आयुष्य

प्रोत्साहन आणि प्रेरणा

प्रत्येक माणसाला आपले स्वतःचे एक भावविश्व आहे. प्रत्येकाला आपल्या आयुष्यात कुठेतरी व्यक्त व्हायचे आहे. पण प्रत्येकाच्या आयुष्याचे क्षितिज मात्र कमी-अधिक प्रमाणात विस्तारलेले आहे. ज्यांच्या आयुष्याचे क्षितिज कमी विस्तारलेले आहे, ते क्षितिजाच्या पलीकडील गोष्टी जाणून घेण्यास अगदी आतुर असतात. म्हणूनच ‘ज्यांचे क्षितिज अधिक विस्तारलेले आहे’ अशा उंचीवरील माणसांकडून ते या अनोळखी प्रदेशातील गोष्टी मोठ्या कुतूहलाने ऐकत असतात आणि या ऐकीव गोष्टींचा आपल्यापरीने मनातल्या मनात अर्थ लावत असतात. त्यातून त्यांना स्वतःलाही उंच भरारी घेण्याची प्रेरणा मिळत असते. पण असे असले, तरी उडण्याची कला मात्र त्यांना स्वतःलाच अवगत करावी लागते.

ते सुरुवातीला आपले पंख फडफडवतात, तेंव्हा त्या पंखांचा नुसताच जागेवर आवाज होतो, पालापाचोळा उडतो, त्यापलीकडे काही साध्य होत नाही. अशावेळी ‘तू देखील उडू शकतोस’ असा एक आपुलकीचा आत्मविश्वास कोणीतरी प्रत्यक्ष त्यांच्याजवळ येऊन त्यांस देण्याची आवश्यकता असते. एकदा हा आत्मविश्वास मिळाल्यानंतर ते स्वतःहून थोडेफार उडायला शिकतात, आणि त्यानंतर त्यांची नजर जमिनीवरून आकाशाकडे खिळते. इथे उंच उडणारी माणसे पाहून त्यांना स्वतःलाही वरचेवर अधिकाधिक उंच भरारी घेण्याची प्रेरणा मिळते, आणि त्यानुसार ते प्रयत्नांती नवनवीन उंची गाठू लागतात. अशाप्रकारे त्यांचे आयुष्यरूपी क्षितिज विस्तारू लागते. पूर्वी केवळ ऐकीव असलेल्या गोष्टी आता त्यांच्या दृष्टिपथास पडू लागतात. जमिनीवरून मिळणारे प्रोत्साहन आणि आकाशातून मिळणारी प्रेरणा मानवी आयुष्याला नवी उंची प्राप्त करून देते.

‘मराठी भाषेचे संवर्धन कसे करावे?’ याबाबत सध्या ‘संख्यात्मक’ आणि ‘दर्जात्मक’ असे दोन दृष्टिकोन दिसत आहेत. हे दोन्ही दृष्टिकोन आपापल्या पातळीवर योग्य आहेत. उंचीवरील माणसांकडून प्रेरणा घेऊन ज्यांनी नुकतेच व्यक्त होण्यास सुरुवात केलेली आहे, त्यांना पुढे जाण्यासाठी कोणाकडूनतरी प्रोत्साहनाची पहिली थाप हवी असते. त्यांना भलेही शुद्ध लिहिता येत नसेल, आपले मत व्यवस्थित मांडता येत नसेल, किंवा त्यांचे विचार कदाचित पूर्वग्रहदूषितही असू शकतात. पण त्यांना ‘आपल्या भाषेत व्यक्त व्हायचे आहे’ ही स्वतःमध्येच एक वेगळी आणि महत्त्वाची गोष्ट आहे. एकदा व्यक्त होण्यास सुरुवात केल्यानंतर त्यांना स्वतःमधील बलस्थाने आणि मर्यादा निरनिराळ्या उंचीवरील माणसांच्या तुलनेत जाणवू लागतात. अशाप्रकारे उत्तरोत्तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वास बहुविध पैलू पडू लागतात, आणि यातूनच आयुष्याची एक सुंदर कलाकृती घडू लागते. संख्यात्मकतेपासून सुरू झालेला प्रवास दर्जात्मकतेपर्यंत जाऊन पोहचतो, कारण उत्कर्ष आणि उत्क्रांती हा कोणत्याही जीवाचा नैसर्गिक गुणधर्म आहे. अशावेळी संख्यात्मकता माणसाला जमिनीवरून उडण्याचे प्रोत्साहन देते, तर दर्जात्मकता आकाशात उंच भरारी घेण्याची प्रेरणा देते.