सामाजिक

चर्चात्मक रेडिओ केंद्र

आपल्या इथे रेडिओवर मुलाखती अथवा चर्चात्मक असे कार्यक्रम फारसे होताना दिसत नाहीत. सरकारी आकाशवाणी केंद्रावर भजन-किर्तन, शास्त्रिय संगीत, जुनी गाणी, शेतीविषयक कार्यक्रम आणि बातम्या याव्यतिरीक्त फारसे काही ऐकण्यास मिळत नाही आणि खाजगी केंद्रांवर धांगडधिंग्याशिवाय आणखी काही असत नाही. त्यामुळे मी रेडिओ जवळपास कधी ऐकतच नाही. पण परदेशातील रेडिओवर चालणारे चर्चात्मक कार्यक्रम हे मी ‘पॉडकास्ट’च्या माध्यमातून ऐकत असतो.

‘चर्चात्मक कार्यक्रम’ म्हणजे दूरदर्शनवर चालणारा राजकारण्यांचा ‘वितंडवाद’ नव्हे. अशा वितंडवादास ‘सामान्य ज्ञान’ असे गोंडस नाव देऊन अनेक लोक चवीने त्याचे चर्वण करत असतात. पण टिव्हीवरील अशा गोंधळातून सरतेशेवटी काहीही साध्य होत नाही. चर्चा, मुलाखती या अशा असायला हव्यात की, त्यातून ऐकणार्‍याच्या, पाहणार्‍याच्या ज्ञानात काहीतरी मोलाची भर पडेल, दृष्टिकोनात चांगला बदल होईल. मराठी वृत्तवाहिन्यांचे मात्र एका बाबतीत मी कौतुक करेन. त्यावर चालणार्‍या चर्चा जरी निरर्थक असल्या, तरी मुलाखती मात्र खरोखरच प्रबोधन करणार्‍या असतात. हिंदी वृत्तवाहिन्यांवर अशा मुलाखती दिसत नाहीत.

‘ज्ञानवाणी’ नावाचे केंद्र सरकारी ‘हिंदी’ केंद्र आहे. त्यावर माहितीपर कार्यक्रम सुरु असतात, पण ‘उत्पादन मूल्याचे’ काय? आपल्या इकडे प्रोडक्शन क्वालिटीला फार कमी महत्त्व दिले जाते. आपण जे काम करत आहोत ते केवळ चांगले असून जमत नाही, तर ते दिसायला देखील चांगले असायला हवे. कारण शेवटी ‘सादरीकरण’ ही देखील एक कला आहे. आपल्याकडे ‘बजेट’ कमी असतं, असा काही लोक युक्तिवाद करु शकतात, पण मला तो पूर्णतः मान्य नाही. मूळ मुद्द हा आहे की, आपल्या इथल्या समाजात कलेची वाणवा आहे. कारण इथे उमेदीच्या वयात चाकोरीबद्ध जीवन जगण्यास भाग पाडलं जातं. कलेची कदर करण्याची प्रवृत्ती इथे फारच कमी दिसून येते. कलेचा आनंद कसा घ्यावा? हेच मूळात अनेक लोकांस माहित नसते.

आपण जवळपास ८ करोड मराठी लोक आहोत. एखादे दर्जेदार असे चर्चात्मक रेडिओ केंद्र आपल्या इथे का चालू शकत नाही? साहित्यिक, विचारवंत, समाजसेवक, शास्त्रज्ञ, कलाकार, वैद्य, व्यवसायिक, राजकारणी, खेळाडू.. समाजात आपले वेगळेपण जपणार्‍या अशा लोकांचे विचार हे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचायला हवेत. तरच आपला मराठी समाज हा प्रगतीपथावर अग्रभागी राहू शकेल. सवय नसल्याने कदाचित सुरुवातीस लोक असे एखादे केंद्र ऐकणार नाहीत, पण त्यांस हळूहळू त्याची गोडी लागेल. कमीतकमी ज्यांना नाविण्याची आवड आहे अशा खेडोपाडी राहणार्‍या लोकांस तरी हे केंद्र नक्कीच आवडेल. पण यासाठी पुढाकार घेणार कोण? सरकारकडून फारशी काही अपेक्षा नाही, पण आपल्या मराठी जनतेच्या कल्याणासाठी महाराष्ट्र सरकारने चर्चात्मक रेडिओ केंद्र सुरु करायला हवे.