले नाही.

हा ब्लॉग ‘Public’ आहे, तेंव्हा तो कोणीतरी वाचत असणार यादृष्टीकोणातूनच त्याची जडणघडण झालेली आहे. त्यामुळे वाचकांचे महत्त्व नाकारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही! पण या ब्लॉगला किती वाचक आहेत? यावर काही माझे लेखन ठरत नाही. तेंव्हा हा ब्लॉग अगदी कधीच कोणीही वाचला नाही, तरी मी तो लिहित राहणार हे निश्चित! पण त्याचवेळी ही काही दैनंदिनी नाही.. तेंव्हा मी जे लिहित आहे, ते कधीतरी, कुठेतरी, कोणीतरी, वाचणार आहे, याच दृष्टीने लिहित आहे. यापुढील काळात मी लेखांची वारंवारता वाढवण्याचा प्रयत्न करेन! पण मी निश्चितपणे असं काहीच सांगू शकत नाही. करायचं खूप काही असतं! पण होत काहीच नाही, असा हा प्रकार आहे!

ट्विटर देखील ब्लॉगचेच एक छोटे स्वरुप आहे. तिथे मी बर्‍यापैकी सक्रिय असतो. आपण ट्विटरवर असाल, तर @mindinamoment या पत्त्यावर मला फॉलो करु शकाल.