व्यक्तिगत

प्राणिसंग्रहालय

आज आज्जी-आजोबा आपल्या नातीला घेऊन प्राणिसंग्रहालयात गेले होते. त्यानिमित्त माझ्या स्वतःच्या अशा प्राणिसंग्रहालयासंदर्भातील (कित्ती मोठा शब्द!) काही आठवणी ताज्या झाल्या. मी लहान असताना आमचं जिथे घर होतं, तेथून अगदी जवळच प्राणिसंग्रहालय होतं. त्यामुळे वाघ-सिंहासहीत इतर विविध प्राण्यांचे आवाज हे आमच्या सवयीचेच होते. खासकरुन रोज सकाळी व संध्याकाळी त्यांचे आवाज हे कानावर पडत असत. त्याकाळी किंवा त्यास्थळी प्राण्यांच्या दृष्टीने फारसा विचार केला जात नसावा, कारण ‘आमचं’ प्राणिसंग्रहालय हे काही विस्तृत क्षेत्रफळात पसरलेलं नव्हतं. वाघ, सिंह, मगर, हत्ती, हरीण, इत्यादी प्राणी आणि निरनिराळे पक्षी यांचा पिंजरा हा फारसा मोठा नव्हता. त्यामुळे हे पशू-पक्षी अगदी जवळून पहाता येत असत. टि.व्ही. वर पाहून प्राण्यांच्या खर्‍या आकारमानाचा आंदाज येत नाही. लहानपणी कुत्री-मांजरं पहता पहता मी जेंव्हा सर्वप्रथम वाघास आणि सिंहास जवळून पाहिलं, तेंव्हा त्यांचा तो अजस्त्र आकार मला अनपेक्षित होता. तो क्षण आजही माझ्या लक्षात आहे, म्हणजे तो अनुभव नक्किच माझ्या मनावर कोरला गेला असणार.

त्यानंतर अनेक वर्षांनी मित्रासोबत एका प्राणिसंग्रहालयात जाण्याचा योग आला. त्यादिवशी ‘महाराष्ट्र दिन’ होता आणि त्यामुळेच की काय परप्रांतिय मजूरांची जणू जत्राच त्या प्राणिसंग्रहायलात भरली होती. त्यांच्या चेहर्‍यावरुन त्यांचे अज्ञान स्पष्ट ‘झळकत’ होते. आसपास चाललेल्या संभाषणांवरुन मी इतकं नक्की सांगू शकतो की, त्यादिवशी तिथे मराठी माणसे ही अल्पसंख्यक होती, आणि मी मुंबईबाबत बोलत नाहीये. जणू काही मीच परराज्यात फिरायला गेलो आहे की काय!? असा भास होत होता. ‘कामगार दिन’ साजरा करायला त्या सर्वांना कदाचित ते प्राणिसंग्रहालच सापडले असावे. एक तर प्राणिसंग्रहालय पाहण्याचा मला मुळातच फार काही उत्साह नव्हता, पण मित्राच्या आग्रहास्तव मी तिथे गेलो होतो.

हे प्राणिसंग्रहालय प्रशस्त असल्याने कुठकुठे दडून बसलेले, झोपलेले, विश्रांती घेणारे प्राणी हे अगदी सहज नजरेस पडत नव्हते. चालून चालून मला अगदीच कंटाळा आला होता. तेथिल प्राण्यांची छायाचित्रे मी माझ्या मोबाईलवर काढली, पण त्यापलिकडे विशेष काही सांगण्यासारखे आत्ता मला आठवत नाही. कारण या गोष्टीलादेखील आता दोन वर्षे झाली असावीत.

प्रत्येक माणसाचा आनंद हा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये दडलेला असतो आणि आपला आनंद कशात दडला आहे? ते आपल्याला पक्कं समजायला हवं. उगाच लोकांची जत्रा एखाद्या ठिकाणी भरत आहे म्हणून आनंद साजरा कराण्यास तिकडे पळायला मला आवडत नाही. आता खडकवासला धरणाचेच उदाहरण घेऊ! तर या धरणाचे जे पाणलोट क्षेत्र आहे, त्याच्या काठवर अज्ञात लोकांनी सकाळचा प्रातःविधी मनसोक्त उरकलेला असतो. त्यानंतर जीवनाचा यथेच्छ आनंद उपभोगण्यास निघालेले पुणेकर दिवसभरात त्या काठावर जमून तेथील पाण्यात मनोसक्त विहार करतात. त्यांच्याकडे पाहून माझ्या एका मित्राप्रमाणे काहीजणांना वाटू शकतं की, ‘काय हे आपलं जीवन!? आपणही अशी मजा करायला हवी’. पण मला तसे वाटत नाही. आहे त्यात ‘अस्वस्थ समाधान’ मानण्याची भारतीयांना सवय आहे आणि त्यामुळेच आजही हा देश अस्वच्छ आणि मागासलेला आहे. पण भविष्यातील पिढी मात्र खूप जागरुक आहे, त्यामुळे चिंता करण्याची काही गरज नाही.