सामाजिक

प्रगल्भतेतून उन्नती

हळूहळू एक गोष्ट माझ्या पक्की लक्षात आली आहे की, आपल्याकडे केवळ आर्थिक दारिद्र्य नसून आपण बौधिकदृष्ट्यादेखील प्रचंड दरिद्री आहोत. मी लहान असताना मोठी माणसे लहानसहान गोष्टींत खोटं बोलून, दुसर्‍यास दोष देऊन, वेळ मारुन नेऊन आपलं बौधिक दारिद्र्य सोयीस्कर लपवून ठेवायचे! किंवा आपण बौधिकदृष्ट्या दरिद्री आहोत, हेच मुळात कळण्याइतकीही त्यांस बुद्धी नसावी. अर्थात मी समाजातील सर्वसाधाराण माणसाबद्दल बोलत आहे. कारण असेही काही अत्यंत मोजके लोक असतात, ज्यांचे आचार-विचार हे वैश्विक दर्जाचे असतात आणि ते कधीही कालबाह्य होत नाहीत.

वृत्तवाहिनीवर ‘तज्ञ’ (‘राजकारणी’ नव्हे!) म्हणून बोलावलेले लोकही जेंव्हा एकांगी बाजू मांडताना दिसतात, तेंव्हा अक्षरशः ‘थक्क’ व्हायला होते. म्हणजे आयुष्याची इतकी वर्षं ‘तज्ञ’ म्हणून मिरवून म्हातारं झाल्यावरही जर ते साकल्याने विचार करु शकत नसतील आणि एकांगीच विचार समोर मांडणार असतील, तर त्यांस ‘तज्ञ’ म्हणून घेण्याचा अधिकार काय!? समाजाला त्यांचे सर्व मुद्दे लक्षात येतातच असे नाही, पण हा ‘तज्ञ’ आपल्या भल्याचं काही बोलत नाही, हे मात्र नकळतच त्यांच्या सुप्तपणे लक्षात येतं. तेंव्हा या तज्ञांना काही स्विकाहार्यता उरत नाही व त्यायोगे त्यांच्या विचारांस जनमानसाचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत नाही.

राजकारणी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचं तर काही बोलायलाच नको! दुसर्‍याच्या एकूणएक अशा प्रत्येक गोष्टीचं समर्थन तिच व्यक्ति करु शकते, जी व्यक्ति स्वतःचं डोकं वापरत नाही. उदाहरणार्थ, राजकीय कार्यकर्ता. राजकीय कार्यकर्त्यांनी आपला मेंदू बहुदा आपल्या नेत्याच्या चरणी अर्पण केलेला असतो! कारण उद्या जर त्यांच्या नेत्याने घोषित केले की, ‘सूर्य पश्चिमेकडून उगवतो’, तर लागलीच ते सूर्य पश्चिमेकडूनच कसा उगवतो? यावर अत्यंत तावातावाने बोलू लागतात. मुद्दा जितका तर्कविसंगत असेल, तितका ह्यांचा ताव वाढतो, कारण त्यांस विसंगती ऐकूनच घ्यायची नसते. आपण मोठमोठ्याने बोंबललो म्हणजे सत्याचा आवाज त्यात आपोआप विरुन जातो, या तत्त्वाचे अनुसरण करणार्‍यांस ते काय बोलावे!? अशांना दूर्लक्षून मारणेच हिताचे!

पण अगदी सगळेच मूर्ख आहेत असे नाही. साकल्याने विचार करणारेही लोक आहेत. पण दूर्देवाने त्यांचं प्रमाण हे अत्यंत कमी आहे. साकल्याने विचार करणारी व्यक्ति ही केवळ हुशार असते असे नाही, तर ती प्रगल्भही असते. आपल्याकडे हुशार लोकांची कमतरता नाही, परंतु प्रगल्भ व्यक्तिंची वाणवा आहे. अर्थात ही केवळ आपल्या समाजाची समस्या नसून ती एक जागतिक समस्या आहे!

तेंव्हा प्रगल्भता केवळ पारंपारिक विषयांच्या शिक्षणाने प्राप्त होते का? की त्यासाठी सर्वंकष शिक्षणाची गरज आहे? की याकरीता मेंदूचा जीवशास्त्रिय दृष्टीकोनातून आभ्यास करायला हवा? यावर यापुढील काळात विचार करावा लागेल..! कारण समाजातील प्रगल्भ लोकांचे प्रमाण जर अधिक असेल, तरच समाज सर्वार्थाने उन्नती प्राप्त करु शकेल.