खगोलशास्त्र

बाह्यचंद्र सापडल्याची शक्यता

या अथांग विश्वामध्ये आपल्या सूर्यमालेप्रमाणे इतरही अनेक सूर्यमाला आहेत. या सूर्यमालेतील ग्रहांना ‘बाह्यग्रह’ (Exoplanet), तर अशा बाह्यग्रहांभोवती फिरणाऱ्या चंद्रांना ‘बाह्यचंद्र’ (Exomoon) असे म्हटले जाते. बाह्यग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो, शिवाय ते आपल्यापासून अनेकानेक प्रकाशवर्षं दूर असतात, त्यामुळे त्यांचा शोध घेणे सहजासहजी शक्य होत नाही. दुसरीकडे बाह्यचंद्रांचा विचार केला, तर ते बाह्यग्रहांपेक्षा आकाराने खूप छोटे असतात, परिणामी त्यांना शोधून काढणे तर अगदी दुरापास्त होऊन बसते. तरी देखील संशोधकांना पहिल्यांदाच एका बाह्यचंद्राचा ठावठिकाणा लागला असल्याचे सांगण्यात येत आहे. आपल्या सूर्यमालेहून दुप्पट जुन्या अशा एका सूर्यमालेतील हा चंद्र आजवर पाहिलेल्या इतर कोणत्याही चंद्राच्या तुलनेत आकाराने खूप मोठा आहे. या चंद्राचा आकार जवळपास आपल्या नेपच्यून ग्रहाएव्हढा असल्याचे समजते.

एखादा बाह्यग्रह जेंव्हा आपल्यादृष्टीने त्याच्या सुर्यासमोरून जातो, तेंव्हा त्या सूर्याच्या तेजस्वीतेत होणारा अतिसूक्ष्म बदल हेरून त्याभोवतालच्या बाह्यग्रहाच्या अस्तित्त्वाचा अंदाज काढण्यात येतो. अशाप्रकारे सुर्यामालेबाहेरील पिंडांचा शोध घेणारी केपलर दुरदर्शिका लवकरच सेवानिवृत्त होत असली, तरी खास याच कामाकरिता अवकाशात सोडण्यात आलेली ‘ट्रान्झिटिंग एक्झोप्लॅनेट सर्व्हे सॅटेलाईट’ (TESS – टेस) ही अत्याधुनिक दुरदर्शिका नुकतीच आपल्या सेवेत रुजू झाली आहे. त्यामुळे भविष्यात नवीन बाह्यग्रहांसोबतच अधिकाधिक बाह्यचंद्रांचा देखील शोध लागेल याबाबत शंका नाही.