म्युच्युअल फंड

डेट म्युच्युअल फंडचे १६ उपप्रकार

डेट फंडशी निगडीत योजनांमध्ये स्पष्टता यावी यासाठी ‘सिक्‍युरिटीज अँड एक्‍स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया’ म्हणजेच ‘सेबी’ने डेट फंडची १६ उपप्रकारांत विभागणी केली आहे. प्रत्येक ‘एएमसी’ (म्युच्युअल फंड कंपनी) या उपप्रकारांत प्रत्येकी १ योजना सुरू करू शकते. अशाने निरनिराळ्या एएमसी’च्या समान प्रकारच्या योजनांमधून योग्य अशी योजना निवडणे गुंतवणूकदारासाठी सोपे जाते. डेट फंडचे उपप्रकार पाहण्यापूर्वी म्युच्युअल फंडचे मुख्य प्रकार कोणते? हे जाणून घेणे उपयुक्त ठरेल.

डेट फंडचे १६ उपप्रकार

१. ओव्हरनाईट फंड : या फंडच्या माध्यमातून केवळ १ दिवसाची पक्वता असणाऱ्या अर्थबाजारातील साधनांमध्ये गुंतवणूक केली जाते.

२. लिक्विड फंड : ९१ दिवसांची पक्वता असणाऱ्या ऋण आणि अर्थबाजारांतील साधनांमध्ये लिक्विड फंड मधील गुंतवणूक होते.

३. अल्ट्रा शॉर्ट ड्युरेशन फंड : ३ ते ६ महिन्यांची मॉकली कालमर्यादा असणाऱ्या ऋण आणि अर्थबाजारातील साधनांमध्ये अल्ट्रा शॉर्ट ड्युरेशन फंड मधील रक्कम गुंतवली जाते.

४. लो ड्युरेशन फंड : ६ ते १२ माहिन्यांची मॉकली कालमर्यादा असणाऱ्या ऋण आणि अर्थबाजारातील साधनांमध्ये लो ड्युरेशन फंडद्वारे गुंतवणूक केली जाते.

५. मनी मार्केट फंड : १ वर्षापर्यंतची पक्वता असणाऱ्या आर्थबाजारांतील साधनांमध्ये मनी मार्केट फंडच्या माध्यमातून गुंतवणूक होते.

६. शॉर्ट ड्युरेशन फंड : १ ते ३ वर्षांची मॉकली कालमर्यादा असणाऱ्या ऋण आणि अर्थबाजारातील साधनांमध्ये शॉर्ट ड्युरेशन फंड मधील रक्कम गुंतवली जाते.

७. मिडीयम ड्युरेशन फंड : ३ ते ४ वर्षांची मॉकली कालमर्यादा असणाऱ्या ऋण आणि अर्थबाजारातील साधनांमध्ये अल्ट्रा शॉर्ट ड्युरेशन फंडद्वारे गुंतवणूक होते.

८. मिडीयम टू लाँग ड्युरेशन फंड : ४ ते ७ वर्षांची मॉकली कालमर्यादा असणाऱ्या ऋण आणि अर्थबाजारातील साधनांमध्ये अल्ट्रा शॉर्ट ड्युरेशन फंडच्या माध्यमातून गुंतवणूक केली जाते.

९. लाँग ड्युरेशन फंड : ७ वर्षांहून अधिकची मॉकली कालमर्यादा असणाऱ्या ऋण आणि अर्थबाजारातील साधनांमध्ये अल्ट्रा शॉर्ट ड्युरेशन फंडची गुंतवणूक होते.

१०. डायनॅमिक बॉण्ड : निरनिराळी कालमर्यादा असणाऱ्या ऋण आणि अर्थबाजारातील साधनांमध्ये डायनॅमिक बॉण्डद्वारे गुंतवणूक केली जाते.

११. कॉर्पोरेट बॉण्ड फंड : कॉर्पोरेट बॉण्ड फंडमध्ये एकूण गुंतवणुकीच्या कमीतकमी ८०% रक्कम चांगल्या कॉर्पोरेट बॉण्डमध्ये गुंतवली जाते.

१२. क्रेडिट रिस्क फंड : क्रेडिट रिस्क फंडमध्ये एकूण गुंतवणुकीच्या कमीतकमी ६५% रक्कम सर्वसाधारण कॉर्पोरेट बॉण्डमध्ये गुंतवली जाते.

१३. बँकिंग अँड पीएसयु फंड : या फंडच्या माध्यमातून बँक, सार्वजनिक क्षेत्रातील हमीपत्र, तसेच सार्वजनिक आर्थिक संस्था अशा ऋण साधनांमध्ये कमीतकमी ८०% गुंतवणूक केली जाते.

१४. गिल्ट फंड : गिल्ट फंडद्वारे निरनिराळी पक्वता असणाऱ्या सरकारी रोख्यांमध्ये कमीतकमी ८०% गुंतवणूक केली जाते.

१५. गिल्ट फंड विथ १० इयर कॉन्स्टंट ड्युरेशन : गुंतवणूकपत्राची मॉकली कालमर्यादा १० वर्षे होईल अशाप्रकारे सरकारी रोख्यांमध्ये कमीतकमी ८०% गुंतवणूक या फंडच्या माध्यमातून केली जाते.

१६. फ्लोटर फंड : फ्लोटर फंडद्वारे तरंगते व्याजदर असणाऱ्या साधनांमध्ये एकूण गुंतवणुकीच्या कमीतकमी ६५% रक्कम गुंतवली जाते.

गुंतवणूकदार आपल्या गरजेनुसार व आर्थिक परिस्थितीनुसार वरीलपैकी आपल्यासाठी योग्य असा डेट फंड निवडू शकतो.