व्यक्तिगत

ब्लॉगची तांत्रिक बाजू

काल या वेळेपर्यंत, म्हणजेच १० वाजेपर्यंत माझे सर्व लिखान काम संपले होते व मी निवांत ‘पॉडकास्ट’ ऐकत पडलो होतो. आज मात्र १२ वाजेपर्यंत माझे काम काही संपेल असे वाटत नाही. पण काहीतरी उद्दीष्ट निश्चित केल्याशिवाय कामे देखील पूर्ण होत नाहीत. आजच्या विषयासंदर्भात काही लिहिण्यापूर्वी ज्यांनी माझा कालचा ब्लॉग वाचला असेल (आणि तो कोणीही वाचलेला नसेल, हे मला माहित आहे), त्यांस सर्वप्रथम नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! पण आज काही मी नववर्षाच्या प्रेरणेने लिहित आहे, असे वाटत नाही. उगाच आपली सवय लागली आहे म्हणून काहीतरी विषय उकरुन काढून मी कीपॅडच्या बटणांवर माझी बोटे आदळत आहे.

ब्लॉग म्हणजे काय? तर ब्लॉग हे व्यक्त होण्याचे एक माध्यम आहे. आता ब्लॉगचा वापर करायचा असेल, तर हे माध्यम आत्मसात करायलाच हवे! तसं ते फार अवघड आहे, अशातला भाग नाही! blogger.com अथवा wordpress.com वर जाऊन आपल्याला आपला ब्लॉग हा अगदी मोफत तयार करता येतो. आणि त्यानंतर तेथील New Post या पर्यायावर जाऊन आपल्या मनात येईल ते खरडायचे व शेवटी Publish वर क्लिक करायचे! की झालाच आपला ब्लॉग तयार! आता काय? फेसबुकवर मित्रांना सांगायचे, व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये शेअर करायचे आणि ब्लॉगर बनायचे! ही गोष्ट तशी काही फार अवघड नाही!

पण ब्लॉगिंगचा वापर हा अगदी ‘प्रोफेशनल’ दृष्टिकोनातून करायचा असेल, तर मात्र केवळ एव्हढंच करुन भागत नाही. ब्लॉगिंगच्या अनुषंगाने इंटरनेटवरील अनेक नवीन संकल्पना शिकाव्या लागतात. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे सतत काहीतरी नवं शिकण्याची तयारी ठेवावी लागते. त्यासाठी तासंतास वेळ द्यावा लागतो. अशावेळी आपणास या माध्यमाची आवड असायला हवी. मला या माध्यमाची अतिशय आवड आहे. त्यामुळे यासंदर्भातील माझा एक नेहमीचा अनुभव सांगतो. मी जर एखादा लेख लिहित असेन अथवा ब्लॉग संदर्भातील तांत्रिक समस्या सोडवत असेन, तर मला तासंतास गेलेले अजिबात समजत नाही. लेख लिहित असताना १ तास झाला तरीदेखील मला आपण केवळ १० मिनिटांपासूनच लिहित आहोत अशी जाणिव होते.

आज 2know.in चा पाचवा वाढदिवस आहे! बघता बघता पाच वर्षं कशी निघून गेली!? ते कळाले देखील नाही. 2know.in वर मी हवं तितका कार्यरत राहू शकलो नाही, याची मला खंत आहे. पण यापुढे त्या ब्लॉगवर देखील नियमित लेख लिहिण्याचा माझा प्रयत्न असेल. आजपासून 2know.in चे व्यासपीठ (forum) मी वाचकांसाठी खुले केले आहे. त्यासंदर्भातील तांत्रिक समस्या सोडवण्यात आज माझे साधारण ४ ते ५ तास गेले. त्यामुळेच तर आत्ताच्या या ब्लॉगचा विषय सुचला! चांगला ब्लॉगर बनायचे असेल, तर चांगलं लिहाणं हे अनन्यसाधारण महत्त्वाचं आहे, पण त्यासोबतच आपला ब्लॉगदेखील तांत्रिकदृष्ट्या उत्कृष्ट असायला हवा!