Uncategorized

बिंडोक बापाची लक्षणे

दुचाकीवर समोर बसून बायकोवर चरफडणारा नवरा, त्याच्या समोर पेट्रोलच्या टाकीवर धास्तीने दडपून बसलेला ४-५ वर्षांचा लहान मुलगा, एका हाताने आपल्या कडेवरील बाळाला सावरत दुसर्‍या हातात सामानाच्या पिशव्या घेऊन कोमेजून बसलेली बायको! पूर्वी बाहेर रस्त्यावर सर्रास दिसणारे हे दृष्य! आजकाल असं दृष्य फारसं दिसत नाही.. पण कधी दिसलंच.. तर अजूनही धास्ती वाटते!

कुठला तो सोम्या-गोम्या रांकेला लागत नाही, म्हणून त्याचा बाप त्याचं लग्न लावून टाकतो. लग्न होताच ह्या सोम्या-गोम्याचा थेट पती ‘परमेश्वर’ होतो. लहान मुलं तर काय!? पाया पडण्यासाठीच जन्मलेली असतात! पण घरातल्या या देवाला बाहेर कोणी कुत्रं विचारत नाही, म्हणून मग ह्याचा प्रकोप दुबळ्या बायको-पोरांवर होतो!

सगळेच बाप काही असे नसतात! काही लोकं ‘बाप माणूस’ असतात! पण ‘बिंडोक बाप’ प्रकारात मोडणार्‍या लोकांची काही वैशिष्टे सांगतो.

 • घरात रात्री एकत्र जेवत असताना हे लोक आपल्या मुलाला काहीतरी कुसपट काढून धारेवर धरतात. त्याच्या पोटात सुखासुखी घास गेला नाही पाहिजे! हे यांचं कर्तव्य! ‘तू माझ्या जीवावर फुकट जगत आहेस’, हे आपल्या मुलाला दाखवून द्यायची कोणतीही संधी ते आयुष्यभर सोडत नाहीत.
 • हे लोक घरी आल्यानंतर घर का एव्हढं घाण पडलं आहे? म्हणून बायकोला वेठीस धरतात. घरी आल्यानंतर जर पोरं पुस्तकं हातात धरुन कोपर्‍यात निमुटपणे बसलेली दिसली नाहीत, तर यांच्या तळपायाची आग मस्तकात जाते.
 • सणादिवशी हे लोक सगळ्या जगाला शुभेच्छा देतात, पण त्या दिवशी आपल्या घरातील कोणीही सुखी दिसणार नाही याची ते आपल्या परीने पुरेपुर काळजी घेतात. उलट सणाच्या निमित्ताने ते खास रुद्रावतार धारण करतात.
 • अशाप्रकारच्या माणसांना आयुष्यभर लुबाडणारा एक भाऊ असतो.
 • सरतेशेवटी काही करुन ‘कफल्लक’ व्हायचं! ही यांच्या व्यवहाराची रीत असते.
 • आपली मुले किती नालायक निघाली, हे ते तिर्‍हाईत लोकांना साळसुदपणाचा आव आणून सांगत असतात.
 • आपला मुलगा आपला मित्र नसून कोणीतरी प्रतिस्पर्धी शत्रू असल्यागत यांची आपल्या मुलाशी वागणूक असते.
 • आयुष्यभर मुलाचा आत्मविश्वास पायाखाली तुडवल्यानंतर त्याच्या जीवावर पुढे फुशारक्या मारता याव्यात म्हणून आपल्या मुलाने ‘कलेक्टर’ व्हावं अशी या लोकांची ईच्छा असते.
 • जन्मभर आपल्या पोरांना तळहाताच्या फोडासारखं जपूनही म्हातरपणी हे काय दिवस पहायचे आले! म्हणून ते काहीतरी कारण उकरुन काढून स्वखुशीने ‘बागबान’  होतात.
 • आपल्या बायकोचा आणि पोरांचा केलेला छळ यांच्या खिजगणतीतही नसतो. उलट आपण स्वतः खूप भावूक असल्याची या लोकांची मनोमन ठाम समजूत असते.
 • कोणताही फॉर्म भरायचा झाल्यास सबंध आयुष्य दरवेळी ते आपल्या बायको-पोरांस त्यांची जन्मतारीख विचारतात.

अजूनही अशी अनेक लक्षणे आहेत. पुढे कधी लक्षात आल्यास मी त्या लक्षणांची या यादीत भर घालेन.