अर्थकारण

बाजारमूल्यानुसार कंपन्यांची वर्गवारी आणि गुंतवणूक

अॅपल कंपनीने १ ट्रिलियन डॉलरचे विक्रमी बाजारमूल्य गाठल्याची बातमी मध्यंतरी सर्वत्र प्रसिद्ध झाली होती. अॅपल पाठोपाठ अमेझॉन, मायक्रोसॉफ्ट, अल्फाबेट (गुगल) या कंपन्या देखील १ ट्रिलियन डॉलरच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत. या सर्व कंपन्यांच्या बाजारमूल्यावरून आपणाला त्यांच्या भव्यतेची कल्पना आली असेल. या आघाडीच्या कंपन्यांचे जसे बाजारमूल्य आहे, तसेच शेअर बाजारातील प्रत्येक कंपनीचे आपले स्वतःचे एक बाजारमूल्य असते. त्यावरून त्या कंपनीचा विस्तार किंवा आकार आपल्या लक्षात येऊ शकतो.

शेअर बाजारातील कंपन्यांच्या बाजारमूल्यानुसार त्यांची लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप अशा तीन मुख्य प्रकारांत वर्गवारी केली जाते. लार्ज कॅप कंपन्या स्थिरस्थावर झालेल्या असतात, त्यांचा विस्तार वाढलेला असतो, त्यामुळे अशा कंपन्यांमध्ये केलेली गुंतवणूक ही तुलनेने सुरक्षित मानली जाते. मिड कॅप प्रकारात मोडणाऱ्या कंपन्या या मध्यम आकाराच्या असतात, त्या बऱ्यापैकी वाढलेल्या असल्या तरी अजून पुरत्या स्थिरावलेल्या नसतात. अशा कंपन्यांमध्ये झालेल्या गुंतवणुकीची दोलायमानता मध्यमप्रतीची असते. स्मॉल कॅप कंपन्या लहान आकाराच्या असतात. त्यांची वाढ होण्यास आणखी पुष्कळ वाव असतो, सोबतच त्यांना पुरेसे स्थैर्य प्राप्त करायचे असते, त्यामुळे स्मॉल कॅप कंपन्यांत केलेल्या गुंतवणुकीची दोलायमानता अधिक असते.

पण एखादी कंपनी लार्ज कॅप, मिड कॅप किंवा स्मॉल कॅप यांपैकी नक्की कोणत्या प्रकारात मोडते हे कसे ठरवणार? त्यासाठी भांडवली बाजारावर नियंत्रण ठेवणाऱ्या ‘सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया’ म्हणजेच ‘सेबी’ या सरकारी संस्थेने काही मानके निश्चित केली आहेत. त्याप्रमाणे बाजारमूल्यानुसार ज्या पहिल्या १०० कंपन्या आहेत त्या लार्ज कॅप ठरतात. १०१ ते २५० क्रमांकाच्या कंपन्या मिड कॅप प्रकारात मोडतात. तर २५१ क्रमांकापासून पुढील कंपन्यांची गणना स्मॉल कॅपमध्ये केली जाते. अशारितीने बाजारमूल्यानुसार कंपन्यांची सुस्पष्ट विभागणी करण्यात आल्याने गुंतवणूकदाराला गुंतवणुकीशी निगडित निर्णय घेणे अधिक सोपे जाते.

म्युच्युअल फंड बाबत बोलायचे झाले, तर वर नमूद केलेल्या विभागांना नजरेसमोर ठेवून निरनिराळ्या म्युच्युअल फंड योजना आखण्यात आलेल्या आहेत. मोठ्या कंपन्यांमधील गुंतवणूक तुलनेने स्थिर असली, तरी त्यांमध्ये आधीपासूनच पुष्कळ गुंतवणूक झालेली असते. परिणामी अशा कंपन्यांमधून मिळणारा भविष्यकालीन परतावा हा मर्यादित असतो. दुसरीकडे मिड आणि स्मॉल कॅप कंपन्या काहीशा अस्थिर असल्या, तरी त्यांचा भविष्यातील परतावा देखील अधिक असू शकतो. गुंतवणूकदाराचे वय, उत्पन्न, त्याची जोखीम स्वीकारण्याची क्षमता तसेच बाजारातील तत्कालीन परिस्थिती अशा साऱ्या गोष्टी लक्षात घेऊन त्याकरिता योग्य अशा म्युच्युअल फंड योजनेची निवड केली जाते.