सामाजिक

तुटत चाललेला संवाद!?

‘सोशल मिडिआमुळे माणसा-माणसा मधील प्रत्यक्ष ‘संवाद’ तुटत चालला आहे’, असा नकारात्मक सूर अलीकडे काहीवेळा वर्तमानपत्रांतून वाचायला मिळतो. पण त्यात मला काही पूर्णतः तथ्य वाटत नाही. ‘संवाद’ तुटत चालला आहे, हे एकवेळ मान्य करता येईल, पण नक्की कसला ‘संवाद’ तुटत चालला आहे? ते तरी त्यासोबत सांगायला हवे!

पूर्वीच्या काळातील लोकांच्या संवादाचे प्रमुख विषय काय असायचे? तर फाल्तूच्या गप्पा! ‘तुझं काय चाललंय?’ ते झालं की, ‘तुझ्या भावाचं, आईवडीलांचं, कुटूंबाचं कसं चाललंय?’ मग ते झालं की, तिथे उपस्थित नसलेल्या ‘इतरांचं काय चाललंय?’ आणि सगळ्यांचं काय चाललंय? हे एकदा कळालं, की उपस्थित तत्त्ववेत्ते त्यावर तुच्छतादर्शक, नकारात्मक असे आपले महान विचार मांडणार!

आता हे संवादाचे विषय असायचे हे मी इतक्या खात्रीने कसे सांगू शकतो? कारण करोडो लोकांमधून काही मुठभर लोक सोडले, तर आपल्याकडे महान शास्त्रज्ञांची, कलाकारांची, साहित्यिकांची, उद्योजकांची, खेळाडूंची अशी फौज कुठे दिसत नाही. आता परिस्थिती हळूहळू बदलत आहे, पण पूर्वी लोकांना समोरच्याच्या सुखापेक्षा दुःखामध्येच अधिक रस असायचा.

त्यासंदर्भात एक सुंदर इंग्रजी सुविचार आहे आणि तो मला अगदी मनःपूर्वक पटतो.

Don’t tell your problems to people: eighty percent don’t care; and the other twenty percent are glad you have them. – Lou Holtz

अशाप्रकारच्या संवादास काही लोक ‘आपुलकीने सुख-दुःख वाटणे’ असे गोंडस नाव देऊ शकतात, पण त्याला काही अर्थ नाही. माणसाने आपलं मन हे कोणाजवळ तरी व्यक्त करायला हवं, हे मला अगदी पूर्णतः मान्य आहे. पण त्यासाठी समोरची व्यक्तिही तितकीच सकारात्मक, अनुभवी व समोरच्याचं भलं चिंतणारी असायला हवी. दूर्देवाने आपल्याकडे इतके दिवस तरी अशा लोकांचा अभावच होता. सुख-दुःख वाटावे, पण ते तेव्हढ्यापुरतेच असावे.. त्यांचं गुर्‍हाळ मांडून बसू नये. प्रश्नांकडे सर्वांनी सकारात्मक दृष्टिकोनातून पहायला हवे.

विनोदी अंगाने अधुनमधून निरर्थक गप्पा मारायला देखील हरकत नाही, त्यामुळे वातावरणातील तणाव निवळेल. पण बहुतांश वेळ मात्र प्रत्येकाने स्वतःच्या आवडीच्या अशा एखाद्या कार्यात स्वतःला गुंतवून घेतले पाहिजे. खास करुन निवृत्त लोकांना आता रिकाम्या वेळेचं करायचं काय? असा प्रश्न पडतो. तेंव्हा आपले छंद जोपासा, कलेचं रसग्रहण करा, लहान मुलांना आपल्या अंगी असलेल्या कला प्रेमाने शिकवा, आपल्याजवळील ज्ञान त्यांना द्या, गोष्टी सांगा. असं केल्यास भावी पिढीशी तरी आपला ‘तुटलेला संवाद’ नक्किच जोपासला जाईल.

सोशल मिडिआचं नाविण्य संपेल तेंव्हा लोक आपोआपच त्यावर अनावश्यक वेळ घालवणं बंद करतील. त्यामुळे त्याबाबत चिंता करण्याची काही गरज नाही. बाकी आपला आपल्या अंतरात्म्याशी असलेला ‘संवाद’ तर तुटलेला नाही ना? याचं आत्मचिंतन प्रत्येकाने करायला हवं!