सामाजिक

प्रामाणिक असहिष्णुता

जुन्या पिढीतील वैचारिकदृष्ट्या अडाणी बाप घराच्या चार भिंतीत आपलं शहाणपण मिरवायचा! तद्वत चार शब्द शिकून नशिबाने मोठे झालेले जुन्या काळातील काही मान्यवर आपल्या ‘तथाकथित’ वतृळात आपली महानता मिरवायचे! खाली मान घालून सारंकाही निमुटपणे ऐकणारी मुलं जशी चांगल्याप्रकारे शिकून मोठी झाली, तसे त्यांनी आपल्या अडाणी बापाच्या खोटारडेपणावर बोट ठेवण्यास सुरुवात केली! तेंव्हा सहाजिकच स्वयंमान्य मोठेपणास सरावलेल्या बापाला तो उद्धटपणा वाटू लागला! व आपली मुलं कशी वाया गेली, हे तो जगास ओरडून सांगू लागला! आज सर्वत्र ‘असहिष्णुता’ दिसणार्‍या तथाकथित मान्यवरांचे देखील असेच झाले आहे. इतके दिवस त्यांच्या दुटप्पी वागणुकीवर व खोटेपणावर बोट ठेवण्याइतपत समाज सुशिक्षित, सुरक्षित व धाडसी झाला नव्हता. त्यामुळे त्यांना त्यांची स्वयंमान्य महानता मोठ्या दिमाखात उपभोगता येत होती. पण आता पिढी बदलली आहे. दुसर्‍यास अक्कल शिकवण्याइतपत अक्कल या दुटप्पी लोकांत नाही, हे या पिढीस ज्ञात आहे. शिवाय सध्याचा समाज हा पूर्वीपेक्षा सुशिक्षित, सुरक्षित व धाडसी आहे. त्यामुळे या तथाकथित महान लोकांच्या खोटारडेपणावर बोट ठेवण्यास आजचा तरुण मागेपुढे पहात नाही. वैचारिकदृष्ट्या अडाणी बापाला जसा आपला प्रामाणिक मुलगा ‘उद्धट’ वाटतो, अगदी तसंच या तथाकथित महान मान्यवरांना हा प्रामाणिक समाज आता ‘असहिष्णू’ वाटू लागला आहे. म्हणूनच आपला देश आता ‘असहिष्णू’ झाल्याचे ते या जगाला अडाणी बापाप्रमाणे बोंबलून सांगत आहेत व पर्यायाने आपल्याच देशाची, कुटूंबाची व्यक्तिगत स्वार्थापोटी बदनामी करत आहेत.

मूळात भारताच्या या मातीत जन्माला आलेले सारे धर्म हे ‘सहिष्णु’ आहेत. त्यामुळे ‘असहिष्णुता’ ही भारताच्या रक्तातच नाही. आजचा सरासरी सुशिक्षित तरुण हा कोणत्याही कट्टरतावादी लोकांस मुळीच आपले समर्थन देत नाही. त्यास केवळ भारतातील तथाकथित मान्यवरांच्या दुटप्पी वागणुकीचा तिटकारा आलेला आहे. त्याला भारतात ‘खरी समानता’ हवी आहे. सारं काही समजत असूनही ‘आपल्याला त्यातलं काय कळतंय!?’ असं म्हणून अडाणी माणूस स्वतःची समजूत काढू शकतो. पण आपल्या उघड्या डोळ्यांनी मान्यवरांचा दुटप्पीपणा पाहणारा सुशिक्षित माणूस स्वतःची समजूत ती कशी काढणार? लहानपणी वर्तमानपत्रातील लेख वाचत असताना मला नेहमीच प्रश्न पडायचा की, आपल्यातूनच पुढे गेलेले हे आपले लोक स्वतःला आपल्यापासून वेगळं करुन आपल्याचसंदर्भात इतकं तुच्छतेनं का लिहित आहेत? वर्तमानपत्रात लिहिणारे सर्व लोक हे त्यावेळच्या माझ्या समजूतीप्रमाणे फार ‘विद्वान’ असत! तेंव्हा वाईट वाटत असूनही आपलंच कुठेतरी चुकत असावं, अशी मी स्वतःची मनोमन समजूत घालायचो. पण आता मात्र वर्तमानपत्रात लिहिणार्‍या त्या काही विद्वानांना मी सांगू इच्छितो की, जगापुढे आपली अक्कल पाजळण्यापूर्वी आपल्या महान दुटप्पी मेंदूत मूळात कितपत अक्कल शिल्लक आहे!? ते कृपया एकदा तपासून पहावे!

शरिरात एखाद-दुसरा जंतू सापडल्यास सबंध शरिर आजाराने जर्जर झाल्याचे मानावे का? असहिष्णुतेची बोंब ठोकणारे लोक हे असाच पराचा कावळा करत आहेत. समाजाला आता ‘खरी समानता’ आणि ‘खरा न्याय’ हवा आहे! समाजात तेढ निर्माण करुन स्वार्थाची पोळी भाजणारे राजकारण आता पुरे झाले! राजकीय पक्षाचे वैचारिक समर्थन हे मी बौधिक विकलांगतेचे लक्षण मानतो. त्यामुळे कोणत्याही विशष्ट राजकीय पक्षाचे कायमस्वरुपी समर्थक करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही! पण एखाद्या राजकीय पक्षाचे मुद्यानुसार तात्कालिक समर्थन करणे ही लोकशाहीची अपरिहार्यता आहे. राजकारण व राजकीय पक्ष हे आपल्या लोकशाही जीवनाचा भाग आहेत, तेंव्हा त्यांना सरसकट नालायक ठरवण्यात काही अर्थ नाही. आजचा सरासरी तरुण हा एखाद्या विशिष्ट राजकीय पक्षाचे अंधानुकरण करत नाही. कारण स्वतःचे निर्णय स्वतःच्या बुद्धिने घेण्याइतपत तो सक्षम होत आहे. स्वतंत्र वैचारिक वचक ठेवणारा हा तरुण वावगे वागू देणार नाही, हे सर्व राजकीय पक्षांनाही आता कळू लागले आहे. तेंव्हा खर्‍या ‘असहिष्णुतेची’ काळजी नसावी! लोकशाहीच्या प्रगल्भ वाटचालीत आता विशिष्ट विचारसरणीला नव्हे, तर अनुभूतीप्राप्त शाश्वत मूल्यांना महत्त्व प्राप्त होऊ लागले आहे. त्यामुळे आज काही लोकांना जी तथाकथित ‘असहिष्णुता’ दिसत आहे, ती केवळ या प्रगल्भ ‘प्रामाणिक’ वाटचालीचा भाग आहे.