म्युच्युअल फंड

पडझडीतून सुवर्णसंधीकडे

सध्या शेअर बाजार मोठ्या प्रमाणावर कोसळू लागला आहे. तेंव्हा ज्यांचे पैसे प्रत्यक्ष बाजारात गुंतले आहेत त्यांना काळजी वाटणे स्वाभाविक आहे. पडझडीच्या काळात नेहमीच्या तुलनेत गुंतवणूकदारांचे फोन वाढलेले असतात. बाजार कोसळत असताना अधिक नुकसान होण्यापूर्वी वेळीच आपले पैसे काढून घ्यावेत अशी त्यांची इच्छा असते. अशावेळी बाजारात होणारी पडझड ही खरे तर प्रत्यक्षात सुवर्णसंधी असल्याचे त्यांच्या लक्षात आणून द्यावे लागते.

एखादी वस्तू आपण महाग दराने विकत घेऊ की स्वस्त दराने विकत घेऊ? अर्थातच स्वस्त दराने! मग गुंतवणूक करत असताना आपण जेंव्हा समभाग (Shares) किंवा घटक (Units) विकत घेतो, तेंव्हा असाच साधा-सोपा विचार का करत नाही? एखाद्या म्युच्युअल फंड योजनेचे घटक जर आपणास स्वस्त दराने मिळत असतील, तर ते विकत घेण्यास काय हरकत आहे? पण नेमके याचवेळी भावनेच्या आहारी जाऊन आहेत ते घटकही विकण्याकडे अनेकदा गुंतवणूकदारांचा कल दिसून येतो. दुसरीकडे जेंव्हा शेअर बाजार चढत असतो, तेंव्हा मात्र उत्साहाच्या लाटेमध्ये चढ्या दराने घटक विकत घेतले जातात.

सर्वसाधारण गुंतवणूकदाराने खरे तर बाजारातील चढ-उतारांची पर्वा न करता नियमितपणे गुंतवणूक करत राहायची असते. पण बाजार जेंव्हा अनायसे मोठ्या प्रमाणावर कोसळलेला असतो, तेंव्हा नेहमीपेक्षा थोडी अधिक गुंतवणूक केली, तर आपल्याला त्यावर उत्तम परतावा मिळू शकतो. दीर्घकालीन उद्दिष्ट समोर ठेवून जेंव्हा गुंतवणूक केली जाते, तेंव्हा बाजारातील तात्कालिक घसरणीचा परिणाम होण्याची शक्यता देखील जवळपास मावळलेली असते. बाजार पडला असताना आपण जर आपल्याजवळील घटक विकले नाहीत, तर आपल्याला तोटा झाला असे समजण्याचे कारण नाही. त्यामुळे पडझडीच्या काळात आपली गुंतवणूक आहे तशीच ठेवावी, उलट त्यामध्ये अधिकची भर घालून सुवर्णसंधी साधावी!