सामाजिक

पालकत्त्वाची पात्रता परिक्षा

लहान मुलास ‘तू मोठेपणी काय होणार?’ म्हणून विचारले जाते, तेंव्हा त्याने आपल्यास अपेक्षित असेच उत्तर द्यावे याची सोय पालकांनी स्वतःसाठी करुन ठेवलेली असते. वय वाढतं आणि कॉलेजला जायची वेळ येते. कोणाला डॉक्टर व्हायचं असतं, तर कोणाला इंजिनियर.. प्रत्येकाने आपापल्या वाटा निवडलेल्या असतात. पण काही बनायचं असेल, तर त्यासाठी प्रथम ‘पात्र’ ठरावं लागतं! यासाठी परिक्षा घेतल्या जातात. व्यक्तिस एखाद्या विषयातील ज्ञान कितपत अवगत झाले आहे? हे या पात्रता परिक्षा ठरवतात. ‘पालक’ बनण्यासाठी मात्र अशी कोणतीही पात्रता परिक्षा द्यावी लागत नाही! याचा अर्थ आपल्या लेखी पालक बनण्यासाठी काहीही ‘पात्रता’ अथवा ‘लायकी’ लागत नाही. तेंव्हा ‘मनुष्य हा शेवटी प्राणीच’ असल्याचे इथे दिसून येते.

‘वंशाचा दिवा’, ‘घराण्याचं नाव’ हे सगळं आता कालबाह्य झालं आहे. आजच्या काळात संबध आयुष्य पुरणार नाही इतकं ज्ञानाचं व कार्याचं क्षितीज विस्तारलं आहे, तेंव्हा मुळात आपण मुलांना जन्म देतोच का!? याचा विचारही व्हायला हवा! काहीजणांना अगदी मनापासून लहान मुलांची आवड असते, तर उरलेले ‘सगळे करतात म्हणून सगळे करतात’. त्यामुळे ‘पालकत्त्व’ ही एक जबाबदारी असून ‘मुलांचे संगोपण’ हा एक आभ्यासण्याचा विषय आहे, हे कोणाच्या खिजगणतीतही असण्याचे कारण नाही. मूळात एखाद्या गोष्टीवर ‘सखोल विचार’ करणं ही आपली पद्धतच नाही!

लहान मुलांचे संगोपण करत असताना पालकांचे मूर्खत्त्व हे ठायी ठायी दिसून येते. पालकांच्या अज्ञानातून व अजानतेपणातून आलेल्या मूर्खपणाचा त्रास लहान बालकांना होताना पाहून हृदय पिळवटून जाते. पण स्वतःच स्वतःला जगातील सर्वेश्रेष्ठ पालकाचा पुरस्कार देऊन मूर्खत्त्वास आपला अधिकार मानणार्‍यांना कोण काय बोलणार? मुलांबद्दल प्रेम आहे, काळजी आहे म्हणून आपण जे करु ते मुलांच्या भल्याचंच असणार! असा भाबडा विचार करणं हे निव्वळ मूर्खपणाचं लक्षण आहे! मूळात सरसकट सर्व पालकांचे मुलांवर त्यांच्या अंतरात्म्यातून निरपेक्ष प्रेम असते यावर माझा विश्वास नाही. पालकांच्या बेजबाबदार वागण्यामुळे लहान बालके दबून जातात, कोमेजून जातात. बालवयातच मनावर झालेला वाईट परिणाम मात्र पुढे आयुष्यभर सहजासहजी साथ सोडत नाही. बालमनाच्या आनंदातच पुढील सबंध आयुष्यभराचा आनंद दडलेला असतो, यावरुनच खरे तर पालकत्त्वाचे गांभिर्य लक्षात यावे!

‘शिक्षक’ बनून पुढील पिढी घडविण्याकरीता ‘पात्र’ असावं लागतं, त्यासाठी ‘परिक्षा’ द्यावी लागते. मग ‘पालक’ बनून हेच पिढी घडवण्याचं कार्य केलं जात असेल, तर त्यास ‘पात्रता परिक्षा’ का असू नये? वयाच्या २१ व्या वर्षानंतर लग्नापूर्वी कधीही करता येईल असा ‘पालक’ बनण्याचा एक छोटासा कोर्स असायला हवा. जागतीक किर्तीच्या बालमानसशास्त्रज्ञांकडून अशा कोर्सचा आभ्यासक्रम हा सरकारने तयार करुन घ्यावा. त्यात लहान मुलांच्या संगोपणाचे कानमंत्र दिले जावेत. मध्यमवर्गीयांस हा कोर्स अगदी माफक दरात उपलब्ध असावा, तर गरीबांपर्यंत तो मोफत पोहचवण्याची जबाबदारी ही सरकारची हवी. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर तज्ञांमार्फत सर्वसाधारण सोपी परिक्षा घेतली जावी. या परिक्षेत उत्तिर्ण होणार्‍यांसच पुढे लग्नाची अनुमती असावी. सरकार दफ्तरी विवाहाची अथवा बाळाच्या जन्माची नोंदणी करण्यापूर्वी ‘पालकत्त्वाची परिक्षा’ उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र देणे बंधनकारक असावे. यातून सरकारवर जरी खर्चाचा काही बोजा पडणार असला, तरी दूरगामी विचार करता होणार्‍या खर्चाच्या कित्येक पट अधिक फायदा हा शेवटी समाजाला, देशाला व पर्यायाने सरकारलाच होणार आहे.