मराठी महाराष्ट्र

marhathi.com : चळवळीचे एक उत्स्फूर्त संकेतस्थळ!

समाजमाध्यमावर लिहिणे म्हणजे अगदी प्रभावीपणे हवेत बोलण्यासारखे आहे. यावर लिहिलेले शब्द ज्या गतीने सर्वदूर पोहचतात, त्याच गतीने ते हवेत विरुनही जातात. दुसऱ्या बाजूला संकेतस्थळावर लिहिलेला एखादा लेख हा मागे पडत नाही किंवा हरवून जात नाही, तर तो कायम शोधण्याच्या अंतरावर उपलब्ध राहतो, ज्याचा पुढे संदर्भासाठी खूप चांगला उपयोग होतो. त्यामुळे समाजमाध्यमाच्या काळातही अनुदिनी (blog) आणि संकेतस्थळ (website) आपले स्वतःचे वेगळे महत्त्व राखून आहेत.

भाषिक अधिकारांबाबत जनजागृती करण्यासाठी ‘मराठी बोला चळवळ’ समाजमाध्यमांचा अगदी कौशल्याने वापर करत होती, तरी या जनजागृतीला एक चौकट प्राप्त व्हावी यासाठी चळवळीचे स्वतःचे एक संकेतस्थळ असावे असे मला मनोमन वाटत होते. नवीन संकेतस्थळ सुरू करणे माझ्यासाठी अवघड काम नव्हते, पण संकेतस्थळ सुरू करणे ही एक गोष्ट आहे, आणि संकेतस्थळ नियमितपणे चालवणे ही दुसरी गोष्ट आहे. त्याकाळात मी ‘संगणकाची गोष्ट’ हे पुस्तक लिहिण्यास घेतले होते आणि त्यासोबत इतरही काही कारणे होती, ज्यामुळे मला स्वतःला नवीन संकेतस्थळ चालवणे शक्य नव्हते. दुसरीकडे मी स्वतः चळवळीमध्ये प्रत्यक्ष सहभागी नव्हतो, तर चळवळीला केवळ माझा उत्फुर्त पाठींबा होता. त्यादृष्टीने देखील चळवळीमध्ये प्रत्यक्ष सहभागी असणाऱ्या मुलांनीच संकेतस्थळाबाबत पुढाकार घेणे अधिक योग्य होते. बाकी संकेतस्थळाला माझ्या बाजूने सर्वोतोपरी सहकार्य करण्याची माझी तयारी होती.

संकेतस्थळाच्या अनुषंगाने माझे चळवळीतील मुलांशी बोलणे झाले, त्यादृष्टीने त्यांनी डोमेन नेम घेऊन ठेवले, पण माझ्याप्रमाणेच त्यांच्या काही व्यक्तिगत अडचणी असतील, आमचे बोलणे झाल्यानंतर अनेक महिने संकेतस्थळाचे काम काही पुढे सरकले नाही. मी स्वतः मराठीसाठी संकेतस्थळ सुरू करावे असे मला अधूनमधून सतत वाटत होते, पण तूर्तास मला त्यासाठी आवश्यक तेव्हढा वेळ देणे शक्य नव्हते. या साऱ्यात मराठीची चळवळ मात्र समाजमध्यमापुरतीच मर्यादित राहिली आहे याची मला मनोमन खंत होती. परंतु या महिन्याच्या सुरुवातीला ही खंत काहीशी दूर झाली, कारण गणेश सावंत या चळवळीच्या कार्यकर्त्याने marhathi.com हे चळवळीचे एक उत्स्फूर्त संकेतस्थळ आता सुरू केले आहे.

marhathi.com : चळवळीचे उत्स्फूर्त संकेतस्थळ
marhathi.com : चळवळीचे उत्स्फूर्त संकेतस्थळ

या संकेतस्थळाचे डोमेन नेम चांगले आहे, महत्त्वाचे म्हणजे स्वतःचे काम सांभाळत गणेश या संकेतस्थळाचे नियमितपणे संपादन करत आहे, ते अद्ययावत ठेवत आहे. एकंदरीतच सुरुवात चांगली झाली असल्याने येत्या काळात हे संकेतस्थळ अधिक सुरेख व माहितीपूर्ण होईल याबाबत खात्री आहे. भाषेशी निगडित अनेक गैरसमज आज अगदी सुशिक्षित माणसाच्या मनातही घर करून आहेत. अशावेळी हे संकेतस्थळ निद्रिस्त माणसाच्या डोळ्यांवरील झापड काढून त्यास जागे करेल याबाबत विश्वास वाटतो.

marhathi.com संकेतस्थळाला वेब ब्राउजरामध्ये बुकमार्क करा, फीडरीडरमध्ये सबस्क्राईब करा जेणेकरून आपणाला नवीन लेख वाचता येतील व चळवळीतील घडामोडींशी या संकेतस्थळाच्या माध्यमातून संपर्कात राहता येईल. यातून आपल्या आणि आपल्या आसपासच्या लोकांच्या वैचारिक कक्षा रुंदावतील याबाबत शंका नाही.